कर्जतच्या दुर्गम पाड्यांमधील जीवन आशा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2019   
Total Views |

 


 
 
महिला विकास केंद्राची प्रार्थना, एकीची सोनसाखळी, हात धरले ते कधीच न सोडण्यासाठी, गरज पडेल तर एकमेकींचा आधार बना.

कोतवालवाडी ट्रस्ट, नेरळ

 

हरिभाऊ भडसावळे उर्फ काका भडसावळे यांनी १९४७ मध्ये हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गोमा पाटील यांच्या स्मरणार्थ कोतवाल वाडी ट्रस्टची स्थापना केली. १९४७ साली सुरू झालेले संस्थेचे कार्य आजतागायत त्याच उमेदीने, नि:स्वार्थी भावनेने सुरू आहे. या संस्थेने कर्जत, नेरळच्या सामाजिक, आर्थिक जीवनाचा कायापालट केला आहे.

 

ना कोई उम्मिद चांद से ना सितारोंसे

जी रहे है इस कश्मकश्म मे की।

हम भी जीये बस एक बार इन्सान जैसे॥

 

खरेच आहे, आज माणूस चंद्रावर, सूर्यावर जायचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्याचवेळी आजही काही लोक किमान माणसासारखं जगता यावं, यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असतात. त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्ती होत नाही, असे नाही. पण अशा काही गरजा असतात आणि त्यांची पूर्ती करणे आवश्यक आहे, हे लोकांच्या ध्यानीमनी नसते. आपण माणूस असूनही आपले जीवन पशूसारखे जगत आहोत, याची खंत ना खेद यांना असते, ना इतरांना. मुळात आपले काही हक्क आहेत, याची जाणीवच यांना नसते. अशा परिस्थितीत या लोकांचे शोषण करण्यात काही लबाड लोक पुढे सरसावतात. मग अन्यायाची एक परंपरागत साखळी तयार होते. असेच चित्र नेरळ, कर्जत परिसरामध्ये होते. सह्याद्रीच्या कडेकपारीतला भाग, वनवासी जनजीवन, दुर्गम भाग. त्यामुळे इथल्या वनवासी समाजाचा बाहेरच्यांशी म्हणावा तसा संपर्क नाही. या परिसरामध्ये ‘कोतवालवाडी ट्रस्ट’ नि:स्वार्थी प्रेरणेने काम करते.

 
 

 
 
 
कोतवालवाडीचे माजी विद्यार्थी. महारुद्र गायकवाड -जहाँगीर हॉस्पिटल डायलिसीस विभागाचा प्रमुख. गोपिनाथ फोपे डी मार्ट मध्ये मॅनेजर, दिलीप नेहरकर डॉक्टर झाला. ऊत्तरेश्वर मेकॅनिकल इंजिनिअर (इ ए), परमेश्वर शेप हा मुंबईच्या अलिशान ऑफीसमध्ये ऑफिसर आहे.

कोणतीही संस्था स्थापन होणे म्हणजे त्या संस्थेची एक जीवनकहाणीच असते. ‘कोतवालवाडी ट्रस्ट’ स्थापनेचीही अशी स्वतंत्र कथा आहे. हरिभाऊ भडसावळे या ट्रस्टचे संस्थापक. त्यांची जीवनकहाणीही विलक्षणच. त्या विलक्षण जीवनकहाणीची या संस्थेच्या विलक्षणतेमध्ये मोलाची भूमिका. मूळगाव नेरळच असलेले हरिभाऊ देशभक्त व स्वातंत्र्यसेनानी. महात्मा गांधींच्या विचारांवर त्यांची निष्ठा. स्वातंत्र्यसेनानी भाई कोतवाल यांच्यासोबत त्यांनी इंग्रजांशी लढा पुकारलेला. महाड आणि कर्जत तालुक्याच्या सीमेवर घनदाट जंगल आहे. तिथे १९४३ साली इंग्रजांनी भाई कोतवाल यांची गोळ्या घालून हत्या केली. इंग्रजांनी भाईंचा निष्प्राण देह फरफटत जंगलाबाहेर आणला. तेथील वनवासींनी त्यांचे अंत्यसंस्कार केले. भाईंचा मृत्यू कुठे झाला, याबाबत संभ्रम होता. पण हरिभाऊ भडसावळेंनी सातत्याने तीन वर्षे जंगलामध्ये शोध घेऊन ती जागा शोधून काढली. तेथील पुरावे शोधले. त्यामुळे जगाला इंग्रजांची क्रूरता आणि भ्याडता पुन्हा एकदा समजली.त्यानंतर हुतात्मा भाई कोतवालांच्या आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हरिभाऊंनी नेरळ येथे ‘कोतवालवाडी ट्रस्ट’ सुरू केला. यामागे महात्मा गांधी यांचीही प्रेरणा होती. गांधींनी सांगितले होते की, ‘स्वराज्यातून सुराज्याकडे चला’ तसेच ‘खेड्याकडे चला.’ या दोन विचारांचा आदर्श घेऊन ‘कोतवालवाडी ट्रस्ट’ काम करते आहे. हरिभाऊ यांनी प्रतिज्ञा केली होती की, स्वराज्य मिळाल्याशिवाय लग्न करणार नाही. त्यांनी ती प्रतिज्ञा पाळली. देश स्वतंत्र झाला आणि सामाजिक जाणिवेच्या बंधातून हरिभाऊंनी बालविधवेशी लग्न केले. अर्थात, त्यात जगावेगळे काही केले, असा त्यांचा अभिनिवेश नव्हता. हरिभाऊ आणि त्यांची पत्नी शकुंतला यांनी संपूर्ण आयुष्य ‘कोतवालवाडी ट्रस्ट’साठी वेचले. हरिभाऊंनी संस्थेच्या माध्यमातून परिसरातील गरजू, वंचित मुलांसाठी वसतिगृह सुरू केले. शकुंतला या संस्थेच्या वसतिगृहामध्ये शिक्षिका म्हणून जबाबदारी सांभाळत. त्यांची मुलेही याच वसतिगृहात राहत. १९४७ साली सुरू झालेल्या या संस्थेमध्ये आर्थिक तंगी तर होतीच पण, असंख्य दिव्यांमधून जात, प्रेरणा घेत व देत भडसावळेंनी वसतिगृहाच्या मुलांसाठी काम सुरू ठेवले.

 

 
 
नक्षत्र मंदिर, औषधी वृक्षांचे संवर्धन व माहिती
 

वसतिगृहाचा परिसर वनवासी क्षेत्रामधला. अज्ञान अंधश्रद्धा यांनीं समाज ग्रासलेला. ‘कोतवालवाडी ट्रस्ट’ समाज उत्थानासाठी काम करते. आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी या आयामांतून संस्था काम करते. संस्थेचे प्रामुख्याने चार उपक्रम चालतात. मुलांसाठी वसतिगृह, मुलींसाठी वसतिगृह, भवताल, नक्षत्र, महिला विकास केंद्र. या सर्व उपक्रमांचे आपले असे महत्त्वपूर्ण काम चालते. वसतिगृहामध्ये गरजू, वंचित मुलांच्या शिक्षणाची आणि इतर सर्वच विकासात्मक बाबींची जबाबदारी घेतली जाते. ‘भवताल’ या उपक्रमाला एक वेगळाच इतिहास आहे. ‘भवताल’ची वास्तू म्हणजे हरिभाऊ भडसावळे यांचे वंशपरंपरागत घर. स्वातंत्र्य सैनिकांच्या पायधुळीने हे घर पावन झालेले. ‘भवताल’बद्दल संस्थेच्या विश्वस्त आणि हरिभाऊंच्या कन्या संध्या देवस्थळे सांगतात की, “राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून वर्षाला शेकडो विद्यार्थी इथे शिबिरासाठी येतात. उल्हासनगरमधील महाविद्यालयांचा समावेश लक्षवेधी असतो. या महाविद्यालयातील मुलांच्या निवासाची व्यवस्था ‘भवताल’मध्ये असते. विद्यार्थी सात दिवस राहतात. परिसरातील वस्त्यांचा, पाड्यांचा अभ्यास करतात. शहर आणि पाड्यातील अंतर कमी करणे हा उद्देश आहे. तसेच इथे कचऱ्यामधून ऊर्जानिर्मिती करण्याचासुद्धा विचार आहे. दुसरा उपक्रम आहे ‘नक्षत्र मंदिर.’ साधारण ‘नक्षत्र’ ही संकल्पना आपल्या वेदांमध्येही आहे. प्रत्येक नक्षत्राशी संबंधित एक रास असते. त्या राशीचे आणि नक्षत्राचेही एक वृक्ष असतो. म्हणजे सिंह राशीचे झाड आहे वड. मीन राशीचे झाड आहे मोह. अशा २७ नक्षत्रांचे गुणविशेष धारण करणारे एक एक झाड असते. हे सर्व वृक्ष भारतीय वंशातले. या प्रत्येक वृक्षाला स्वत:चा औषधी गुणधर्म. ‘नक्षत्र मंदिरा’मध्ये या सर्व वृक्षांची माहिती आहे. त्याशिवाय १६ वर्षांपूर्वी हे सर्व वृक्ष इथे लावले गेले. त्यांचे संगोपन केले गेले.”

 
 

 
 
 

भवताल - पर्यावरणाचे माहिती केंद्र


संध्या अतिशय उत्साहाने सांगत होत्या. उत्साह तर असणारच. कारण, वेदांमधील संकल्पना ‘कोतवालवाडी ट्रस्ट’मध्ये साकार झाली होती. तिथे येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना ती ‘याची देही याची डोळा’ अनुभवता येणार होतीकोतवालवाडी ट्रस्ट’चा एक समाजकेंद्री उपक्रम म्हणजे ‘महिला विकास केंद्र’ होय. ‘कोतवालवाडी ट्रस्ट’च्यामार्फत हरिभाऊ भडसावळे. ‘महिला विकास केंद्र’ सुरू आहे. या केंद्रामार्फत शिवणकला केंद्र तसेच रुग्णसेविका अभ्यासक्रम चालवला जातो. ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’ कंपनीच्या सहकार्याने चाललेल्या या अभ्यासक्रमाचा लाभ कर्जतमधीलच नव्हे, तर रायगड जिल्ह्यातील शेकडो महिलांनी घेतला आहे. विधवा, परित्यक्ता महिलांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घेतला आहे. कधीकाळी परिस्थिती पुढे हतबल असणाऱ्या या महिला आज परिस्थितीवर मात करून यशस्वी झाल्या आहेत. ‘रुग्णसाहाय्यक प्रशिक्षण वर्गा’साठी भारती शिंगोळे आणि अपर्णा कर्वे या प्रशिक्षक म्हणून काम पाहतात. ‘शिवणकला वर्गा’साठी अंजू पारधी, रोहिणी झुगरे, अंजना तिखंडे या प्रशिक्षक आहेत. भारती शिंगोळे या सुरुवातीपासूनच संस्थेशी जोडलेल्या होत्या. त्यांनी नंतर नर्सिंगचे प्रशिक्षण घेतले आणि त्यात चांगले यश मिळवले. या संस्थेचे वेगळेपणही आहे. या संस्थेमध्ये प्रार्थनेचे स्वरूप वेगळे आहे. संस्थेमधील सर्व मुली एकमेकांच्या हातात हात गुंफून गोल रिंगण बनवून ॐकार करतात. असे का? विचारल्यावर संध्या म्हणाल्या, “कारण, ॐकार हा सर्वसमावेशक असून कोणत्याही धर्माशी बांधील नाही. तसेच ’मैत्रिणींनो स्वत:ची ओळख निर्माण करा, स्वावलंबी व्हा.’ हे आमचे ब्रीदवाक्य असून माझे वडील हरिभाऊ भडसावळे यांचे स्वप्न आहे.” कोतवालवाडी ट्रस्ट कर्जत परिसरामध्ये वंचितांच्या आयुष्याला अर्थ मिळवून देत आहेत. संस्थेची निस्वार्थ सेवा अतुलनीय आहे.  

 
संस्थेच्या विश्वस्त मंडळातील अनसुया पादीर आणि रामचंद्र ब्रह्मांडे हे ‘कोतवालवाडी ट्रस्ट’चे माजी विद्यार्थी. संस्थेमध्ये प्रत्येक विश्वस्ताला आपापली जबाबदारी आहे. बाळ बर्वे हे अध्यक्ष असून वनवासी विद्यार्थी वसतिगृह आणि हातमाग प्रशिक्षण केंद्राचे संचालक आहेत. अनसुया पादीर या व्यवस्थापकीय विश्वस्त असून मालमत्ता व कन्या छात्रालयाच्या विश्वस्त आहेत. संध्या देवस्थळे या हरिभाऊ भडसावळे महिला विकास केंद्र, कृषी, पर्यावरण शिबीर केंद्रच्या संचालक आहेत. शरद पाटील हे विश्वस्त आहेत. रामचंद्र ब्रह्मांडे हे वनवासी सेवक महाराष्ट्र शासन म्हणून आहेत. सावळाराम जाधव या हे विश्वस्त तसेच वसतिगृहाचे उपसंचालक, शेती व्यवस्थापक आहेत. तर संस्थेचे निमंत्रक आहेत.
 


 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 


@@AUTHORINFO_V1@@