शील : राष्ट्रीय व वैयक्तिक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय श्री गुरुजी यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ पुस्तकात एक कथा आहे. गुजरातचा राजा कर्ण याचा स्वच्छ चारित्र्याचा पंतप्रधान वेदशास्त्रसंपन्न तर होताच, शिवाय विविध कला आणि विज्ञान यांच्यातही पारंगत होता. एकदा एका मोहाच्या क्षणी राजाने त्याच्या एका सरदाराच्या सौंदर्यवती पत्नीचे अपहरण केले. त्याच्या या कृतीने हा पंतप्रधान संतप्त झाला. राजाला या पापाबद्दल चांगली अद्दल घडविण्याचा त्याने निश्चय केला. या निश्चयासाठी त्याने कोणता मार्ग निवडला? त्याला माहीत होते की, गुजरातच्या उत्तर सीमेवर मुसलमानांचे सैन्य जय्यत तयारीत आहे. याआधी या सैन्याने गुजरातवर आक्रमण करून तो प्रदेश ताब्यात घेण्याचे बरेच, पण असफल प्रयत्न केले होते. हा पंतप्रधान थेट दिल्लीच्या मुसलमान सुलतानाकडे गेला आणि राजाला अद्दल घडविण्यासाठी त्याने या सुलतानाची मदत मागितली. गुजरातला पादाक्रांत करण्याची ही सुवर्णसंधी तो सुलतान सोडणार थोडीच होता. ज्या पंतप्रधानाला गुजरात राज्याच्या लष्कराची गुपिते माहीत होती, त्याच्या माहितीच्या आधारे सुलतानाचे सैन्य गुजरातवर चालून आले. आतापर्यंत, मुसलमान आक्रमकांना दक्षिणेत जाण्यास रोखून धरणारे कर्णावतीचे बलशाली राज्य, काही दिवसांतच मुसलमान सैन्यांकडून पराभूत झाले. त्यानंतर केवळ गुजरातच नाहीतर, संपूर्ण दक्षिण भारत मुसलमानांच्या अत्याचारी टाचेखाली आला. एवढे करून त्या पंतप्रधानाला काय मिळाले? त्या सुलतानाने राजाला तर ठार केलेच, शिवाय पंतप्रधानाच्या सगेसोयर्यांनादेखील कापून काढले. त्याच्या डोळ्यांदेखत अगणित स्त्रियांची अब्रू लुटण्यात आली. मंदिरे जमीनदोस्त करण्यात आली. एवढेच नाही तर, ज्या वास्तूत तो वेदपठन व पूजाअर्चा करीत असे, ती वास्तू गाईंचा कत्तलखाना करण्यात आली. आपल्या मातृभूमीचा प्रचंड मोठा प्रदेश शतकानुशतके गुलामगिरीत खितपत पडला, हे वेगळेच.
 
 
आपल्या लक्षात येईल की, एकीकडे राजाचे वैयक्तिक चारित्र्य कमजोर होते; परंतु त्याचे राष्ट्रीयतेचे भान मात्र स्पष्ट व बळकट होते. दुसरीकडे तो पंतप्रधान वैयक्तिक दृष्टीने अत्यंत धार्मिक, पापभिरू व चारित्र्यसंपन्न होता, परंतु त्याच्याजवळ राष्ट्रीय चारित्र्य नव्हते. त्यामुळे राष्ट्राच्या भल्यासाठी काय करायला हवे आणि काय करायला नको, याचा विवेक त्याच्यापाशी नव्हता. राष्ट्राच्या हितापेक्षा त्याला त्याच्या धार्मिकतेचे, वैयक्तिक चारित्र्याचे मोल अधिक होते. ज्या राज्याला या दोघांनी आपल्या परिश्रमाने सांभाळले होते, त्याच्या पतनाला राजा आणि पंतप्रधान दोघेही कारणीभूत ठरले. स्वत:चे चारित्र्य व धर्माबद्दलची विकृत संकल्पना असणारा हा पंतप्रधान आपल्या भारतातले एकमेव उदाहरण नाही. अशी अनेक उदाहरणे आपल्याला इतिहासात सापडतील. सोमनाथ मंदिराचा विध्वंस करणार्या मोहम्मद गझनीला मार्गदर्शन करणारे अत्यंत धार्मिक िंहदूच होते. शिवाजी महाराजांचे स्वराज्य नष्ट करण्यासाठी दक्षिणेत आलेला औरंगजेबाचा सरदार मिर्झा जयिंसह कट्टर शिवभक्त होता. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा, जयिंसहाला त्याची शिवभक्ती आणि औरंगजेबाप्रती निष्ठाच अधिक मोलाची वाटली होती. श्री गुरुजींचे हे विश्लेषण किती सटीक आहे, हे आपल्या लक्षात येईल.
 
 
 
 
आजही कसोटीच्या प्रसंगी, आपल्यापैकी अनेकांची त्या पंतप्रधानासारखी स्थिती होत असल्याचे आपण बघतो. राष्ट्रीय हितापुढे वैयक्तिक चारित्र्याला, आपल्या धार्मिक निष्ठेलाच आपण अधिक महत्त्व देत असतो.
अशीच एक घटना मला आठवते. तीही गुजरातचीच आहे. सध्या संघाचे एक अखिल भारतीय अधिकारी तेव्हा गुजरातमध्ये प्रचारक होते. त्यांनी ती सांगितली आहे. एकदा वडोदर्याजवळ मुरारी बापू यांची भागवत कथा होती. कथास्थान शहरापासून सुमारे 20 कि.मी. दूर होते. हजारो भाविक ती कथा ऐकायला येणार होते. या भागवत कथेत आपलेही काही योगदान श्रीकृष्णचरणी अर्पण असावे म्हणून, वडोदर्याच्या ऑटोरिक्षाचालकांनी, वडोदरा बसस्थानक व रेल्वेस्थानकापासून जे भाविक कथास्थळी जातील, त्यांच्याकडून भाडे घ्यायचे नाही, असे ठरविले. या निर्णयाचे सर्वत्र मोठे कौतुकही झाले. यानंतर दोन-तीन महिन्यांनी वडोदरा शहर बसचालकांनी त्यांच्या काही मागण्यांसाठी संप केला. अचानक पुकारलेल्या संपामुळे लाखो प्रवाशांची कुचंबणा झाली. वडोदरा हे औद्योगिक शहर असल्यामुळे अनेक जण आपल्या कार्यालयात, कारखान्यात पोहचू शकले नाहीत. या स्थितीचा ऑटोरिक्षावाल्यांनी पुरेपूर फायदा उचलला आणि अवाच्या सवा भाडे आकारून प्रचंड कमाई केली. प्रवाशांचाही नाइलाज होता. त्यांनी चडफडतच हे प्रचंड भाडे सहन केले. या दोन घटनांवर त्या प्रचारकांचे भाष्य अत्यंत मार्मिक तर होतेच, पण राष्ट्रीय व वैयक्तिक चारित्र्यातील सूक्ष्म फरकही विशद करणारे होते. ते म्हणाले- मुरारी बापू यांच्या भागवत कथेला येणारे भाविक, आपल्याला बसस्थानकापासून ऑटोरिक्षाने जावे लागणार व त्यासाठी भाडे देण्याचीही त्यांची तयारी होती. पण, तरीही ऑटोवाल्यांनी त्यांना मोफत नेले. परंतु, बसचालकांच्या संपकाळात, बसप्रवाशांची कुचंबणा झाली असताना मात्र ऑटोवाल्यांनी त्यांनी अक्षरश: लुटले. आता या ऑटोवाल्यांना धार्मिक म्हणायचे का? प्रवासभाडे देण्यास तयार असणार्या भागवत कथेच्या भाविकांकडून भाडे घेतले असते आणि संपकाळात अडकलेल्या प्रवाशांकडून नेहमीचेच भाडे घेऊन त्यांना इच्छित स्थळी पोहचविले असते, तरच या ऑटोचालकांना खर्या अर्थाने धार्मिक म्हणता आले असते. भगवान श्रीकृष्णालाही हेच वर्तन आवडले असते.
 
 
 
आपल्याकडूनही अशी गल्लत होत नसेलच, असे नाही. वैयक्तिक आयुष्यात अत्यंत धार्मिक असणारी व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी भ्रष्ट असलेली आढळून येते. हा विरोधाभासच खरेतर आपल्या राष्ट्राच्या अवनीतीला कारणीभूत ठरला आहे. राष्ट्र आहे म्हणून तुमचे देव, मंदिरे, उपासतापास, उपासना आहेत. राष्ट्र संपले की, या सर्व गोष्टींसह व्यक्तीदेखील लयास जाणार. जगाच्या व आपल्या इतिहासात अशा अनेक घटना दाखविता येतील.
छत्रपती शिवाजी महाराजांजवळ हा विवेक होता, म्हणूनच त्यांचे राज्य भौगोलिकदृष्ट्या अत्यंत लहान असले, तरीही ते सकल हिंदुस्थानचे आदर्श बनले आहे. या विवेकामुळेच, पाश्चात्त्य इतिहासकार शिवाजी महाराजांची तुलना नेपोलियनशी करतात, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
 
चित्तोडगला वेढा घालून बसलेला अल्लाउद्दिन खिलजी याने राणी पद्मिनीचे सौंदर्य बघण्याच्या मिषाने किल्ल्यात प्रवेश मिळविला. किल्ल्याच्या सर्व मोक्याच्या जागा हेरून ठेवल्या आणि नंतर आतिथ्यधर्माला जागून अल्लाउद्दिनला किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत निरोप देण्यास गेलेल्या राणाला अल्लाउद्दिनने कैद केले व किल्ल्यावर हल्ला केला. त्यानंतर पद्मिनीसह हजारो राजपूत स्त्रियांनी जौहार करून आपल्या अब्रूचे धिंडवडे निघू दिले नाहीत. हा इतिहास आपणास माहीत आहे. चित्तोडगडच्या राणालाही राष्ट्रीय चारित्र्य व वैयक्तिक चारित्र्य यांच्यातील फरक ओळखता आला नाही. याच ठिकाणी राणाच्या ऐवजी शिवाजी महाराज असते तर? पद्मिनीचे सौंदर्य बघण्यासाठी त्यांनी अल्लाउद्दिनला किल्ल्यात तर येऊ दिले असते. परंतु, नंतर मात्र त्याचे व त्याच्या साथीदारांची प्रेतेच किल्ल्याबाहेर गेली असती! अतिथीला देव मानायचा असतो, अशी शिकवण देणारी आपली संस्कृती शिवाजी महाराजांनी अशा वेळी गुंडाळून ठेवली असती आणि आलेल्या अतिथींचे तुकडेच केले असते. हा विवेक संस्कारांनीच येत असतो. जातीत जन्मल्याने येत नसतो, हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे.
समस्त भारतीयांच्या वैयक्तिक व राष्ट्रीय चारित्र्याची, शीलाची परीक्षा घेणारा प्रसंग आता लवकरच येणार आहे. आपल्या वैयक्तिक हेवेदाव्यांसाठी गुजरातच्या त्या पंतप्रधानाप्रमाणे आपण वागणार, की स्वराज्यासाठी आपल्या सख्ख्या नातलगांचीही पर्वा न करणार्या शिवाजी महाराजांसारखे आपण वागणार, याची ही परीक्षा असेल. त्यात आपण उत्तीर्ण होतो की नाही, हे बघायचे.
@@AUTHORINFO_V1@@