मनमाडला पुन्हा पाणीबाणी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
 

तब्बल १८ ते २० दिवसांनी होणार पाणीपुरवठा

 
 

मनमाड : मनमाड व पाणीटंचाई हे जणू समीकरणच बनले आहे. पण यावेळेस मात्र ही परिस्थिती जलवाहिन्यांची योग्य ती निगा न राखल्याने ओढवली आहे. एप्रिल महिन्यापर्यंत पाणी पुरवावे लागणार आहे. उन्हाळा सुरू होत असल्याने सध्या १५ दिवसाआड होणारा पाणीपुरवठा १७ ते १८ दिवसाआड होणार असल्याचे नगराध्यक्षा पद्मावती धात्रक यांनी सांगितले. ओझरखेड धरणातून शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपरिषद युद्धपातळीवर प्रयत्न करत असून मागील महिन्यातदेखील या विषयावर सर्व संबंधितांशी चर्चा केली आहे.दि. १५ फेब्रुवारी रोजी पुन्हा सरकार दरबारी प्रयत्न केले जाणार आहेत. लोकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन त्यांनी जनतेस केले आहे.

 

येथील वाघदर्डी धरणातील जलशुद्धीकरण केंद्रातून शिवाजी नगर, बुधलवाडी, इदगाह, आययुडीपी व कॉलेज रोड भागास पाणीपुरवठा करणाऱ्या ८०० मिली व्यासाच्या मुख्य जलवाहिनीस सुमारे आठ ते दहा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गळती लागल्याने पाण्याचा अपव्यय होतो. ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणची गळती रोखण्यासाठी दि.५ फेब्रुवारीपासून काम सुरू केले जाणार आहे. हे काम अंदाजे तीन दिवस चालण्याची शक्यता गृहित धरून या भागातील पाणीपुरवठा दि. ९ फेब्रुवारी किंवा १० फेब्रुवारीपर्यंत सुरू होईल. पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची पुनर्रचना काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. त्यामुळे शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी लागणारा वेळ व पाणी यांची बचत होत होती. मागील वर्षी व या वर्षीदेखील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्याने शहरास पूर्णपणे पालखेड धरणातून होणाऱ्या आवर्तनावरच अवलंबून राहावे लागत आहे. वर्षभरात सुमारे चारवेळा आवर्तन येत असते. आवर्तनाचे पाणी मनमाडपासून अंदाजे २० किमी अंतरावर असलेल्या पाटोदा तलावात येताना रस्त्यात होणारी पाणीचोरी गृहित धरून एका आवर्तनाचे फक्त २० एम्सेफ्टी पाणी पाटोदामार्गे वाघदर्डी धरणात येते. अशा प्रकारे गेल्या दोन वर्षांपासून फक्त जवळपास ८० एम्सेफ्टी पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. या वर्षी जलवाहिन्यांची पुनर्रचना केल्यामुळे पाणीबचत झाली. मात्र, मनमाडमध्ये पाण्याचा प्रश्न अजूनही बिकट आहे.

 

शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी नगरपरिषद लक्ष देत असून या गांभीर्यपूर्वक केलेल्या नियोजनानेच आज पाऊस नसतानादेखील आम्ही पाणी देऊ शकत आहोत.

- प्रमोद पाचोरकर

नगरसेवक , माजी पाणीपुरवठा समिती सभापती, मनमाड

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@