चाबहारने मोडले पाकचे कंबरडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2019   
Total Views |




शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, हे सार्वकालिक सत्य सर्वांनाच माहिती असेल. आंतरराष्ट्रीय राजकारणातही या रणनीतीचा वापर करून शह-काटशहाचे डावपेच आखले आणि तडीसही नेले जातात. आता भारतानेदखील याच नीतीचे अनुसरण करत पाकिस्तानला तगडा झटका दिल्याचे दिसते. देशोदेशी कटोरा घेऊन भीक मागण्यापर्यंत अधःपतन झालेल्या पाकिस्तानचे भारताने उत्पन्नाच्या व व्यापाराच्या पातळीवर दात घशात घालण्याचे काम केले आहे. पाकिस्तानचा शेजारी देश म्हणजेच अफगाणिस्तानबरोबरील व्यापार घटून निम्म्याच्याही खाली आल्याचे नुकतेच समोर आले असून त्याला कारण ठरले ते भारताचे म्हणजेच नरेंद्र मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण.

 

दहशतवाद्यांना पाळून, त्यांना पोसणार्‍या पाकिस्तानला चहूबाजूंनी घेरण्याची मोहीम भारताने हाती घेतली व त्याची चांगली फळेही दिसू लागली. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून भारताला पाठिंबा आणि समर्थन मिळत असतानाच आता पाकिस्तानला अफगाणिस्तानने चांगलाच दणका दिला आहे. दोन्ही शेजारी देशांमधील द्विपक्षीय व्यापार कधीकाळी ५ अब्ज डॉलर्सवर होता, तोच आता थेट दीड अब्ज डॉलर्सपर्यंत घसरला आहे. अर्थातच दोन्ही देशांतील व्यापारघटीमध्ये सर्वात मोठी भूमिका वठवली, ती भारताच्या सहकार्याने इराणी सागरकिनार्‍यावर उभारण्यात आलेल्या चाबहार बंदराने!

वस्तुतः भारताला चारही बाजूंंनी जमिनीने वेढलेल्या अफगाणिस्तानपर्यंत जाण्यासाठी पाकिस्तान नेहमीच आडकाठी आणत असे. यावर तोडगा काढण्यासाठी भारताने इराणमार्गे अफगाणिस्तानात मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला. भारताने यासाठी इराणच्या चाबहार बंदरात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आणि इराण ते अफगाणिस्तानपर्यंत रस्तेमार्गाचीही निर्मिती केली. परिणामी इराणच्या चाबहार बंदरातून भारताला थेट अफगाणिस्तानात जाण्याचा व अफगाणिस्तानला रस्तेमार्गाने थेट समुद्रापर्यंत येण्याचा पर्याय खुला झाला व पाकिस्तानला त्याची जागाही दाखवून देता आली. आता इराण चाबहार बंदराला अफगाणिस्तानशी जोडण्यासाठी रेल्वेमार्गाचीही उभारणी करत आहे. काही महिन्यांपूर्वीच भारताने चाबहार बंदरामार्गे अफगाणिस्तानला १.१ दशलक्ष टन गहू आणि २००० टन मसूर डाळीची निर्यात केली होती. सोबतच दोन्ही देशांनी २०१७ साली हवाई वाहतूक मार्गही स्थापित केला होता. शिवाय अफगाणिस्ताननेही गेल्याच महिन्यात इराणच्या चाबहार बंदरामार्गे भारतात निर्यातीला सुरुवात केली होती, अर्थात पाकिस्तानला टाळूनच!

 

अफगाणिस्तानने याआधी ५७ टन सुकामेवा, कापड व वस्त्रे, कार्पेट आणि मिनरल प्रॉडक्ट्ससह २३ ट्रक पश्चिम अफगाणिस्तानातील जारंज शहरातून इराणच्या चाबहार बंदरातून भारताकडे रवाना केले होते. तिथून पुढे ही खेप मालवाहू जहाजाच्या साहाय्याने मुंबई बंदरापर्यंत पोहोचली. २०१८ मध्ये अफगाणिस्तानची भारतातली निर्यात ७४० दशलक्ष डॉलर्स होती आणि भारत हे अफगाणिस्तानसाठी सर्वात मोठे निर्यात केंद्रही ठरलेदुसरीकडे सर्वच बाजूंनी जमीन आणि जमीन असलेला तसेच प्रदीर्घ काळापासून युद्धग्रस्त असलेला अफगाणिस्तान अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी परकीय बाजारपेठांशीही संपर्क साधत आहे.

 

मात्र, पाकिस्तानची नाकेबंदी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आखलेल्या मुत्सद्देगिरी व धोरणीपणातून त्या देशाला जबर धक्का बसला. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानदरम्यानचा द्विपक्षीय व्यापार पाच अब्ज डॉलर्सच्या सर्वोच्च पातळीवरून गडगडत गेल्या वर्षी सरळ दीड अब्ज डॉलर्सवर आला. परिणामी पाकिस्तानच्या राजकोषात खडखडाट झाला अन् तो देश कंगालीच्या, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला. उल्लेखनीय म्हणजे इराणमधील चाबहार बंदर जिथे आपल्या पूर्ण क्षमतेने काम करताना दिसते, तिथेच पाकिस्तानच्या समुद्री हद्दीतील ग्वादर बंदरात मात्र मालाची ने-आण अजूनही अतिशय कमीच असल्याचे पाहायला मिळते.

 

चीनच्या प्रचंड कर्जाच्या मदतीने बलुचिस्तानमधील ग्वादर येथे या बंदराची निर्मिती करण्यात आहे परंतु, आगामी ४० वर्षापर्यंत चिनी कंपनीलाच ग्वादरच्या उत्पन्नातील ९१ टक्के वाटा मिळेल तर पाकिस्तानला फक्त ९ टक्के. याव्यतिरिक्त हा ४० वर्षांचा बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर-बीओटी करार आहे, जो की तांत्रिकदृष्ट्या भाडेपट्ट्यापेक्षा निराळा आहे. याचाच अर्थ येत्या ४० वर्षांपर्यंत पाकिस्तान ग्वादर बंदरावर हक्क गाजवू शकत नाही, तर भारताने बांधलेल्या चाबहार बंदरामुळे व्यापार वाढल्याचे दिसतेच. सोबतच इराण, अफगाणिस्तान व भारताचाही फायदा होत आहे. अन् तेही पाकिस्तानला वाकुल्या दाखवून!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@