कृष्णातीरी रंगला 'त्रिवेणी साहित्य संगम'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2019
Total Views |


 

 

गदिमा, पुल, बाबुजींनी साहित्याचे सत्तानिरपेक्ष सामर्थ्य सिद्ध केले : डॉ. अरूणा ढेरे

 

(महा MTB विशेष प्रतिनिधी)

वाई : साहित्यात सत्तानिरपेक्ष सामर्थ्य असते, हे गदिमा, पुल आणि बाबुजी या तिघांनी सिद्ध केले. त्यामुळे त्यांना देश-काल निरपेक्ष अधिराज्य मिळाले, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व ९२ अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरूणा ढेरे यांनी केले.

 

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मराठी भाषा विभागातर्फे वाई येथे आयोजित 'त्रिवेणी साहित्य संगमा'चे उद्घाटन डॉ. अरूणा ढेरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष तथा दै. मुंबई तरूण भारतचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, मराठी भाषा विभाग सहसचिव अपर्णा गावडे, वाईच्या नगराध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. अरूणा ढेरे यांनी ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे व सुधीर फडके यांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबाबत सविस्तर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, या त्रयींच्या नावांचे उच्चारही आठवणी जाग्या करतात. त्या आठवणी श्रुतींच्या, स्वरांच्या, शब्दांच्या आहेत. या आठवणी आपल्या जीवनाच्या अविभाज्य भाग आहेत. बदलत्या काळात, ताणतणावात या आठवणींची गोडी चाखायला मिळणे, ही अपूर्व गोष्ट असल्याचे त्या म्हणाल्या.

 

त्रिवेणी साहित्य संगम हा या त्रयींच्या कार्यकर्तृत्वाची ताकद आठवण्याचा उत्सव असल्याचे त्या म्हणाल्या. आपण जयंत्या-पुण्यातिथ्या भरपूर साजरे करतो. परंतु, या तिघांचे मोठेपण कशात होते, हे या दोन दिवसीय कार्यक्रमातून आपण समजून घेतले पाहिजे. या तिघांनी नुसता काळ गाजवलाच नाही तर आपला काळ घडवला. जनसामान्यांच्या सांस्कृतिक जाणीवा, अभिरुची घडवली, असे ढेरे यांनी नमूद केले. साहित्यात सत्तानिरपेक्ष सामर्थ्य असते, हे या तिघांनी सिद्ध केले आणि त्यामुळे देश-काल निरपेक्ष अधिराज्य त्यांना मिळाले, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

 

 
 

पुलंविषयी बोलताना अरूणा ढेरे म्हणाल्या की, पुलंनी जीवनाचा आस्वाद मनमुरादपणे घ्यायला शिकवले. विनोद निर्विषय असला पाहिजे, हे त्यांनी सांगितले. पु. ल. देशपांडे यांचा विनोद विषारी नव्हता, असे त्यांनी नमूद केले. गदिमांच्या जन्माच्या वेळी घडलेला प्रसंग सांगत त्या म्हणाल्या की, गदिमा मृत्यूच्या दाढेतून परतले, ते बहुधा आपल्या सर्वांसाठीच. गदिमा आणि बाबुजी यांनी मराठी भावगीतांची परंपरा मराठी चित्रपटगीतांना जोडली. लोकांच्या ओठावरील भाषा आणि महाकवीची अपूर्व प्रतिभा हे गदिमांच्या यशाचे गमक असल्याचे त्या म्हणाल्या. बाबुजी अर्थात सुधीर फडकेंबद्दल बोलताना अरूणा ढेरे म्हणाल्या की, बालगंधर्वांची नाट्यगीतांची परंपरा लोप पावत असताना बाबुजींनी अभिजात-ललित संगम घडवत भावसंगीत घडवले. नव्याने उदयाला आलेल्या मध्यमवर्गीय समाजाला आपला स्वर बाबुजींच्या गळ्यात गवसला, असेही मत डॉ. ढेरे यांनी व्यक्त केले.

 

विश्वकोश मंडळाच्या कामाची प्रशंसा

यावेळी डॉ. अरूणा ढेरे यांनी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कामाचे विशेष कौतुक केले. महाराष्ट्रात कोशवाङमयाची परंपरा समृद्ध असल्याचे सांगत त्या म्हणाल्या की, मंडळाचे विद्यमान अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी नव्या काळाला अनुसरून विश्वकोशाचे अद्ययावतीकरण आणि संगणकीकरण हाती घेतले आहे. शास्त्रीय माहिती देणारे साधन एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याने विद्यार्थी स पालक आणि शिक्षकांनी कोशवाङमयाकडे वळणे आवश्यक असल्याचे मत अरूणा ढेरे यांनी व्यक्त केले.

 

पुल, गदिमा, बाबुजी हे जीवनाचे भाष्यकार

पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके हे नुसते साहित्यिक, कलाकार नव्हते तर जीवनाचे भाष्यकार होते, असे प्रतिपादन विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी केले. गदिमा यांनी साहित्याच्या आणि पुल यांनी विनोदाच्या माध्यमातून भाष्य केले. कोणतेही साहित्य लोकप्रिय होण्यासाठी त्यांना स्वरांचा साज आवश्यक असतो. कारण संगीत ह्रदयाला भिडते. हे काम बाबुजींनी केल्याचे करंबेळकर यांनी सांगितले. यावेळी दिलीप करंबेळकर यांनी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला.

 

त्रिवेणी साहित्य संगमाच्या या उद्घाटन कार्यक्रमात मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या ज्ञानमंडळाच्या तसेच कुमार विश्वकोशाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण आणि विश्वकोशाच्या सूचीखंडाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@