उत्तर प्रदेशातील ‘यादवी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2019   
Total Views |

 

 
 
 
 
मुलगा वडिलांच्या नावाने मतं मागतो आहे आणि वडील मुलासह स्वपक्षावर रोज नव्याने टीका करताहेत, त्यांच्या मित्रपक्षावरही ते नाराज आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षाच्या प्रमुखाची जाहीर स्तुती थेट लोकसभेत करत आहेत, अशी काहीशी विचित्र परिस्थिती उत्तर प्रदेशच्या राजकारणात निर्माण झाली आहे. यातील वडील म्हणजे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि भारतीय राजकारणातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, अर्थात मुलायमसिंह यादव आणि मुलगा म्हणजे त्यांचे पुत्र अखिलेश यादव. या यादव कुटुंबात गेली दोन-तीन वर्षं जो कुटुंबकलह सुरू आहे, त्याचे पडसाद उत्तर प्रदेशच्या आणि स्वाभाविकपणे भारताच्या राजकारणावर पडत आहेत. कारण, समाजवादी पक्ष हा यादव घराण्याच्या नावावर चालणारा पक्ष असल्याने त्यांचं घर आणि पक्ष यात फारसा काही फरक राहत नाही. मुलायम, त्यांचे बंधू शिवपाल, रामगोपाल आणि पुत्र अखिलेश तसंच मुलायम यांच्या सून डिंपल, अपर्णा अशा यादव कुटुंबाभोवती सपचं राजकारण फिरत असतं. गेली दोन-तीन वर्षं या कुटुंबात दोन गट पडले आहेत आणि या ‘यादवी’त मुलायमसिंह मात्र कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात हताश होऊन हे सारं पाहत आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांत मुलायम यांनी ज्याप्रकारे विधानं केली आहेत, त्यावरून ही यादवी आणखी उग्र रूप धारण करण्याची शक्यता वाटते आहे. मुलायमसिंह हे भारतीय राजकारणात गेली ४० वर्षं कसलेले आणि मुरलेले खेळाडू आहेत. आपल्या मुलाकडे मोठ्या आशेने त्यांनी पक्षाची सूत्रं दिली होती खरी, पण या कुटुंबकलहात बाप-बेट्यात चांगलंच बिनसल्याचं चित्र आहे. त्यामुळे एकीकडे अखिलेश यादव हे पारंपरिक प्रतिस्पर्धी मायावतींना घेऊन आघाडी करत होते आणि दुसरीकडे मुलायमसिंह भर लोकसभेत नरेंद्र मोदींना उद्देशून तुम्हीच पुन्हा पंतप्रधान व्हा, असं सांगत होते. तेही सोनिया गांधी शेजारी बसलेल्या असताना. आता सप-बसप आघाडीवरही थेट टीका करताना या आघाडीच्या जागावाटपावरही मुलायम यांनी तोंडसुख घेतलं आहे. ज्यामुळे सपचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. त्यामुळे आगामी काळात या समाजवादी पक्षाच्या सायकलीची चाकं नेमकी कोणत्या दिशेने जातात, हेच पाहावे लागेल.
 

भाजपविरोधी मतांची फाटाफूट?

 

उत्तर प्रदेशात आजही मुलायमसिंह यांना राजकीय स्थान आहे, त्यांच्या शब्दाला वजन आहे. पक्षाचे संस्थापक म्हणून त्यांना मानणारा एक मोठा कार्यकर्तावर्ग आहे. त्यामुळे अखिलेश यांची भलतीच गोची झाली आहे. तशातच, सपच्या पायात पाय अडकविल्याने बसपच्या मायावतींचीही कोंडी झाली आहे. पुन्हा, अखिलेश हे मुलायम यांच्या नावानेच मतं मागणार असल्याने मायावतींना मुलायम यांच्याविरोधात थेट काही बोलणंही परवडणारं नाही. “कुणाला उमेदवारी हवी असेल, तर माझ्याकडे या,” असं सांगून मुलायम यांनी आपल्या मुलाची आणखी अडचण केली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या सगळ्या गोंधळाचे परिणाम सपला भोगावे लागणार, हे आताच दिसत आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं आणि त्याचे परिणामही तितकेच अनाकलनीय असू शकतात, याचा प्रत्ययच उत्तर प्रदेशात घडणाऱ्या या घडामोडींतून पाहायला मिळत आहे. काँग्रेस भव्य महाआघाडीची स्वप्नं बघत असताना सप आणि बसपने काँग्रेसला झटकून टाकत स्वतंत्रपणे आघाडी केली. यामुळे उत्तर प्रदेशात आधीच केविलवाण्या अवस्थेत असलेल्या काँग्रेसची आणखी बिकट अवस्था झाली. दुसरीकडे, बलाढ्य भाजपपुढे सप-बसप आघाडीमुळे फार मोठं संकट उभं राहिल्याचं चित्र रंगवण्यात आलं. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच दिसत आहे. काँग्रेसने प्रियांका गांधींना राजकारणात उतरवून लढतीत आणखी रंगत आणली. प्रत्यक्षात किती ते स्पष्ट होत नसलं तरी कागदावर आकडेमोड करताना तरी प्रियांकांच्या एंट्रीमुळे काँग्रेसची बाजू थोडी अधिक भक्कम झाली आहे, असं समजायला वाव आहे. त्यामुळे ‘भाजपविरोधी’ अशी वाटणारी ही लढत प्रत्यक्षात तिरंगी बनली आहे. त्यात पुन्हा, सप-बसप आघाडीतील या साऱ्या सावळ्या गोंधळामुळे ही आघाडीही संसाराला सुरुवात होण्यापूर्वीच अपशकुनांचा सामना करत आहे. दुसरीकडे, भाजपने विजयाचं एकमेव उद्दिष्ट समोर ठेऊन निर्धारपूर्वक वाटचाल सुरू ठेवली आहे आणि त्यात त्यांना हळूहळू यशही मिळताना दिसत आहे. त्यामुळे मुळातच कमकुवत असलेली काँग्रेस, त्यात प्रियांकांनी आणलेली जान, सप-बसपच्या आघाडीमुळे दोन पक्षांत होत असलेली अंतर्गत धुसफूस, मुलायम यांचं अनाकलनीय वागणं इ. मुळे भाजपविरोधी मतांचं मोठं विभाजन होण्याची शक्यता दिसत असून याचा फायदा अर्थातच भाजपला मिळणार, हे स्पष्ट आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@