एका जबरदस्त व्यक्तिमत्त्वाची स्मृतिशताब्दी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 

 
 
 
 
बेंजामिन फ्रँकलिन, टॉमस जेफर्सन, जॉन अ‍ॅडॅम्स, अलेक्झांडर हॅमिल्टन या अमेरिकन राष्ट्रध्यक्षांनंतर क्रम लागतो तो आणखी एका जबरस्त व्यक्तिमत्त्वाचा, ते म्हणजे १९०१ ते १९०९ या काळात राष्ट्राध्यक्षपदावर असलेला थिओडोर रुझवेल्ट.
 

एखाद्या व्यक्तीला एखाद्या राष्ट्राचा ‘जन्मदाता’ म्हणजे ‘राष्ट्रपिता’ म्हणून संबोधणं ही मुळात रोमन संकल्पना आहे. अमेरिका हे नवे राष्ट्र अनेक प्रभावशाली व्यक्तींच्या निर्धारातून जन्माला आले. त्यामुळे त्यांना अमेरिकेचे ‘फाऊंडिंग फादर्स’ असं म्हणतात. पुन्हा त्यांच्यामधीलदेखील सगळ्यात प्रभावी असा माणूस म्हणजे जनरल जॉर्ज वॉशिंग्टन, याला ‘फादर ऑफ दी नेशन’ असे म्हटले जाते. वॉशिंग्टन १७८९ ते १७९७ अशी आठ वर्षे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होता, तो आजही अमेरिकेचा सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष समजला जातोत्याच्यानंतरच्या काळातले अब्राहम लिंकन (राष्ट्राध्यक्ष - १८६१ ते १८६५), फ्रँकलिन डिलॅनो रुझवेल्ट उर्फ एफ. डी. आर. (राष्ट्राध्यक्ष- १९३२ ते १९४५) आणि जॉन फित्झगेराल्ड केनेडी उर्फ जे. एफ. एम. के. (राष्ट्राध्यक्ष १९६१ ते १९६३) हे तीन अत्यंत कर्तबगार राष्ट्राध्यक्ष ‘ऑल टाईम ग्रेट’ समजले जातात.

 

आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक इतिहास अभ्यासकाची अशी मन:पूर्वक इच्छा असते की, आपण छत्रपती शिवरायांचं चरित्र लिहावं, तशीच अमेरिकेतल्या प्रत्येक इतिहास अभ्यासकाची महत्त्वांकाक्षा असते की, आपण या चार महान राष्ट्रनेत्यांबदल काहीतरी लिहावं. थोडक्यात, अमेरिका आजही या चार नेत्यांना जीवापलीकडे मान देते. या चौघांनंतर बेंजामिन फ्रँकलिन, टॉमस जेफर्सन, जॉन अ‍ॅडॅम्स, अलेक्झांडर हॅमिल्टन या मोठ्या मंडळींचा क्रम लागतो. त्याचप्रमाणे आणखी एक जबरस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे १९०१ ते १९०९ या काळात राष्ट्राध्यक्षपदावर असलेला थिओडोर रुझवेल्ट. अलीकडे आपल्याकडे लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये ‘सॉफ्ट टॉईज’ म्हणजे मऊ, गुबगुबीत खेळण्यांची फॅशन बोकाळलेली आहे. त्यातही ‘टेडी बेअर’ म्हणजे अस्वल हे मुलांचं एक आवडत खेळणं आहे. या अस्वलाला ‘टेडी’ असं का म्हणतात, त्याचं उत्तर आहे हा ‘थिओडोर रुझवेल्ट.’ रुझवेल्ट हा उत्कृष्ट घोडेस्वार, नेमबाज आणि पट्टीचा शिकारी होता. एकदा तो घोड्यावरून शिकार करीत असताना हाके घालणाऱ्या लोकांच्या आरडाओरड्याने घाबरून पळणारं एक अस्वलाचं पिल्लू नेमकं त्याच्या समोरच आलं. ते पिल्लू इतकं चिमुरडं आणि गोजिरवाणं होतं की, रुझवेल्टने बंदूक खाली वळवली. त्या पिल्लाला उचलून घेतलं आणि व्हाईट हाऊसमध्ये आणून पाळलं. त्याला स्वत:चंच नाव ठेवलं. थिओडोचं लघुरूप म्हणजे ‘टेड’ किंवा ‘टेडी.’

 

‘टेड रुझवेल्ट’ हा उत्कृष्ट खेळाडू होता, व्यायामपटू होता, निसर्ग अभ्यासक होता, हौशी प्रवासी होता, लेखक होता, सुधारणावादी होता, अभ्यासू मुत्सद्दी होता आणि राजकारणीही होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला वैशिष्टपूर्ण गुण म्हणजे, एकदा का एखादी गोष्ट त्याला पटली की, प्रचंड उत्साह आणि पूर्ण हिंमत धरून तो ती पूर्ण करण्याच्या मागे लागायचा. १९१४ साली युरोपात महायुद्ध सुरू झालं. यावेळी टेड रुझवेल्टच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या दोन कारकिर्दी संपलेल्या होत्या, पण तो राजकारणात संपूर्ण सक्रिय होता. ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी यांच्या युरोपातल्या भांडणात अमेरिकेने अजिबात पडू नये, असं सर्वसाधारण अमेरिकेतील जनतेचं मत होतं. तेच मत टेड रुझवेल्टचंही होतं. ‘आम्ही आमची तरुण पोरं मरायला युरोपच्या रणभूमीवर का म्हणून पाठवावीत? तुम्ही तिकडे वाटेल तो गोंधळ घाला,‘ या अमेरिकेच्या प्रातिनिधीक मताचा तो अगदी जाहिरपणे आणि हिरीरीने पुरस्कार करीत असेपण, १९१६ साली परिस्थिती बदलली. अमेरिकेला महायुद्धात उतरावचं लागलं, तेव्हा टेड रुझवेल्ट प्रचंड उत्साहाने युद्धप्रयत्नांच्या पाठीमागे लागला. यावेळी तो ५८ वर्षांचा होता. पण, त्याच्या मनात अशी ईर्षा निर्माण झाली की, स्वत: सैन्यात भरती व्हावं आणि फ्रान्समध्ये जाणाऱ्या अमेरिकन सैन्यात मिळेल, ती जबाबदारी घेऊन प्रत्यक्ष रणांगणावर उतरावं. एक म्हणजे वय आणि दुसरं म्हणजे माजी राष्ट्राध्यक्ष असल्यामुळे त्याची सैन्यात भरती करून घेण्याची विनंती नम्रतापूर्वक फेटाळण्यात आली. टेड रुझवेल्ट खूप नाराज झाला. पण, तो स्वस्थ बसला नाही. त्याला चार मुलगे होते. त्याने चौघांनाही सैन्यात भरती करून फ्रान्सच्या रणभूमीत उतरवलं. त्याचा सगळ्यात धाकटा मुलगा क्वेन्टन हा वैमानिक होता आणि जर्मन विमान दलाशी समोरासमोर लढताना त्याला फ्रान्समध्येच वीरमरण आलं.

 

अमेरिकेने युरोपच्या भानगडीत पडू नये,’ असं टेड रुझवेल्टचं मत होतं. यावरून तो बावळट, शांतिवादी होता, असा गैरसमज कोणी करून घेऊ नये. उलट त्याचं असं ठाम मत होतं की, अमेरिकन राष्ट्राच्या जनकांनी लोकशाही राज्यव्यस्थेचा आणि घटनात्मक अधिकारांचा हा जो अभूतपूर्व प्रयोग चालवलेला आहे, त्यांच्या रक्षणासाठी गरज पडल्यास बेधडक युद्ध करावं. याकरिता त्याने आपल्या राष्ट्राध्यक्षीय कारकिर्दीत अमेरिकन नौदल आणि भूदल यांच्या अद्ययावतीकरणाला जोरदारचालना दिली. अमेरिकेच्या पूर्वेचा अटलांटिक महासागर आणि पश्चिमेचा प्रशांत महासागर हे कृत्रिम कालव्याद्वारे जोडण्याचे प्रयत्न फ्रान्सने १८८१ साली सुरू केले होते. पण, विविध कारणांमुळे ते काम थांबलं होतं. त्या कामाचं महत्त्व ओळखून टेड रुझवेल्टने तो प्रकल्प फ्रान्सकडून अमेरिकेच्या ताब्यात घेतला. १९०४ साली अमेरिकेने हे काम हाती घेतलं आणि दहा वर्षांत धडाक्याने पूर्णदेखील केलं. हाच तो सुप्रसिद्ध पनामा कालवा. १८६९ साली सुवेझ कालव्याने पूर्वेकडचं जग बदललं होतं. आता १९१४ साली पनामा कालव्याने पश्चिमेकडील जग बदलले. फ्रान्स आणि ब्रिटन हे एकमेकांचे हाडवैरी होते. पण, टेड रुझवेल्टच्या दूरदर्शी मुत्सद्देगिरीने फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिका हळूहळू एकमेकांचे मित्र बनत गेले. रुझवेल्टने दक्षिण अमेरिकन देशांचा दौरा करून त्यांनाही मित्र बनवले. जपान आणि जर्मनी यांच्या वाढत्या सामर्थ्याकडेही त्याचं बारीक लक्ष होतं. जपानशी मैत्रीचा करार करून त्याने प्रशांत महासागरातील हवाई आणि ग्वाम व हिंदी महासागरातील फिलिपीन्स ही अमेरिकेची ठाणी सुरक्षित केली.

 

१९०४ साली चिमुकल्या, पण अत्यंत संघटित आणि सुसज्ज अशा जपानने अवाढव्य पण विस्कळीत आणि मागास अशा रशियावर चक्क आक्रमण केलं आणि त्याचा पराभव केला. टेड रुझवेल्टने दोन्ही देशांच्या प्रतिनिधींना अमेरिकेत बोलावून त्यांच्यात सन्माननीय समझोता घडवून आणला. ही कामगिरी मुत्सद्देगिरीच्या संदर्भात एवढी मोठी होती की, १९०६ वर्षीचं नोबेल शांतता पारितोषिक टेड रुझवेल्टला देण्यात आलं. अत्यंत निसर्गसुंदर अशा आपल्या भूमीतील जंगलं, नद्या, पर्वत जपले पाहिजेत. हे अमेरिकन सरकारच्या अगोदरच लक्षात आलं होतं. त्यानुसार कायदा होऊन ‘यलोस्टोन नॅशनल पार्क’ हे अमेरिकतले पहिले राष्ट्रीय उद्यान १८७२ सालीचअस्तित्वात आले होते. आता टेड रुझवेल्टने १९०६ साली ‘ऐतिहासिक स्मारक कायदा’ पारित केला. अमेरिकतली अनेक नैसर्गिक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं सरकारने संरक्षित केली. टेड रुझवेल्टची ही पर्यावरण प्रेमाची ऊर्मी कायम कायदा करण्यापुरती नव्हती. १९१४ साली वयाच्या ५५व्या वर्षी तो पदभ्रमंतीसाठी ब्राझीलमध्ये गेला होता. मादैरा नावाच्या एका नदीची एक अनामिक उपनदीनेमकी कुठून उगम पावते, याचा अजून कोणी शोध घेतला नव्हता. टेड रुझवेल्ट आणि त्यांचे ट्रेकिंगवाले मित्र त्या उपनदीच्या काठाकाठाने ६०० मैल चालले. तसेच घोड्यावरून गेले आणि त्यांनी तो उगम शोधून काढाला. ब्राझील सरकार हा अद्भुत प्रकार अनुभवून थक्कच झालं. त्यांनी त्या नदीलाच नाव देऊन टाकलं ‘रिओ थिओडोरो’ म्हणजे ‘रिव्हर थिओडोर.’

 

टेड रुझवेल्ट हा उत्साहाने सळसळणारा, हिंमतबाज, बुद्धिमान, मर्द राजकारणी माणूस दि. ५ जानेवारी, १९१९ या दिवशी रात्री १२ नंतर झोपायला गेला आणि ६ जानेवारी, १९१९ च्या सकाळी जागा झालाच नाही. वयाच्या अवघ्या ६० व्या वर्षी झोपेतच त्याचं निधन झालं. या वर्षीच्या ६ जानेवारीला त्याच्या मृत्यूला १०० वर्षे झाली. अलीकडच्या काळातले त्यातल्या त्यात कणखर राष्ट्रध्यक्ष रोनाल्ड रीगन यांची कारकिर्द १९८१ ते १९८९ अशी त्यांच्या नंतर कणखर, दमदार आणि गुणवान नेतृत्वासाठी अमेरिका तरसते आहे. त्यामुळे सगळ्याच अमेरिकन पत्रकार-लेखकांना टेड रुझवेल्ट यांच्या नेतृत्व गुणांची प्रकर्षाने आठवण आलीहे सगळं आपण भारतात कशासाठी वाचायचं? का त्यावर विचार करायचा? कारण, अमेरिकेपेक्षाही आपल्या लोकशाहीसमोरची आव्हानं मोठी आहेत. गुंतागुंतीची व किचकट आहेत. अशी आव्हानं पेलू शकणारं नेतृत्व कसं निर्माण होतं? ते निर्माण होण्याची, प्रशिक्षित होण्याची प्रक्रिया कायम असते. उच्च गुणवत्तेचा नेता हा तसा जन्मजातच असतो.पण सुप्रजाच निर्माण व्हावी आणि त्या सुप्रजेला पैलू पाडणारी प्रशिक्षित करणारी काही यंत्रणा असावी,अशी आपल्या प्राचीन वैज्ञानिकांचीं म्हणजे ऋषिमुनींची धारणा होती. आपण त्याबद्दल विचार करायला प्रवृत्त व्हावं, एवढंच...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@