रामायण हा भारताचा धर्मनिरपेक्ष वारसा : अविनाश धर्माधिकारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2019
Total Views |


 


वाई : आदर्श, न्याय-नीतीचे राज्य म्हणजे 'रामराज्य' असे आपल्याकडे म्हटले गेले आहे. त्यामुळे रामायण हा भारताचा धर्मनिरपेक्ष वारसा असल्याचे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी व लेखक अविनाश धर्माधिकारी यांनी केले. त्रिवेणी साहित्य संगमाच्या चौथ्या सत्रात 'गीतरामायण : सांस्कृतिक परिणाम' या विषयावर अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी धर्माधिकारी यांनी रामायण, रामायणाचा सांस्कृतिक वारसा, या वारशावर आघात करण्याचे होणारे प्रयत्न, गीतरामायण, गदिमा-पुल-बाबूजी यांचे कार्य आदींवर सविस्तरपणे आपले मत मांडले. ते म्हणाले की, भारतीय जनमानसावर रामायणाची पकड आहे. ही पकड गीतरामायणाने आणखी पक्की केली. गीतरामायणासारखा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यवस्था निर्माण व्हायला हव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

गीतरामायण हे आपले अस्तित्वभान असून ते जपले जाण्याची गरज धर्माधिकारी यांनी यावेळी व्यक्त केली. चिकित्सेच्या नावाखाली रामायणाची एकांगी मांडणी करण्याचे खूळ सध्या प्रचलित असल्याची टीकाही धर्माधिकारी यांनी केले. ते म्हणाले की, गेल्या ७० वर्षांत आपला इतिहास ज्याप्रकारे लिहिला गेला, पाठ्यपुस्तके ज्या पद्धतीने लिहिली गेली, त्यात रामायण-महाभारताला उचित स्थान दिले गेले नाही. आर्य-द्रविड वादाच्या रूपाने इंग्रज व इंग्रजकालीन इतिहासकारांनी भारताच्या सांस्कृतिक एकात्मतेवर पाचर मारून ठेवल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राम म्हणजे आर्य, उत्तर भारतीय आणि रावण म्हणजे अनार्य, दक्षिण भारतीय याप्रकारची मांडणी करून समाजात फूट पाडण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांवर त्यांनी कडाडून टीका केली. रामायण हे भारताला सर्व धर्म, जाती पंथांच्या पलीकडे जाऊन जोडणारा संपूर्ण भारताचा धर्मनिरपेक्ष वारसा असल्याचे धर्माधिकारी यांनी यावेळी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@