भारताकडून पाकिस्तानची पाणीकपात... पण कशी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2019   
Total Views |

 

 
 
 
आज आपण आपल्या लेखमालेपासून थोडे दूर जाऊन भारत सरकारच्या एका मोठ्या निर्णयावर काही माहिती घेणार आहोत. तो निर्णय म्हणजेच सिंधु करारानुसार जम्मू-काश्मीर राज्यातून व पुढे पाकिस्तानात वाहणाऱ्या नद्यांचे भारताच्या वाट्याचे पाणी वापरणे, हा होय.
 

काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात आपल्या लष्करावर १४ फेब्रुवारीला झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. लष्करावर झालेला हा हल्ला खरोखर निंदनीय आहे. नेहमीप्रमाणेच या हल्ल्याचेही धागेदोरे पाकिस्तानातच जातात यातही आता काही नवल राहिलेलं नाही. या व इतर हल्ल्यांमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना आणि भारतीय नागरिकांना नुसतीच श्रद्धांजली देत बसण्यापेक्षा या हल्ल्यांचे सूत्रधार जिथे आहेत त्या पाकिस्तानलाच एखादा जबर तडाखा देता आला, तर कोणाला आवडणार नाही? आता भारताने स्वत:हून कधीही शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेले नाही आणि पुढेही करण्याची शक्यता नाही. पण, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी एक असे शस्त्र आपल्याकडे आहे, ज्यासाठी एकही गोळी चालवायची गरज नाही. हे शस्त्र आहे पाणी. पाकिस्तानला पाणीपुरवठा करणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या मोठ्या नद्या हिमालयात उगम पावतात आणि भारतातून जातात. या नद्यांमार्गे पाकिस्तानला जाणारे पाणी जर आपण अडवले, तर पाकिस्तानमधील अनेक मोठ्या शहरांचा पाणीपुरवठाच बंद होईल. हे जाणूनच भारत सरकारने निर्णय घेतला की, आपले पाणी पाकिस्तानात जाऊच द्यायचे नाही. आपण या विषयाकडे राजकीयदृष्टीने बघण्यापेक्षा भूशास्त्रीयदृष्टिकोनातून आणि थोडेसे अभियांत्रिकीयदृष्टीने बघू. तत्पूर्वी आपण या पाण्याच्या देवाणघेवाणीस कारणीभूत असलेल्या ‘सिंधु जलकरारा’ची अगदी थोडक्यात माहिती घेऊ.

 
१९ सप्टेंबर, १९६० रोजी भारत आणि पाकिस्तानात ‘सिंधु जलकरार’ (Indus Water Treaty - IWT) झाला. या करारानुसार भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या एकूण सहा नद्यांना पूर्ववाहिनी नद्या (Eastern rivers - रावी, बियास, सतलज) आणि पश्चिमवाहिनी नद्या (Western rivers - सिंधु, झेलम, चिनाब) अशा दोन प्रकारांमध्ये विभागलेले आहे. करारानुसार, पूर्ववाहिनी नद्यांचे संपूर्ण नियंत्रण भारताकडे आहे, तर पश्चिमवाहिनी नद्यांचे संपूर्ण नियंत्रण पाकिस्तानकडे आहे. यात पाकिस्तानचे नियंत्रण असलेल्या पश्चिमवाहिनी नद्यांची वहनक्षमता (Discharge) ही सुमारे ८० दशलक्ष एकर-फूट (एक एकर परिसरात पसरलेल्या आणि एक फूट उंच असलेल्या पाण्याच्या टाकीचे आकारमान) आहे, तर भारताचे नियंत्रण असलेल्या पूर्ववाहिनी नद्यांची वहनक्षमता ही सुमारे ३३ दशलक्ष एकर-फूट म्हणजे पश्चिमवाहिनी नद्यांच्या तुलनेत फारच कमी आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी ‘सिंधु जलकरारा’त अशी तरतूद केलेली आहे की, पश्चिमवाहिनी नद्या भारताच्या प्रदेशात जेवढ्या अंतरापर्यंत आहेत, तेवढ्या अंतरामध्ये भारत या नद्यांमधील पाण्याचा मर्यादित प्रमाणात सिंचनासाठी उपयोग करू शकतो, तसेच यातील पाण्यापासून अप्रतिबंधित ऊर्जानिर्मितीही करू शकतो. म्हणजेच, पश्चिमवाहिनी नद्यांच्या पाण्यापैकी सुमारे १९ टक्के पाणी भारतासाठी, तर ८१ टक्के पाणी पाकिस्तानसाठी, तर पूर्ववाहिनी नद्यांच्या पाण्यापैकी सुमारे ८१ टक्के पाणी भारतासाठी, तर १९ टक्के पाणी पाकिस्तानसाठी अशी तरतूद या करारात केलेली आहे.
 
 

 
 

भारताने पूर्ववाहिनी नद्यांपैकी रावी नदीवर आठ, बियास नदीवर तीन, आणि सतलज नदीवर तीन धरणे बांधली आहेत. तीन नद्यांवर १४ धरणे म्हणजे चांगलेच प्रभावी कार्य आहे, पण भारताच्या प्रदेशातील पश्चिमवाहिनी नद्यांवर मात्र ही प्रगती फारशी नाही. सिंधु नदीवर एक, झेलम नदीवर एक आणि चिनाब नदीवर तीन अशी केवळ पाच धरणे पश्चिमवाहिनी नद्यांवर आजपर्यंत बांधण्यात आली आहेत. अर्थात, या करारातील निर्बंधांमुळे या तीन नद्यांवर फार बांधकाम करणे शक्यही नाही, पण भारताच्या नियंत्रणाखाली असलेल्या भूभागातील पश्चिमवाहिनी आणि पूर्ववाहिनी नद्यांचे भारताच्या वाट्याचे पाणीही पाकिस्तानात जाते. कारण काय, तर भारताकडे ते पाणी साठवण्यास काही नाही. सध्या भारत त्याच्या वाट्याचा सुमारे ९३ टक्के जलसाठा वापरतो. आपले लक्ष हे १०० टक्के जलसाठा वापरणे आणि कोणताही करार न मोडता पाकिस्तानात जाणारे अतिरिक्त पाणी अडवणे हे आहे. मग आपण काय करू शकतो आणि सध्या काय करत आहोत? हे जाणून घेण्यासाठी आपण या नद्यांची थोडी प्राकृतिक माहिती घेऊ.

 

जगातील २१ वी मोठी आणि पाकिस्तानातून जाणारी सर्वात मोठी नदी म्हणजे सिंधु नदी. ही नदी मानस सरोवर येथे उगम पावते. तेथून ती थोड्या अंतरासाठी भारतात येते आणि भारतातून ती पाकिस्तानच्या ईशान्य भागात शिरून पाकिस्तानच्या दक्षिणेला अरबी समुद्राला जाऊन मिळते. ही नदी पाकिस्तानातील सर्वात मोठा जलस्रोत असून पूर्ण पंजाब प्रांताचा उत्पन्नाचा स्रोत आहे. ही नदी पंजाब प्रांतातील शेती आणि विविध उद्योगांसाठी महत्त्वाचा स्त्रोत आहे तसेच, पाकिस्तानातील प्रमुख पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी नदी आहे.पाकिस्तानातील ७५ टक्के शेती ही सिंधु नदीच्या पाण्यावरच अवलंबून आहे. सिंधुनंतर सर्वात लांब नदी आहे सतलज. ही नदी मानससरोवराच्या डावीकडील राक्षसतळ येथे उगम पावून हिमाचल प्रदेश आणि पंजाबमार्गे पाकिस्तानात सिंधु नदीला मिळते. पुढील नदी आहे चिनाब. हिमाचल प्रदेश येथे उगम पावून ही नदी काश्मीरमधून वाहत पाकिस्तानात सिंधु नदीला जाऊन मिळते. नंतर येते झेलम. काश्मीरमधील पीर-पंजाल येथे उगम पावून ही नदी काश्मीरमधून वाहत पाकिस्तानात जाते आणि चिनाब नदीला जाऊन मिळते. झेलमनंतर येते रावी. ही नदी हिमाचल प्रदेशातील बारा बंगहाल येथे उगम पावून काश्मीरमार्गे पाकिस्तानात जाते आणि चिनाब नदीला जाऊन मिळते. शेवटची नदी आहे बियास. हिमाचल प्रदेशात उगम पावून ही भारतातच सतलज नदीला येऊन मिळते. अशा प्रकारे पाकिस्तानातील सहा प्रमुख नद्या भारतातूनच जातात. या नद्या याच पाकिस्तानच्या पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा स्रोत आहेत. पाकिस्तानात अफगाणिस्तानातील हिंदू कुश पर्वतातूनही काही नद्या येतात, पण त्या एवढ्या मोठ्या नाहीत आणि उन्हाळ्यात त्या कोरड्या पडतात. म्हणून या सहा नद्याच पाकिस्तानसाठी महत्त्वाच्या आहेत.

 

आधी म्हटल्याप्रमाणे, भारताच्या वाट्याचे पाणी पाकिस्तानला जाते. याचे कारण म्हणजे धरणांचा अभाव. तसेच भारताच्या वाट्याचे पाणी साठवून ठेवायला आपल्याकडे तेवढी मोठी जलाशयंही नद्यांच्या आसपास नाहीत. या नद्यांमधील पाणी दुसरीकडे न्यायचे म्हटले, तर आवश्यक ती कालव्यांची व्यवस्थाही अस्तित्वात नाही. तसा प्रयत्नच आजपर्यंत केला गेला नाही आणि तांत्रिकदृष्ट्या ते फार कठीणही आहे, पण अशक्य नाही. या सगळ्या नद्या हिमालयात उगम पावतात आणि वाहत वाहत पाकिस्तानात जातात. या सर्व नद्यांना त्यांचे पाणी हे उंचावरील हिमनद्यांमधून मिळते. हिमनद्या या साधारणपणे बारमाही असतात. त्यामुळे या नद्यांनाही भरपूर पाणी मिळते. आता उन्हाळ्यातही ज्या नद्यांना चांगल्यापैकी पाणी असते, तेथे पावसाळ्यातील परिस्थिती काय सांगावी? पावसाळ्यात या सगळ्या नद्यांना पूर येतात आणि या नद्या प्रचंड नुकसान घडवतात. या नद्यांचे पाणी अडवायचे म्हणजे जम्मू-काश्मीर भागातील पूरस्थितीचा विचार केला पाहिजे. याशिवाय कालवे खणून या नद्यांचे अतिरिक्त पाणी दुसरीकडे वळवणे हा खर्चिक प्रकल्प आहे. या सगळ्या नद्या हिमालयातून वाहतात आणि गेल्या अनेक लेखांमध्ये मी म्हटल्याप्रमाणेच हिमालय हा दोन खंडीय प्लेट्सच्या सीमेवर असल्यामुळे फार असंतुलित आहे आणि साध्या परिस्थितीतही तेथे भूकंपांचा धोका आहे. अशा ठिकाणी मोठे जलाशय वा कालव्यांचे बांधकाम केल्यास इथल्या क्रस्टवर म्हणजेच भूभागावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. समजा, भूरचनात्मकरित्या सर्व संतुलित आहे असे आपण मानले तरी जवळजवळ १० ते १५ वर्षे या प्रकल्पाला लागू शकतात.

 

 
 
 
झेलम नदीची उपनदी असलेल्या किशनगंगा नदीवर ०१ साली आपण धरण बांधून पूर्ण केले आहे. तसेच पठाणकोट जिल्ह्यात रावी नदीवर तर कठुआ जिल्ह्यात रावीच्या एका नदीवर धरण बांधण्याचे काम सुरू आहे. तसेच झेलम नदीची उपनदी असलेल्या पूंछ नदीवरील धरणाच्या बांधकामालाही मंजुरी मिळाली आहे. याखेरीज रावी आणि बियास या नद्या जोडण्याच्या ‘रावी-बियास जोडणी प्रकल्पा’वरही काम सुरू आहे. एकदा ही सर्व कामे झाल्यावर आपल्या हक्काचे पाणी जम्मू-काश्मीरच्या, पंजाबच्या आणि राजस्थानच्या लोकांना वापरण्यासाठी दिले जाईल. या पाण्यामुळे या सर्व भूभागांमधील जमिनीची सुपीकता वाढेल आणि त्यामुळे तिची उत्पादनक्षमताही वाढेल. हे सर्व होत असतानाच एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, यात ‘सिंधु जलकरारा’चे कोणतेही उल्लंघन आपण करत नाही आहोत. ‘सिंधु जलकरारा’चे उल्लंघन करून काही कारवाई करायची असेल, तर वाट्टेल ते करता येऊ शकेल. चिनाब नदी ही जेव्हा जम्मूमध्ये प्रवेश करते, तेव्हा ती रावी नदीपासून फक्त काही किलोमीटरच दूर आहे आणि त्यांच्यामध्ये डोंगराचा एक फारच अरूंद पट्टा आहे. जर चिनाब आणि रावी या दोन नद्या जोडल्या, तर पाकिस्तानात जाणारा एक मोठा प्रवाहच आपल्याला खंडित करता येईल आणि त्याचे गंभीर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील. अर्थात, यामध्ये कराराचा भंग होईल आणि या करारात जागतिक बँकही (World Bank) सहभागी असल्यामुळे त्याचे राजकीय परिणामही होतील. पाकिस्तानचा समावेश जगातील पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या देशांमध्ये केला जातो. आपल्याच वाट्याचे पाणी आपण वापरत नसूनही आणि हे अतिरिक्त पाणी पाकिस्तानला फुकट मिळत असूनही पाकिस्तानात चांगले पाणी मिळणे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्या वाट्याचे पाणी आपल्याच देशात ठेवून आपल्याविरोधात सतत दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला तहानलेले ठेवून चांगलाच धडा शिकवण्याची नामी संधी आपल्याकडे आहे आणि त्यावर विविध पातळ्यांवर कामही सुरू आहे.
 

(लेखक हे नागरी अभियांत्रिकीमध्ये पदवीधर असून अमेरिकेतील एका नामांकित विद्यापीठातून भूभौतिकीय अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षणही घेत आहेत. तसेच अमेरिकेतील त्यांच्या सहकार्यांबरोबरच तेथेच त्यांचे शोधनिबंधही प्रसिद्ध झालेले आहेत.)

 

संदर्भ- https://www.rediff.com/news/interview/if-you-stop-water-to-pakistan-you-will-flood-jk/२०१६०९२४.htm, https://www.theguardian.com/world/२०१९/feb/२२/india-again-threatens-to-restrict-flow-of-river-water-to-pakistan-as-tension-builds, https://www.quora.com/Can-India-divert-Indus-and-Satlaj-rivers-towards-Rajasthan-desert-If-yes-what-would-happen-to-Pakistan, http://www.geologypage.com/२०१४/०८/indus-river.html, https://en.wikipedia.org/wiki/IndusšRiver, https://en.wikipedia.org/wiki/IndusšWatersšTreaty, https://www.britannica.com/place/Sutlej-River, http://india-wris.nrsc.gov.in/wrpinfo/index.php?title=DamsšinšIndusšBasin, https://www.youtube.com/watch?v=KqeFzpSZRI, https://www.youtube.com/watch?v=NgsScxPWM

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@