आम्हीच आमचे शत्रू...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Mar-2019   
Total Views |


 
 

सुरुवात होण्याआधीच संपण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू करण्याचा काहींचा स्वभाव असतो. काहीही चांगलं करणं बहुधा या मंडळींना जमतच नसावं. आपल्या आजूबाजूला अशी अनेक मंडळी आढळतात. यांचं नुकसान करण्यासाठी आपल्याला फारसं काही करावं लागत नाही, ते स्वतःच स्वतःचं नुकसान करून घेतात. अशी अनेक माणसं एकत्र आली की त्याला बहुधा ‘महागठबंधन’ किंवा ‘तिसरी आघाडी’ म्हणतात! भारतात या तिसर्‍या आघाडी प्रकरणाची गेल्या अनेक वर्षांची वैभवशाली परंपरा आहे. विशेषतः, १९९६ ते १९९८ या काळात या मंडळींनी जे काही कर्तृत्व गाजवलं, त्यामुळे अवघ्या देशाचे डोळे दिपून गेले होते. या मंडळींपैकी आघाडीचं नाव म्हणजे कर्नाटकातील जनता दल सेक्युलर या पक्षाचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा. त्यांचे पुत्र आणि कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी हे सध्या आपल्या वडिलांचा वारसा समर्थपणे चालवत आहेत, असं त्यांच्या वक्तव्यावरून दिसतं. संपूर्ण देशातील वातावरण देवेगौडांसाठी अनुकूल असून ते यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचं कुमारस्वामी नुकतेच एका कार्यक्रमात म्हणाले. वास्तविक, हा काही विनोदी कार्यक्रम नव्हता तरीही ते असं बोलून गेले. आता हे कुमारस्वामी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून ती खुर्ची कशी टिकवता येईल, याच्या विवंचनेत आहेत. रोज नव्याने वेगवेगळ्या भानगडींमुळे त्यांचं सरकार संकटात सापडत आहे. कधी त्यांचे वा सहयोगी काँग्रेसचे आमदार फुटतील आणि भाजपच्या गोटात जाऊन बसतील, याचा नेम नाही आणि यांना स्वप्नं पडतात ती पंतप्रधानपदाची. म्हणूनच सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या अशा मंडळींचं वाटोळं करण्यासाठी इतरांनी काही करण्याची गरजच पडत नाही. ते स्वतःच स्वतःचं वाटोळं करण्याची क्षमता राखतात. एकतर आधीच हे महागठबंधन एकत्र येता येता लोकांना घाम फुटलाय. अखिलेश-मायावतींनी केव्हाच ठेंगा दाखवला आहे. त्यात ममता बॅनर्जी वगैरे मंडळींच्या महत्त्वाकांक्षांना नेहमी उकळ्या फुटत असतातच. त्यात आता हे कानडी महत्त्वाकांक्षेचं भूत काँग्रेस आणि राहुल गांधींच्या मागे उभं राहणार असल्याचं दिसतं. 

 

अजूनही कुमार मी...

खरंतर, एच. डी. देवेगौडा हे देशाचे ११वे पंतप्रधान. जून, १९९६ ते एप्रिल, १९९७ अशा जवळपास दहा महिन्यांच्या कालावधीत त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अनेक छोट्यामोठ्या पक्षांचं कडबोळे करून सरकार चालवलं. पुढे इंद्रकुमार गुजराल असेच पंतप्रधान झाले आणि आठ-दहा महिने टिकले. देवेगौडांवर अविश्वास ठराव आला तेव्हा लोकसभेत भाजप नेते प्रमोद महाजन यांनी केलेलं भाषण आजही प्रसिद्ध आहे. या भाषणात महाजनांनी देवेगौडा आणि या युनायटेड फ्रंट प्रकरणाचे अक्षरशः वाभाडे काढले होते. आता वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांना म्हणे पुन्हा पंतप्रधानपदाची स्वप्नं पडत आहेत आणि त्यांच्यापेक्षा जास्त त्यांच्या चिरंजीवांना ही स्वप्नं जास्त पडत असल्याचं दिसतं. अर्थात, उतारवयातही पंतप्रधान बनण्याची आशा ठेऊन असलेल्या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील एक नावसुद्धा घ्यावं लागतंच. तो पुन्हा स्वतंत्र विषय. तर, लोकसभेच्या कर्नाटकातील एकूण २८ जागांपैकी २०-२२ जागांवर काँग्रेस-जेडीएस आघाडी विजय मिळवेल आणि मग आपले वडील पंतप्रधान होतील, अशी या कुमारस्वामींची भविष्यवाणी. देशातील ५४३ जागांपैकी २७२ हा बहुमताचा आकडा. विद्यमान लोकसभेत जेडीएस पक्षाचे २ खासदार आहेत. असं असताना या अशा भविष्यवाणीपूर्वी कुमारस्वामी नेमकं कोणतं रसायन घेऊन आले होते, हा संशोधनाचा विषय ठरतो. एकतर कुमारस्वामी काहीतरी जालीम रसायन घेऊन आले असावे किंवा ते अजून कुमारवयातच राहिले असावेत, असं मानायला नक्कीच वाव आहे. ‘ऑपरेशन लोटस’चं वादळ शांत होऊन काही दिवसदेखील उलटलेले नाहीत. जेडीएस-काँग्रेसच्या अंतर्गत वादांच्या एकामागोमाग एक भानगडींतून उसंत शोधता शोधता कुमारस्वामींना भर कार्यक्रमात ढसाढसा रडायची वेळ आली होती. त्या घटनेला काही महिनेही अजून उलटलेले नाहीत. “मी दलित असल्यामुळे माझी मुख्यमंत्रिपदाची संधी वारंवार हुकली,” असं विधान कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी करून एक आठवडाही उलटलेला नाही, त्यामुळे कर्नाटकात ‘जॅकपॉट’ म्हणून मिळालेली मुख्यमंत्रिपदाची खुर्ची टिकवता टिकवता नाकी नऊ येत असताना थेट वडिलांच्या पंतप्रधानपदाची स्वप्नं पाहणं, हे या महाशयांच्या एकूण आवाक्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@