युधिष्ठिरास चिंता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2019
Total Views |


 

द्रोणांनी दुर्योधनाला वचन दिले होते की, त्याला पकडून देईन. त्यानुसार द्रोण त्याच्याशी युद्ध करत होते. अत्यंत घनघोर व प्रेक्षणीय असे युद्ध झाले. युधिष्ठिराने तर पराक्रमाची शर्थ केली. त्याने द्रोणांना अनेक ठिकाणी जखमी केले.

 
इंद्राच्या वज्रासारखे एक अस्त्र त्याने त्यांच्यावर फेकले, त्यामुळे त्यांचा वध होईल असे सर्वांना वाटले. पण, द्रोणांनी दुसरे प्रभावी अस्त्र वापरून ते निकामी केले. नंतर त्याच्या जवळ जाऊन त्यांनी युधिष्ठिराच्या अंगावर गदा फेकली, ते पाहून युधिष्ठिराने पण आपली गदा फेकली आणि दोन्ही गदा एकमेकांवर आपटून भूमीवर आदळल्या. हवेत ठिणग्या उडाल्या, त्याचा ध्वज द्रोणांनी बाण सोडून तोडला. रथाचे घोडेही ठार मारले. मग रथपण तोडायचा यत्न केला. आपला जीव वाचवण्यासाठी युधिष्ठिराला रथ सोडून बाहेर पडावे लागले.
 

युधिष्ठिर जमिनीवर उतरलेला पाहून द्रोण त्याच्यावर कब्जा करणार इतक्यात सात्यकी मध्ये आला आणि युधिष्ठिर उडी मारून सात्यकीच्या रथात चढला. अशा रीतीने सात्यकीने युधिष्ठिराची सुटका केली. त्याला कैद करण्यासाठी द्रोणांनी जंग जंग पछाडले, पण याही वेळी सात्यकीमुळे ते असमर्थ ठरले. द्रोण व सात्यकी यांच्यात मोठे युद्ध झाले. एकीकडे अलाम्बुश आणि घटोत्कच यांच्यात युद्ध झाले आणि घटोत्कचाने अलाम्बुशाचा वध केला. अलाम्बुश संपला म्हणून कौरवांना मोठाच धक्का बसला. युधिष्ठिराने घटोत्कचाचा हा पराक्रम पाहून त्याला आलिंगन दिले व सर्वांनी त्याचा जयजयकार केला. भीम आपल्या मुलाचा हा पराक्रम पाहून एकदम खूश झाला. एवढ्यात सर्वांना श्रीकृष्णाच्या पांचजन्य शंखाचा आवाज ऐकू आला. त्यामुळे युधिष्ठिराला वाटले की,अर्जुन संकटात आहे. तो चिंतातूर झाला. सात्यकीला तो म्हणाला, “सात्यकी, तुला पांडवांची काळजी आहे. आता तू आम्हाला अधिक मदत करायला हवी. अर्जुनावर जिथे हल्ला होत आहे, तिकडे जाऊन तू त्याला मदत केली पाहिजे. तू आता मला सोडून त्याच्या मदतीस जा. माझी काळजी भीम घेईल. मला अर्जुनाची खूप काळजी वाटते आहे. तू तिकडे त्याच्या मदतीस जा, माझी काळजी करू नकोस.”

 

सात्यकी म्हणाला की, “तू म्हणतोस ते मला कळते आहे. मला तुम्ही सारेच प्रिय आहात. परंतु, मला खात्री आहे की, अर्जुन कौरवांचा समाचार घ्यायला समर्थ आहे. खरे तर मला तुझीच काळजी आहे. कारण, हे द्रोण महाभयंकर आहेत. तुला कैद करायचा त्यांनी चंग बांधला आहे. त्यांनी तशी प्रतिज्ञा केली आहे. काही क्षणांपूर्वी त्यांनी जवळ जवळ यश मिळविले. जसे बाळ आपल्या आई जवळ राहते, त्याप्रमाणे तू मला बिलगून राहा. कारण, मी निघून गेलो आणि तुला काही झाले, तर मी मलाच क्षमा करू शकणार नाही. अर्जुन मलाच दूषणे देईल. या द्रोणाबरोबर युद्ध करायला मी आणि प्रद्युम्न यांच्याशिवाय कोणी नाही. तू अर्जुनाची काळजी सोड आणि माझ्यापाशी राहा. अर्जुन आपली काळजी घेण्यास समर्थ आहे. धृष्टद्युम्न आणि मी तुझे रक्षण करत आहोत. ज्या क्षणी मी तुझ्यापासून दूर होईन द्रोण तुझ्यावर झडप घालून तुला कैद करतील. धृष्टद्युम्न आणि मी तुझे रक्षण करत आहोत आणि मी जर निघून गेलो तर तुझे रक्षण कोण करेल? म्हणून मी जात नाही.”

 

युधिष्ठिर म्हणाला, “तुझे विचार बरोबर आहेत. पण, माझे मन अर्जुनाचाच विचार करत आहे. अरे भीम, धृष्टद्युम्न, घटोत्कच, द्रौपदीचे दोन पुत्र, कैकेय भाऊ, विराट, द्रुपद, शिखंडी, नकुल, सहदेव, धृष्टकेतु, कुंतिभोज आणि आपले सारे सैन्य माझी काळजी घेतील. तू जा आणि अर्जुनाचे संरक्षण कर.” त्या परिस्थितीत काय करावे हे सात्यकीला कळेना. त्याला युधिष्ठिरास सोडून जायचे नव्हते. पण, अर्जुनाच्या मदतीला गेलो नाही तर लोक आपल्याला भ्याड म्हणतील, अशी भीती त्याला वाटत होती. अश्रुपूर्ण डोळ्यांनी तो युधिष्ठिरास म्हणाला, “मी तुला असा सोडून जाऊ शकत नाही. पण, तरीही मी जातो आहे. ईश्वर तुझे रक्षण करो. माझे अर्जुनावर पण तितकेच प्रेम आहे. मी त्याच्या सांगण्यावरून इथे थांबलो होतो. तुझ्या इच्छेनुसार मी आता जाऊन त्याचे रक्षण करीन.”

 

सात्यकीने तयारी केली. अर्जुनापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला दोन व्यूह पार करावे लागणार होते. त्यातील एक अर्जुनाने खिळखिळा केला होता. दुसर्‍या व्यूहाचे रक्षण द्रोण स्वत: करत होते. सात्यकीने युधिष्ठिरास प्रणाम केला आणि तो निघाला. तो भीमास म्हणाला, “आता युधिष्ठिराच्या रक्षणाची जबाबदारी तुझ्यावर सोपवून मी जातो आहे. तू द्रोणांपासून सावध राहा. ते त्याला पकडून नेतील.” भीम म्हणाला की, “तू काळजी करू नको. मी आणि धृष्टद्युम्न त्याचे रक्षण करण्यास समर्थ आहोत. तू जा. तुला उशीर होतो आहे.”


- सुरेश कुळकर्णी

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@