पर्यावरण सहिष्णू सामाजिक वनीकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2019   
Total Views |



नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सामाजिक वनीकरण विभागामार्फतरानमळा योजना’ राबविण्यात येणार असून या अंतर्गत आनंद वृक्ष, स्मृती वृक्ष, माहेरचा वृक्ष, शुभमंगल वृक्ष आणि शुभेचा वृक्ष अशा पाच प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. मानवी जीवनात घडणाऱ्या घडामोडींना लक्षात घेत या योजनेचे स्वरूप ठरविण्यात आले आहे, त्याविषयी...


जंगलातील अधिवास संरक्षित करण्यासाठी वन विभाग आपले कार्य अत्यंत सचोटीने करत असते. मात्र, सिमेंटच्या जंगलातील मनुष्याचा अधिवास सुरक्षित करणे, त्याला पर्यावरणपूरक जीवनमान व्यतीत करता येण्यासाठी उपाययोजना करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक सहभागातून निसर्गातील चैतन्य बहरण्यासाठी कार्य करणे हे पर्यावरणसहिष्णू काम शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत केले जाते. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सामाजिक वनीकरण विभागामार्फत ‘रानमळा योजना’ राबविण्यात येणार असून या अंतर्गत आनंद वृक्ष, स्मृती वृक्ष, माहेरचा वृक्ष, शुभमंगल वृक्ष आणि शुभेचा वृक्ष अशा पाच प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. मानवी जीवनात घडणाऱ्या घडामोडींना लक्षात घेत या योजनेचे स्वरूप ठरविण्यात आले आहे. अपत्याच्या जन्मावेळी शुभेचा वृक्ष, मुलीच्या विवाहाप्रीत्यर्थ व तिचे माहेरपण जपण्यासाठी माहेरचा वृक्ष, विवाहाप्रीत्यर्थ शुभमंगल वृक्ष, जीवनातील कोणत्याही आनंदाच्या क्षणी आनंद वृक्ष व दिवंगताच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मृती वृक्ष यांची लागवड करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यात प्रतिवर्षी पाच हजार वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन असून नागरिकांच्या मागणीनुसार त्यांना वृक्ष वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी श्याम रनाळकर यांनी दिली.

 

मानवाचा अधिवास असलेल्या भूभागावर किमान ३५ टक्के तरी वने असणे हे जीवनमान व्यतीत करण्यासाठी अत्यावश्यक आहे. सृष्टीचा समतोल राखला जावा आणि निरामय आणि संतुलित आयुष्य जगता यावे यासाठी सभोवती हिरवळ असणे आवश्यक आहे. मात्र, दुर्दैवाने आपल्या राज्यात केवळ २० टक्के वनक्षेत्र असल्याने तो १३ टक्क्यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी १९८२ मध्ये सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना करण्यात आली. या विभागाची स्थापना होण्यापूर्वी, समाजातील काही घटकांचे जीवनमान हे जंगलातील साधनसामुग्रीवर म्हणजे, उपलब्ध होणाऱ्या लाकूड, बिडी पत्ता, मध, डिंक, मोहफुले, हिरडा, बेहडा यावरच आधारित होते. यांची जमवाजमव करण्यासाठी नागरिक जंगलात जात तसेच, जंगलात या वृक्षांची निगा राखणारेही कोणी नसे. त्यामुळे जंगलाचा अधिवास धोक्यात येई व गुणवत्तापूर्ण उत्पादनदेखील प्राप्त होत नसे. त्यामुळे वनीकरणावर दबाव वाढत होता. त्यामुळे उत्पन्न देणारी ही वृक्षवल्ली शेतात लावली, तर गुणवत्तापूर्ण उत्पादनाबरोबरच जंगलाचा अधिवासही संरक्षित होईल, या धारणेतून सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना करण्यात आली. समाजाच्या सहभागाने वनीकरण विभागामार्फत रस्त्याच्या दुतर्फा, ग्रामपंचायतीच्या पडीक जमिनींवर वनीकरण करण्यात येत असते. यासाठी विभागामार्फत ‘गट वनीकरण’ ही योजना राबविण्यात येत आहे. याद्वारेनाशिक जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यात १९८२ ते १९९२ या स्थापनेच्या दशकातच वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्यानंतर २००५ पर्यंत मनरेगा, रोहयो आदी प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून या विभागाने वनीकरणास मोठ्या प्रमाणात चालना दिली. मात्र, सन २०१४ नंतर या विभागाने आपले कार्य अधिक जोमाने करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार १४ एप्रिल, २०१८ पासून जीआर काढून मनरेगामार्फत सामाजिक वनीकरणास चालना देण्यात आली आहे.

 

शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, या राज्य शासनाच्या धोरणानुसार वृक्ष लागवड व संगोपन यांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करण्यावरदेखील २०१४ पासून मोठ्या प्रमाणावर भर देत आहे. फळे, फुले या माध्यमांतून ही रोजगारनिर्मिती नाशिक जिल्ह्यात होत आहे. तसेच, शेतकऱ्यांचे प्रबोधन करून त्यांना ‘विंड ब्रेक’ व ‘शेल्टर ब्रेक’ हे तंत्र आत्मसात करण्यास चालना देण्यात येत आहे. या माध्यमातून पिकांचे संरक्षण होण्यास मोठी मदत होत आहे. या माध्यमातून पिकांभोवती संरक्षण भिंत घालण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात विभागाच्या माध्यमातून नैसर्गिक ऊर्जास्त्रोतांबाबतदेखील जनजागृती करण्यात आली असून त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सौरचुली तसेच आरोग्यास अपाय होणार नाही अशा साधनांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच, विद्यार्थीदशेपासूनच पर्यावरणपूरक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावा, याकरिता ‘हरित शाळा’ ही संकल्पना नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या माध्यमातून वृक्ष संवर्धन व रोपण या उपक्रमात विद्यार्थ्यांचा थेट सहभाग दिसून येतो. विविध सण-उत्सवांमध्ये ज्या वृक्षांचे महत्त्व असते, अशा वृक्षांचे रोपण करण्यात येते. जसे, दसऱ्याला आपट्याचा वृक्ष, शिवरात्रीला बेल वृक्ष आदी. तसेच, ‘हरितशाळा’ या उपक्रमांतर्गत शाळेला तारांकन प्रदान करण्यात येत आहे. त्यानुसार आज नाशिक जिल्ह्यात २५० शाळांना विविध श्रेणीतील तारांकने प्राप्त झाली असून त्यातील ४० शाळा या पंचतारांकने प्राप्त शाळा आहेत.

 

‘कन्या समृद्धी’ योजनेचे नाशिक जिल्ह्यात ३५० लाभार्थी आहेत. तसेच, ग्रामसभा, पोस्टर यांच्या माध्यमातून जिल्हाभरात या योजनेबद्दल जनजागृती सुरू असून त्या माध्यमातून अधिक लाभार्थी संख्या वाढविण्याचे प्रयत्न सामाजिक वनीकरण विभागामार्फत करण्यात येत आहे. तसेच, नाशिक जिल्ह्यात या विभागामार्फत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करतानाविशिष्ट वृक्षांचा एक रस्ता’ साकारण्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरू आहे. यात चिंचरस्ता, कवठरस्ता, असे रस्ते साकारण्यात येणार आहेत. २०१९च्या पावसाळ्यात चिंचबन साकारण्यासाठी सुमारे दीड लाख चिंचेची रोपटी आणणार असून त्यांची लागवड पावसाळ्यात जिल्हाभर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकावर असणारी दुर्गंधी कमी व्हावी, यासाठी मनमाड, येवला अशा रेल्वे स्थानकांवर एक हजार पारिजात, चाफा, बकुळ या वृक्षांची लागवड सामाजिक वनीकरण विभागामार्फत करण्यात येणार आहे. तसेच, एकलहरा येथील औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्राच्या परिसरात निलगिरी वृक्षांचे वन साकारण्यात आले असून, या माध्यमातून येथील प्रदूषणास आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचप्रमाणे डीजीपी नगर परिसरातील केनोल रस्त्यावरील ‘वृक्षराजींची मांदियाळी’ ही सामाजिक वनीकरण विभामार्फतच साकारण्यात आली असून, विभागाचे तत्कालीन परिक्षेत्र अधीक्षक राजेंद्र कापसे यांचे यासाठी बहुमोल योगदान आहे. मानवाला व्यक्ती व संस्था यांच्या सहभागाने पर्यावरणपूरक सामाजिक परिवेश प्रदान करण्यासाठी सहिष्णूवृत्तीने खऱ्या अर्थाने सामाजिक वनीकरण विभाग बहुमोल कार्य करत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

 

वनीकरणास चालना देण्यासाठी शेतकऱ्यांचा सन्मान

 

वनीकरणास चालना देण्यासाठी प्रचार व प्रसिद्धी अभियानदेखील विभागामार्फत राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शेतकरी व ग्रामपंचायती यांनी चराई क्षेत्रात घट करावी व वृक्षतोड कमी करावी तसेच जंगलांवरचा भार कमी करावा, यासाठी प्रबोधन करण्यात येत आहे. तसेच, विभागाच्या कर्मचाऱ्यांना लोकभिमुख कार्य बजावता येण्यासाठी जनसंपर्क कसा साधावा, नर्सरी तंत्रज्ञान यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच, उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारा’ने गौरविण्यात येत असते. यात प्रतिवर्षी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हे सन्मानित होत असतात.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@