स्वानुभवातून घडलेला उद्योजक विनोद कांबळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2019   
Total Views |



टर्म इन्शुरन्स, मेडिक्लेम, म्युच्युअल फंड, आर्थिक आपत्ती व्यवस्थापन, पाल्यांसाठी शैक्षणिक नियोजन या विविध मार्गाद्वारे ते सिद्धी असोसिएट्सच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करतात. गेली १६ वर्षे त्यांचं हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. आतापर्यंत २७०० लोकांना अशाप्रकारे आर्थिकदृष्ट्या त्यांनी सुरक्षित केलेले आहे. इन्शुरन्समधला ‘एमडीआरटी’ हा मानाचा किताब त्यांना आतापर्यंत तीन वेळा मिळाला आहे. प्रणाली, श्रद्धा, रोहित, विकास या आपल्या सहकार्‍यांमुळेच हे शक्य झाले, असे ते मान्य करतात. २०२२ पर्यंत ६ हजार लोकांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा त्यांचा मानस आहे.

 

आपण वेळीच ही गोष्ट केली असती तर बरं झालं असतं,’ असं अनेक गोष्टींबाबत आपल्या प्रत्येकाला वाटतं. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे विमा. ऐन उमेदीत आपण विमासारख्या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष करतो आणि मग ज्यावेळेस गरज लागते, त्यावेळेस पश्चात्ताप करण्याशिवाय हातात काहीच नसतं. मात्र, एक व्यक्ती याचविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम गेल्या १६ वर्षांपासून सातत्याने करत आहे. हसतमुख प्रसन्न चेहरा, कोणत्याही वेळेस भेटा तोच उत्साह, कोणतीही समस्या असो त्या समस्या सोडविणार्‍या लोकांचं त्यांच्याकडे एक आगळंवेगळं जाळं आहे. ही व्यक्ती म्हणजे सिद्धी असोसिएट्सचे विनोद कांबळे.

 

विक्रोळीमधलं कन्नमवार नगर म्हणजे मध्यमवर्गीयांची सर्वांत मोठी वसाहत. आशिया खंडातील सर्वात मोठी हाऊसिंग कॉलनी म्हणून ती जगात प्रसिद्ध आहे. याच वसाहतीत कृष्णा कांबळे आणि राधिका कांबळे राहत. कृष्णा कांबळे देना बँकेत कार्यरत होते. या दाम्पत्याला दोन मुले आणि दोन मुली होत्या. विनोद त्यातील शेंडेफळ. शिशुवर्ग ते अगदी बारावीपर्यंतचं विनोदचं शिक्षण विद्या विकास हायस्कूलमध्ये झालं. बीकॉमचं शिक्षण मात्र त्याने विद्या विकासच्या रात्र महाविद्यालयातून पूर्ण केले. दिवसा काम आणि रात्री शिक्षण, असे ते रोमांचकारी दिवस त्याने अनुभवले. सुरुवातीस वेल्डिंग रॉड तयार करणार्‍या एका कंपनीत तो कामाला लागला. महिना ४०० रुपये पगार मिळायचा. सहा महिने त्याने तिथे काम केलं. त्यानंतर एका आईस्क्रीम एजन्सीमध्ये सेल्समन म्हणून त्याने नोकरी केली. या नोकरीच्यावेळीच त्याला खर्‍या अर्थाने जग शिकायला मिळालं. सेल्समनची नोकरीच तशी असते. पगार होता फक्त ६०० रुपये.

 

एरव्ही सेल्समनची नोकरी म्हटली की तरुण मुलं नाकं मुरडतात. पण, विनोदसाठी हा आवडीचा विषय होता. एखाद्या व्यक्तीचं आपण मन जिंकतो. तो ती वस्तू आनंदाने विकत घेतो. याची एक वेगळीच झिंग असते. हाडाचे सेल्समन ही झिंग अनुभवतात. विनोदसुद्धा ही झिंग आता अनुभवायला लागला. सेल्समनच्या नोकरीमुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वातदेखील बदल झाला. दरम्यान त्याने मसाला, चॉकलेट्स, बिस्किट्स सारख्या एजन्सीजमध्ये नोकर्‍या केल्या. नोकरीनिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. अनुभवसमृद्ध झाला. याचदरम्यान त्याने भारतीय आयुर्विम्याचा एजंट म्हणून अर्धवेळ काम करण्यास सुरुवात केली.

 

मात्र, नियतीचे फेरे कधीकधी उलटे पडतात आणि होत्याचे नव्हते होते. असंच काहीसं विनोदच्या बाबतीत झालं. त्यांनी राहतं घर पाच लाख रुपयांना विकलं आणि पुण्याला नोकरीसाठी स्थिरावले. मात्र, आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी मुंबईच बरी म्हणून परत ते मुंबईला परतले. जे घर त्यांनी पाच लाख रुपयांना विकलं त्याचीच किंमत २६ लाख रुपये झाली होती. राहण्यासाठी घर आवश्यक होतं. करायचं काय? हा यक्षप्रश्न होता. त्याचवेळी नऊ लाख रुपयांचं एक छोटंसं घर त्यांच्या नजरेत आलं. सुदैवाने बँकेत साठवलेले पाच लाख रुपये होते. इकडून तिकडून दोन लाख रुपये गोळा केले. उरलेले दोन लाख रुपये कसे उभारायचे, हा मोठाच प्रश्न होता. याचवेळी त्यांना त्यांच्या जुन्या कंपनीतला बॉस आठवला. केतन शहा यांना त्यांनी आपली अडचण सांगितली. विनोद सोबत शहा बँकेत गेले आणि स्वत:च्या पतवर त्यांनी विनोद कांबळेंना दोन लाखांचे कर्ज मिळवून दिले. अखेरीस स्वत:चं घर कांबळेंना मिळालं.

 

हा त्रास अनुभवल्यानंतर विनोद यांना प्रश्न पडला की माझ्यासारखाच त्रास अनेकांना होत असेल. त्यांचं काय? त्यांच्यासाठी काय करता येईल? या समस्येतूनच त्यांना उपाय सापडला तो म्हणजे आर्थिक नियोजनाचा. टर्म इन्शुरन्स, मेडिक्लेम, म्युच्युअल फंड, आर्थिक आपत्ती व्यवस्थापन, पाल्यांसाठी शैक्षणिक नियोजन या विविध मार्गाद्वारे ते सिद्धी असोसिएट्सच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करतात. गेली १६ वर्षे त्यांचं हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. आतापर्यंत २७०० लोकांना अशाप्रकारे आर्थिकदृष्ट्या त्यांनी सुरक्षित केलेले आहे. इन्शुरन्समधला ‘एमडीआरटी’ हा मानाचा किताब त्यांना आतापर्यंत तीन वेळा मिळाला आहे. प्रणाली, श्रद्धा, रोहित, विकास या आपल्या सहकार्‍यांमुळेच हे शक्य झाले, असे ते मान्य करतात. २०२२ पर्यंत ६ हजार लोकांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा त्यांचा मानस आहे.

 

यासोबतच ते सामाजिक कार्यातसुद्धा हिरीरीने पुढे असतात. विद्या विकासचे माजी विद्यार्थी समूह, गजानन महाराज सेवा मंडळ, तळवली येथील श्रीकृष्ण प्रतिष्ठान आदी संस्थांमध्ये विविध पदांवर ते कार्यरत आहेत. ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’ या महाराष्ट्रीय उद्योजकीय संस्थेत सध्या ते नॅशनल बिझनेस सेलचे सहसमन्वयक आहेत. कोणताही उद्योजक स्वानुभवातून घडतो, तेव्हाच तो इतरांसाठीदेखील प्रेरणादायी ठरतो. असाच काहीसा प्रवास विनोद कांबळे यांचादेखील आहे. मदतीस नेहमीच तत्पर हा त्यांचा गुण खर्‍या अर्थाने त्यांना समृद्ध करत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@