चोराच्या वाटा चोराला ठाऊक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2019   
Total Views |

 

 
 
 
 
सरकारचा नाही भरवसा, मतदान यंत्रे तपासा... असे म्हणणाऱ्या उमेदवाराचा उत्साह काय वर्णावा? आता हे कोण कुणाला म्हणाले, हे काय सांगावे लागणार आहे? ‘आता उरलो पंतप्रधानपदाच्या स्वप्नापुरता...’ म्हणता म्हणता राष्ट्रपतीपदासाठीही या उमेदवाराने आखाडा मांडला होता. आता या आखाड्यात सगळे त्यांच्यासारखेच बेभरवशाचे भिडू होते, ही गोष्ट वेगळी म्हणा. असो. तर मुद्दा असा की, या उमेदवाराने त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले किंवा राजकीय पक्षांच्या भाषेत संकल्प दिला की, बाबांनो मतदान यंत्रे तपासा. सगळ्या बुथप्रमुखांनी सकाळी सहालाच जाऊन प्रथम मतदान यंत्राची तपासणी करावी. वरवर साधे दिसणारे वाक्य. पण नेत्याचे आदेश पडते फळ मानून स्वीकारणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांच्या चमच्यांची संख्या कमी नाही. आपल्या नेतोबाला खुश करण्यासाठी हे चमचोबा काहीही करतात. त्यामुळे कल्पना करा की, मतदानाचा दिवस उजाडला आहे. सकाळचे सहा वाजले आहेत आणि या बारा वाजलेल्या घड्याळाचे बुथप्रमुख मतदान यंत्र तपासत आहेत. पण मतदान यंत्र तपासायचे म्हणजे नक्की काय करायचे? आपल्या नेत्याच्या राजकीय पक्षाचे चिन्हच मतदान यंत्रात दिसेल, असे काही पाहायचे का? याबाबत नक्कीच बुथप्रमुखांच्या मनात साशंकता असणार. असो, ही बेकारभिकार कल्पना आहे खरी. पण मतदान यंत्र तपासाचे हे असे आदेश देऊन उमेदवार काय सिद्ध करू पाहताहेत? निवडणूक आयोग भ्रष्ट आहे? देशभर प्रत्येक मतदान यंत्रावर काम करणारा प्रशासकीय अधिकारी विकाऊ आहे? सगळेच भ्रष्ट आहेत. फक्त हे उमेदवार आणि त्यांच्या मागेपुढे हाजी हाजी करणारे तेवढेच प्रामाणिक आहेत? या उमेदवाराला कोण सांगणार की, शासन कोणतेही असो, निवडणूक आयोगाने निवडणुकीची चोख व्यवस्था लावलेलीच असते. कारण प्रशासनातील चाणक्यांना माहिती असते, नेते काय आज आज आहेत, उद्या नाहीत. पण आपल्याला रिटायरमेंटपर्यंत नोकरी कायम आहे. त्यामुळे ते शक्यतो कोणतीही चालबाजी न करता निवडणूक यंत्रणेतील पारदर्शीपणा जपण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उठवण्याचे कारण नाही. पण छे! या उमेदवाराला असे सांगून फायदाही नाही. कारण गेली कित्येक दशके या उमेदवाराने सत्ता भोगली म्हणजे अक्षरशः उपभोगली. त्यामुळे या वाटेतले खाचखळगे त्यांना चांगलेच ठाऊक. ती आपली म्हण आहे ना, चोराच्या वाटा चोराला ठाऊक.
 

बिचारी विजयाशांती..

 

काँग्रेसच्या काळात अभिनयाचे खोऱ्याने पुरस्कार मिळवणारी अभिनेत्री विजयाशांती काँग्रेसची नेताही आहे. तर या विजयाशांतींना पंतप्रधान नरेंद्र मोदींची भीती वाटते. “पंतप्रधान दहशतवाद्यांसारखे दिसतात आणि त्यांनी लोकशाहीची हत्या केली,” असेही विजयाशांती म्हणाल्या आणि ते कधीही बॉम्ब टाकतील अशीही भीती विजयाशांतींना वाटते. अरेरे! बिचाऱ्या विजयाशांती. काय बरं झालं त्यांना? कारण माणसाला सारखी कशाची ना कशाची भीती वाटणे, जे नाहीय तेच आहे असे वाटणे, सारखं वाटणे की, कुणीतरी आपल्यावर बॉम्ब टाकेल? तर अशी बिनबुडाची भीती वाटणाऱ्या घाबरट माणसाला काय म्हणतात? कुणीही सांगेल की, ती व्यक्ती मानसिक रुग्णच असावी. विजयाशांतींनी ही अशी भीती कुठल्याही भीतीदायक वातावरणात, स्थळीकाळी व्यक्त केली नाही. तर त्या हे राजकीय पक्षाच्या बैठकीत बोलल्या. तिथे काँग्रेस पक्षाचे आलाकमान राजकुमार राहुल गांधीही होते. लोकशाही संकेतानुसार कायदा व्यवस्थेच्या सुरक्षित वातावरणात ती बैठक सुरू होती. लोकशाहीचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य वापरत विजयाशांती पंतप्रधानांच्या दिसण्याबाबत बोलत होत्या. त्यांच्या बोलण्यात भीती कमी आणि पंतप्रधानांची निंदा, अनाकलनीय हेवा, तिरस्कार होता. आलूपासून सोना बनविण्याची अगाध बुद्धी असलेल्या आपल्या शक्तिमान नेत्याला खुश करण्याचा बेरकी प्रयत्न होता. खरेतर आपल्या मनात जे असते तेच आपल्याला दिसते. डोळे बिचारे तर बघण्याची नुसती भूमिका निभावतात. विजयाशांती तरी काय करतील? त्यांना काँग्रेस पक्षात दिग्गी, सिद्धू, शशी थरूर आणि बरेच बरेच महानुभव भेटत असतील, शिवाय पक्षाध्यक्ष राहुल आहेतच. विजयाशांतींना या सर्वांचा अकल्पित शब्दातीत वैचारिक वारसा चालवायची इच्छा आहे, असे दिसते. बाकी विजयाशांतींनी ध्यानात घ्यावे की, कोण्या एका सिनेमाचे हिरो होते म्हणून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाहीत. देशाने त्यांच्या कार्यक्षमतेमुळे त्यांना पंतप्रधान बनवले. नेता बनवले. पण विजयाशांतींना हे कळणार नाही, कारण त्या केवळ आणि केवळ सुस्वरूप दाक्षिणात्य सिनेअभिनेत्री होत्या म्हणून त्या काँग्रेसच्या नेतेपदी आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@