गोमातेची जर्मन माता!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2019   
Total Views |

 


 

 

फ्रेडरिक या जर्मन नागरिक असल्या तरी, त्यांनी गोसंरक्षणासाठी मोठे काम केले आहे. याच कामाची दखल घेत भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.

 

देशाच्या ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने ‘पद्म पुरस्कार’ जाहीर केले. यात विविध क्षेत्रातील ११२ मान्यवरांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये चार ‘पद्मविभूषण’, १४ ‘पद्मभूषण’ व ९४ ‘पद्मश्री’ पुरस्कारांचा समावेश आहे. यामध्ये तीन गोरक्षकांनादेखील ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. यात मथुरा येथील हिंदू संत रमेश बाबाजी महाराज, महाराष्ट्राच्या बीड येथील शब्बीर सय्यद आणि जर्मन नागरिक असलेल्या फ्रेडरिक एरिना ब्रूनिंग यांचा समावेश आहे. यामधील शब्बीर मामूंच्या कामाचा आढावा आपण यापूर्वी ‘माणसं’ या सदरातून घेतला होता. या तीन गोरक्षकांपैकी आजच्या ‘माणसं’ या सदरात फ्रेडरिक एरिना ब्रूनिंग यांच्याविषयी जाणून घेऊया. फ्रेडरिक या जर्मन नागरिक असल्या तरी, त्यांनी गोसंरक्षणासाठी मोठे काम केले आहे. याच कामाची दखल घेत भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केला आहे.

 

फ्रेडरिक यांची कहाणी ऐकली की, कवी प्रा. स. ग. पाचपोळ यांची ‘हंबरून वासराले चाटती जेव्हा गाय, तेव्हा मले गायीमधी दिसती माझी माय’ या कवितेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. फ्रेडरिक या मुळात जर्मनीच्या. मात्र, त्यांचे भारताशी नाते त्यांच्या वडिलांपासूनच जोडले गेले होते. त्यांचे वडील जर्मन सरकारमधील मोठे अधिकारी होते. त्यांनी काहीकाळ भारतात जर्मनीचे दूत म्हणून कामदेखील केले आहे. त्यामुळे फ्रेडरिक यांना भारताविषयी नेहमीच आकर्षण वाटले. याचमुळे की काय, थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया आणि नेपाळ येथे सोलो ट्रीपसाठी जाण्यासाठी निघालेल्या फ्रेडरिक भारतात आल्या आणि भारताच्याच झाल्या. त्या मागील ३५ वर्षांपासून मथुरेत स्थायिक आहेत. त्या भारतात का स्थायिक झाल्या, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. फ्रेडरिक पर्यटनासाठी भारतात आल्या असता त्यांना मथुरेत फिरताना जखमी आणि भटकणाऱ्या गायी दिसल्या. या गायींची दयनीय अवस्था पाहून फ्रेडरिक यांचे मन हेलावून गेले. याचवेळी त्यांना आपल्या आपल्या उर्वरित आयुष्यात काय करायचं आहे, याचं उत्तर मिळालं आणि त्यांनी निश्चय केला की, आता परत जर्मनीत जायचं नाही. भारतात राहून या भटक्या गायींचीच सेवा करायची.

 


 
 

फ्रेडरिक यांच्या या प्रवासाला जवळपास ३५ वर्षे झाली आहेत. त्यांचा हा प्रवास मोठा चढउतारांनीभारलेला होता. या सगळ्यांवर मात करून आज त्या तब्बल १२०० पेक्षा जास्त गायींचा सांभाळ करतात. मागील ३५ वर्षांपेक्षा जास्त त्या भारतात फक्त व्हिसावर राहत आहेत. मात्र, ‘पद्मश्री’ मिळाल्यानंतर त्यांनी भारताचे नागरिकतत्व स्वीकारायची इच्छा व्यक्त केली आहे. फ्रेडरिक यांनी सुरुवातीला एका छोट्याशा जागेत गोशाळेची सुरुवात केली. यानंतर १९९६ साली राधाकुंड येथील एका शांत परिसरामध्ये ‘सुरभी गोशाला निकेतन’ नावाच्या गोशाळेची उभारणी केली. आज याच गोशाळेमध्ये तब्बल १२०० पेक्षा अधिक गायी व वासरे असून, यांचा देखभाल करण्यासाठी ६० कर्मचारी दिवस-रात्र तैनात असतात. फ्रेडरिक यांना सुरुवातीला भाषा समजून घेण्यापासून अडचणी आल्या होत्या. मात्र, त्यांनी यावर उपाय म्हणून हिंदी शिकून घेतले आणि त्यानंतर गायींशी संबंधित अनेक पुस्तकांचे अध्ययन केले. जसा जसा गोशाळेचा व्याप वाढत होता, तसतसं फ्रेडरिक यांच्यावरील खर्चाचा बोजा वाढत होता. सुरुवातीला त्यांच्याजवळील जमापुंजी त्यांनी या गोशाळेच्या पालनासाठी वापरली. गायींचे खाद्य, त्यांना पुरवण्यात येणारी वैद्यकीय सेवा, कर्मचार्‍यांचे वेतन यासाठी महिन्याकाठी तब्बल ३५ लाखांचा खर्च येतो. एवढा मोठा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न त्यांना पडला. समाजातील काही दानशूर व त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीतून महिन्याकाठी येणारे सहा ते सात लाख रुपये असे मिळून त्या खर्च भागवू लागल्या. आज आश्रमाची अशी परस्थिती आहे की, येथे गायींना सांभाळण्यासाठी जागा नाही. तरीही स्थानिकांनी भाकड, आजारी गायी आश्रमात आणून सोडल्या तरी, फ्रेडरिक त्यांना ‘नाही’ म्हणत नाहीत.

 

फ्रेडरिक यांच्या याच महान कामामुळे येथील स्थानिक लोक त्यांना ‘सुदेवी माताजी’ या नावाने संबोधतात. फ्रेडरिक यांच्या कामाची दखल घेत भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ जाहीर केला. यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या, “‘पद्मश्री’ मिळाल्याचा मला आनंदच आहे. मात्र, दरवर्षी मला व्हिसा रिन्यू करावा लागतो. त्यामुळे भारत सरकारने आता मला भारतीय नागरिकत्व द्यावे,” अशी विनंतीदेखील त्यांनी केली आहे. फ्रेडरिक यांच्या या कार्याला व जिद्दीला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@