मन को अनोखा ज्ञान मिला !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2019   
Total Views |
 

 
 
'आदमी' चित्रपटातील 'आज पुरानी राहों से कोई मुझे आवाज न दे..' हे गीत माझ्या अतिशय आवडत्या गीतांपैकी एक. शकील बदायुनींचे अर्थपूर्ण शब्द, नौशाद यांचे तितकेच अनुरूप संगीत आणि रफ़ीसाहेबांचा भारदस्त स्वर असा सुंदर मिलाफ़ या गीतात जमुन आला आहे. हा लेख लिहित असताना याच गीतातील दोन ओळी सारख्या मनात घोळत आहेत-
 
 
जीवन बदला दुनिया बदली,
मन को अनोखा ज्ञान मिला
आज मुझे अपनेही दिल में,
एक नया इन्सान मिला
 
 
तीच व्यक्ती आहे, तेच जग आहे पण तरीही काहीतरी नवीन गवसलं आहे आणि जे गवसलंय ते इतकं अभूतपूर्व आहे की त्यामुळे सगळं वातावरणच बदलुन गेलं आहे. हे जे काही गवसलेलं आहे त्याचं नाव ’दृष्टिकोन’ असं अहे. हा दृष्टिकोन जेव्हा बदलतो तेव्हा स्वत:मधीलच नवीन व्यक्तिमत्वाची जाणिव होते. या दृष्टिकोनात इतकी ताकद आहे की त्यामुळे आपलं जग तर बदलतंच शिवाय जगाचीही आपल्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते. व्यक्तिगत जीवनात जशी ही अनुभूति काही वेळा येते तसेच सामूहिक पातळीवरही कधी कधी हे अनुभवायला मिळतं.
 
 
२०१६ साली जनकल्याण रक्तपेढीला राष्ट्रीय स्तरावरील एन.ए.बी.एच. (National Accreditation Board of Hospitals and Healthcare Providers) मानांकन मिळाले तेव्हाही आमच्या भावना ’मन को अनोखा ज्ञान मिला’ अशाच काहीशा होत्या. या एन.ए.बी.एच. मानांकनामुळे रक्तपेढी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दृष्टिकोन असाच क्रमश: बदलत गेला.
 
 
पण हे मानांकन नक्की आहे तरी काय ? ते मिळाल्यामुळे जनकल्याण रक्तपेढीची धोरणे आणि मूल्ये यात अचानक काही फ़रक पडला का ? तर नक्कीच नाही. मग हे मानांकन मिळाले म्हणजे काय झाले ? तर आपले ’चांगलेपण’ मान्यताप्राप्त झाले आणि ते टिकवून ठेवण्यासाठी एक सर्वमान्य ’गुणवत्ता व्यवस्थापन पद्धति’ (Quality Management System) आपण अंगिकारली. अर्थात नवा दृष्टिकोन आहे तो हाच. एखाद्या व्यक्तीने स्वत:ला चांगले म्हणणे, त्याला इतर माणसांनी चांगले म्हणणे आणि त्याला सामाजिक मान्यताप्राप्त आस्थापनांनी चांगले म्हणणे या तीनही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. संस्थात्मक पातळीवर ’स्वत:ला चांगले म्हणणे’ याचा अर्थ ’नैतिकतेचे कठोर पालन’ असा आपण घेऊ शकतो. असे काम जेव्हा एखादी संस्था दीर्घकाळ करते तेव्हा आपोआपच ती लोकांच्या विश्वासास पात्र होते. अर्थात जनकल्याण रक्तपेढीने या दोन्ही निकषांवर स्वत:स सिद्ध केले आहेच. पण एन.ए.बी.एच. मानांकन हा याच्याही पुढचा टप्पा आहे. एन.ए.बी.एच. या संस्थेने निर्धारित केलेले गुणवत्तेचे निकष हे आंतरराष्ट्रीय मानकांशी संलग्न असतात. म्हणजेच आपण करत असलेले काम या गुणवत्ता निकषांच्या आधारावर थेट जाऊन बसले ते आंतरराष्ट्रीय पातळीवर. त्यामुळे हे मानांकन मिळवत असताना रक्तपेढीच्या कामाला समाजमान्यता मिळालेली असली तरीही एन.ए.बी.एच. च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय मानकांची बरोबरी करण्यासाठी काही बदल तर करावे लागलेच. हे सर्व करत असताना कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी – जे स्वत:च एन.ए.बी.एच. चे राष्ट्रीय निर्धारक (National Assessor) आहेत – यांचे सोबत असणे हेदेखील रक्तपेढीसाठी एक मोठे गुणांकन ठरले.
 
 
एन.ए.बी.एच. मानांकनासाठी प्रयत्न करायचा असे ठरल्यानंतर एकदा विश्वस्त मंडळाबरोबर सर्व कर्मचाऱ्यांची एकत्रित बैठक झाली होती. त्यात स्वत: यंत्र अभियंता असलेले एक विश्वस्त श्री. सुरेश बापट यांनी एक महत्वाचे सूत्र सर्वांना सांगितले. ते म्हणाले, ’आपल्याकडे ’बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ असे एक सुभाषित सांगितले जाते. त्याचप्रमाणे एन.ए.बी.एच. मानांकन मिळवण्याकरिता आपल्याला ’लिहिले तैसे केले’ हे सूत्र घेऊन पुढे जायचे आहे.’ खूप नेमक्या शब्दांत बापटकाकांनी यापुढील साध्य सांगितले होते. रक्तपेढीच्या प्रत्येक विभागामधील काम हे सुनियोजित असले पाहिजे व प्रत्येक काम करण्यासाठी लेखी आधार असला पाहिजे. या आधारांचा संदर्भ असतात ती एन.ए.बी.एच. ची मार्गदर्शक तत्वे आणि रक्तपेढीने त्या आधारावर ठरवलेली गुणवत्ता धोरणे. समजा, ’रक्तपेढीतील विद्यूत विभागाची तपासणी’ असा विषय आहे. तर या विषयाला ’अशी तपासणी करण्याबाबतचे धोरण काय आहे म्हणजेच किती दिवसांनी अशी तपासणी करायची असे ठरले आहे, ती झाली असल्याची अधिकृत कागदपत्रे, त्यात सांगितलेल्या सूचना, त्यावर केली गेलेली कार्यवाही, पुन्हा या कार्यवाहीची कागदपत्रे, त्यावरील शेरे इ. इ. पुरवण्या जोडुन तो विषय अद्ययावत आणि परिपूर्ण करायचा आणि अर्थात हेच सर्व विषयांबाबत.
 
 
’लिहिले तैसे केले’ या सूत्राप्रमाणे लिहायचे म्हणजे नेमके काय ’लिहायचे ?’ तर त्याला एक पारिभाषिक शब्द आहे – एसोपीज (Standard Operating Procedures). त्यामुळे रक्तपेढीतील जनरेटरपासून ते फ़रशी पुसण्यापर्यंतच्या कामाच्या एसोपीज बनु लागल्या. अर्थात तांत्रिक विभागासाठी या एसोपीज प्रथमपासून अस्तित्वात होत्याच पण आता मात्र या एसोपीजने रक्तपेढीचे सर्व विभाग व्यापुन टाकले. जे लिहिले आहे, तसेच होतेय का हे पाहण्यासाठी पर्यवेक्षक हातात याद्या घेऊन फ़िरताना दिसु लागले. वेळोवेळी स्टॅंडिंग मीटींग्ज होऊ लागल्या. नियोजित कार्यपद्धतीचा आग्रह होऊ लागला. दुसऱ्या बाजुला आग्रह झाला की दोषही दिसु लागतात, उघडे पडु लागतात. त्यामुळे हे सगळं करत असताना काही जणांची मने दुखावली जाणे हेही स्वाभाविक होते. या परिस्थितीत कार्यपद्धतीचा आग्रह धरणे आणि संघटनही टिकवुन ठेवणे ही खरोखरीच तारेवरची कसरत होती. एन.ए.बी.एच. मानांकनासाठी ज्या ज्या म्हणून बैठका झाल्या त्या सर्व बैठकांमधून – या सर्व प्रक्रियेचं नेतृत्व करणारे – डॉ. अतुल कुलकर्णी व डॉ. तन्वी यार्दी यांनी एक गोष्ट सर्वांच्या मनावर सातत्याने बिंबवली. ती म्हणजे, ’Let us talk about system and not about people !’ त्यामुळे ’अमुक एका व्यक्तीने असं केलं’ अशा निवेदनापेक्षा ’असं अपेक्षित होतं आणि तसं झालं’ असं सांगण्यातून अधिक चांगले परिणाम मिळतात हे सर्वांच्याच लक्षात येत गेलं. अनेक त्रुटी या कार्यपद्धतीशीही निगडीत असतात. त्या समोर आल्याने कार्यपद्धतीत आवश्यक ते बदल करणेही सहज शक्य होऊ लागले.
 
 
हळुहळू एन.ए.बी.एच. चे वातावरण सर्वत्र तयार झाले. ऑडिट, एसोपीज, इन्सिडेंट रिपोर्ट्स, फ़ीडबॅक अशा शब्दांचा वापर वाढु लागला. काम तेच असलं तरी या परिभाषा मात्र नवीन होत्या. मात्र सरावाने त्याही अंगवळणी पडु लागल्या. सर्व तयारी करुन दोन वेळा अंतर्गत परीक्षणाला (internal audit) रक्तपेढी सामोरी गेली आणि २०१६ च्या अखेरीस एन.ए.बी.एच. साठी अंतिम बाह्य परीक्षण (final external audit) संपन्न झाले. याकरिता राष्ट्रीय स्तरावरील दोन निर्धारक रक्तपेढीत उपस्थित झाले. आधी भरपूर रंगीत तालमी झाल्याने बऱ्यापैकी आत्मविश्वास तरीही किंचितसा तणाव अशी शालेय परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यासारखी सर्वांचीच अवस्था यावेळी झाली होती. पण शेवटी ही परीक्षा चांगल्या वातावरणात पार पडली.
 
 
 
 
 
दि. ३१ डिसेंबर २०१६ रोजी जनकल्याण रक्तपेढीला एन.ए.बी.एच. मानांकन मिळाल्याची बातमी सर्वांना समजली आणि आपण केलेल्या मेहेनतीचे चीज झाल्याची भावना स्वाभाविकपणे सर्वांची झाली. या स्थित्यंतरामुळे भारतातील एकूण तीनेक हजार रक्तपेढ्यांपैकी ज्या केवळ ऐंशी रक्तपेढ्यांना हे मानांकन प्राप्त आहे, त्यामध्ये जनकल्याण रक्तपेढी जाऊन बसली. रक्तपेढीची मूल्ये तर स्थापनेच्या पूर्वीपासूनच ठरली आहेत आणि ती अविचलच आहेत. पण तरीही प्रत्येक काळामध्ये या मूल्यांचे दर्शन सर्वांना होण्यासाठी त्या त्या काळाच्या नियमांमध्ये स्वत:ला बसविणे हेही आवश्यक असतेच. हीच गरज लक्षात घेऊन विश्वस्त मंडळ आणि डॉ. अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली रक्तपेढीने हा पल्ला गाठला. जनकल्याण रक्तपेढीची कार्यपद्धती आणखीनच उजळुन निघाली. ’समाजातील शेवटच्या स्तरातील व्यक्तीला मदत मिळाली पाहिजे’ या भावनेतील तीव्रता कुठेही कमी न होऊ देता रक्तपेढीतील सर्व प्रक्रिया गुणवत्तापूर्ण असल्या पाहिजेत हा आग्रह या निमित्ताने अधोरेखित झाला.
 
 
काम तेच आहे, अनोखा आहे तो दृष्टिकोन !
 
 
 
 
- महेंद्र वाघ 
 
 
@@AUTHORINFO_V1@@