हीच वेळ आहे... योग्य निर्णय घेण्याची!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2019   
Total Views |


 


नरेंद्र मोदी यांना सत्तेवर येऊ न देणे एवढाच विरोधकांचा कार्यक्रम असेल तर मतदार त्यांच्याकडे वळणे शक्य आहे का? २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने अनेक कल्याणकारी उपक्रम राबविले. सामान्य जनता, शेतकरी यांच्या भल्यासाठी प्रयत्न केले. ‘सब का साथ, सब का विकास’ हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून सातत्याने प्रयत्न केले. पण विरोधकांनी नकारात्मक राजकारण करून मोदी सरकारची बदनामी करण्याची संधी सोडली नाही.


लोकसभा निवडणुका येत्या ११ एप्रिल ते १९ मे दरम्यानच्या काळात सात टप्प्यांमध्ये
घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने रविवारी केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक कार्यक्रमाची जी आखणी निवडणूक आयोगाने केली आहे, त्याचा लाभ सत्ताधारी पक्षास कसा होणार इथपासून निवडणुकीनंतर केंद्रात सत्तेवर कोण येणार, कोणास किती जागा मिळणार, असे अंदाज वर्तविण्यास प्रारंभही झाला आहे. कथित निवडणूक विश्लेषक काय काय होऊ शकते याची भाकिते वर्तवू लागले आहेत. एकीकडे, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सर्वांचा विकास साधण्याचा प्रयत्न करणारे सरकार तर दुसरीकडे, वाट्टेल ते झाले तरी पुन्हा मोदी सत्तेवर येता कामा नयेत, हा एककलमी कार्यक्रम हाती घेतलेले विरोधक असे चित्र देशात दिसत आहे. हे सर्व लक्षात घेता हीच वेळ आहे देशहित, राष्ट्रैक्य या महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करणार्‍या पक्षास पाठिंबा देण्याची आणि देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा बोलणार्‍या नेत्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची!

 

निवडणूक आयोगाने लोकसभेच्या ५४३ जागांसाठी कशाप्रकारे मतदान होणार आहे, याचा कार्यक्रम घोषित केला. तसेच आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा आणि विविध ठिकाणच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला. निवडणूक कार्यक्रम घोषित होताच त्याबद्दल आक्षेप घेण्यास काहींनी सुरुवात केली. सुरक्षाव्यवस्था योग्य प्रकारे ठेवता यावी, त्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवडणूक सात टप्प्यांमध्ये घेण्यात येत असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. असे सांगूनही अमुक राज्यातील निवडणूक एका टप्प्यात आणि त्याच्या शेजारच्या राज्यातील निवडणूक अनेक टप्प्यांमध्ये का, अशा हरकती उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. ओडिशामध्ये चार टप्प्यांत आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये एका टप्प्यामध्ये मतदान का? प. बंगालमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान का? मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुका एका दिवसात पार पडल्या असताना त्या राज्यात लोकसभेच्या निवडणुका चार टप्प्यांमध्ये का? महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान का? असे प्रश्न आयोगास विचारले जात आहेत. खरे म्हणजे अशा शंका, प्रश्न यांना तसा काही अर्थ नाही. लोकशाहीतील महत्त्वाच्या संस्थांचे विद्यमान सरकार खच्चीकरण करीत असल्याचा आरोप करणार्‍यांकडून असे अनेक आरोप केले जाऊ शकतात. अशा मंडळींकडून अन्य कोणती अपेक्षा करणार?

 

आता निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असल्याने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, विरोधी पक्ष अजून एकत्र आल्याचे चित्र दिसत नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी वेगळी, तिसरी आघाडी वेगळी, सप आणि बसप यांची आघाडी वेगळी असे चित्र दिसत आहे. विरोधकांची मोट बांधण्यात राहुल गांधी, चंद्राबाबू नायडू, शरद पवार, ममता बॅनर्जी, एच. डी. देवेगौडा, मायावती, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आदी नेत्यांना फारसे यश आले आहे, असे दिसत नाही. विरोधी ऐक्याचे प्रयत्न गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहेत. पण ते ऐक्य साधणे जमलेले नाही. आता महिन्यात ते ऐक्य साधले जाईल? ऐक्य कशासाठी, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. विद्यमान भाजप सरकारच्या कार्यक्रमांना पर्याय देणार्‍या कोणत्याही कार्यक्रमांची योजना विरोधकांकडे नाही. केवळ नरेंद्र मोदी आणि भाजपला विरोध हा एककलमी कार्यक्रम त्यांच्याकडून राबविला जात आहे. नरेंद्र मोदी यांना सत्तेवर येऊ न देणे एवढाच विरोधकांचा कार्यक्रम असेल तर मतदार त्यांच्याकडे वळणे शक्य आहे का? २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने अनेक कल्याणकारी उपक्रम राबविले. सामान्य जनता, शेतकरी यांच्या भल्यासाठी प्रयत्न केले. ‘सब का साथ, सब का विकास’ हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून सातत्याने प्रयत्न केले. पण विरोधकांनी नकारात्मक राजकारण करून मोदी सरकारची बदनामी करण्याची संधी सोडली नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा लौकीक वाढविण्याचे चांगले कार्य मोदी सरकारने केले असताना त्या कामांचे कौतुक करणे दूर, त्या सरकारची बदनामी कशी होईल, याकडेच विरोधकांनी लक्ष दिले.

 

मोदी सरकारने आपल्या कारकिर्दीत काहीच चांगले काम केले नाही, असे दाखवून देण्याचा विरोधकांचा प्रयत्न राहिला. मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे जनतेचे कसे नुकसान झाले, वस्तू आणि सेवा करामुळे सर्वसामान्य व्यापार्‍यांची कशी परवड झाली, देशात बेकारी किती वाढली, शेतकर्‍यांच्या समस्या कशा सुटल्या नाहीत, अशा मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारची जितकी बदनामी करता येईल, तितकी केली. प्रचाराच्या आगामी काळात तर ती आणखी केली जाईल. पण असे असूनही देशातील मतदारांना आपल्याकडे खेचण्याचे विरोधकांना जमल्याचे दिसून येत नाही. अपप्रचारात विरोधक किती ‘सफल’ झाले, हे २३ मे, २०१९ रोजी दिसून येणार आहे. देशातील जनतेची ‘मन की बात’ त्या दिवशी उघड होणार आहे.

 

विरोधकांनी सरकारची बदनामी किती आणि कशी करावी याला काही मर्यादा हवी की नको? लोकशाहीत भाषणस्वातंत्र्य आहे म्हणून काहीही बरळत सुटायचे? राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरून ‘चौकीदार चोर है’ अशी टीका करण्यापर्यंत मजल मारायची? पंतप्रधानांना एखाद्याने ‘नीच’ म्हणायचे, एखाद्याने ‘अतिरेकी’ म्हणायचे, कोणी ‘हुकूमशहा’ म्हणायचे हे अतीच झाले! अशी टीका करणारी मंडळी राजकारणात मुरलेली, तर काही त्यांच्या पक्षात महत्त्वाच्या पदांवर असलेली. पण काय बोलावे याचे भान या नेत्यांना नसल्याचे दिसून आले. जो चांगला कारभार करीत आहे, त्यावर वाट्टेल ते आरोप केले म्हणजे आपली सर्व पापकर्मे लपून राहतील असे या नेत्यांना वाटते की काय?

 

मोदी सरकारने आपली विविध कामे जनतेपुढे सादर केली आहेतच. त्याचप्रमाणे देशाच्या सार्वभौमत्वास आपले सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचेही दाखवून दिले आहे. पुलवामा घटनेनंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ‘जैश -ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हवाई हल्ले करून सरकारने ते दाखवून दिले आहे. निवडणुका तोंडावर आल्या असताना, ही जी धडाकेबाज कारवाई केली, त्याचे तोंडभरून कौतुक करण्याऐवजी त्यास फाटे फोडण्याचे काम विरोधक करीत आहेत. ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पुरावे मागत आहेत. या कारवाईमुळे मोदी यांची लोकप्रियता वाढल्याने विरोधक धास्तावल्याने ते असे बेभान आरोप करीत सुटले आहेत, हे उघडच आहे. राष्ट्राच्या अपमानाचा बदला घेणारी मंडळी निवडणुकांवर डोळा ठेऊन कोणतीही कृती करीत नसतात, हे या नतद्रष्ट मंडळींच्या कधी लक्षात येणार?

 

निवडणुकीच्या रणधुमाळीत मोदी सरकारवर अनेक आरोप करण्याचा प्रयत्न विरोधक करणार हे उघडच आहे. पण देशातील मतदार जागरूक आहेत. कोण काम करीत आहे आणि कोण फुकाची बडबड करीत आहे, ते जनता चांगले ओळखून आहे. त्यामुळे आपला कौल कोणाला असणार, हे जनता २३ मे, २०१९ रोजी सर्व जगाला दाखवून देणार आहे!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat




@@AUTHORINFO_V1@@