पाकसाठी ‘गोली’, काश्मीरसाठी ‘बोली’ !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2019   
Total Views |

 

 
 
 
 
भारताला, पाकिस्तानातील दहशतवादी गट व आयएसआय यांना अक्षरश: टारगेट करावे लागेल.होय! आम्ही आयएसआयच्या प्रमुखाला, मौलाना मसूद अझहरला ठार केले, हे जगाला सांगावे लागेल. त्यात कोणतीही लपवालपवी करून चालणार नाही. मात्र, हे करीत असताना, काश्मिरी जनतेला राष्ट्रीय प्रवाहात आणावे लागेल. हे केल्याशिवाय काश्मीरमधील हिंसाचार आटोक्यात येणार नाही. 
 
 

चॅनेलच्या न्यूज रूम जेव्हा वॉर रूम होतात, तेव्हा काय होते हे साऱ्या देशासमोर आहे. पाकिस्तानवर हल्ला, पाकिस्तानचा सफाया, पाकिस्तानचा नायनाट असे सहजपणे बोलले जात असताना, भारताने पाकिस्तानात जाणाऱ्या नद्यांचे अतिरिक्त पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला. भारत सरकार वा भारतीय लष्कर कुणीही युद्धाची भाषा उच्चारलेली नाही. एका परिपक्व देशाचे हे एक उदाहरण आहे. दुसरीकडे पाकिस्तानवर या घटनाक्रमाचा दबाव येत असल्याने त्यानेही काही दहशतवादी संघटनांशी संबंधित संघटनांवर बंदी घालण्याची घोषणा केली. हा सारा घटनाक्रम कोणत्या दिशेने जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुलवामात झालेली घटना गंभीर आहे. ४५ जवान एका घटनेत ठार झाले. मात्र, यापेक्षा मोठी घटना २०१० मध्ये छत्तीसगढमध्ये घडली होती. नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात सीआरपीएफचे ७६ जवान ठार झाले होते. त्या घटनेवर देशात संतापाची जी लाट उसळावयास हवी होती, ती उसळली नव्हती. या घटनेत पाकिस्तान असल्याने त्याची तीव्रता, दाहकता जास्त झाली आहे. आता या घटनेला कोणते व कसे उत्तर द्यायचे यावर उटलसुलट चर्चा केली जात आहे.

 

कारगिलचा इतिहास

 

पाकिस्तानला जबर तडाखा म्हणजेच युद्ध, अशी एक स्वाभाविक भावना देशातील नागरिक नोंदवित आहेत. २० वर्षांपूर्वी कारगिलमध्ये भारताने पाकिस्तानला मार दिला. मिराजपासून, मिग विमानापर्यंत सर्वांचा वापर करण्यात आला. बोफोर्स तोफांनी आग ओकली. भारताने कारगिलचे युद्ध जिंकले. पाकिस्तानी घुसखोरांना भारतीय सीमेतून बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कराला ६० दिवस लागले आणि यात जवळपास ६०० जवान व अधिकारी शहीद झाले. पण, या विजयाचे वलय सहा महिनेही टिकले नाही. डिसेंबर १९९९ मध्ये पाकिस्तानच्या आयएसआयने, भारतीय विमानाचे अपहरण करून ते विमान कंदाहारला नेले. अपहरणकर्त्यांनी तिघा अतिरेक्यांची सुटका करण्याची मागणी केली होती. प्रारंभी वाजपेयी सरकार, ही मागणी मान्य करण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अपहरणकर्त्याविरुद्ध कारवाई करून, प्रवाशांना सोडविण्याचा प्रयत्न करावा, असा विचार सरकारमध्ये सुरू होता. यात काही प्रवाशांचे जीव धोक्यात येतील, हे सरकार जाणून होते. तरीही कठोर भूमिका घेण्याची सरकारची तयारी होती. मात्र, जे चॅनेलवाले आज युद्धाची भाषा बोलत आहेत त्यांनी त्यावेळी-विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांच्या मुलाखती, मागण्या प्रसिद्ध करून असे काही वातावरण तयार केले की, त्या दबावाखाली, सरकारने तिघा अतिरेक्यांची सुटका करीत, प्रवाशांचे प्राण तर वाचविले. पण, त्याबदल्यात ज्या मौलाना मसूद अझहरची सुटका करण्यात आली. त्यानेच पुलवामात ४५ जवानांचे प्राण घेतले.

 

राष्ट्रहिताची भूमिका

 

२००१ मध्ये देशाच्या संसदेवर हल्ला झाला, काही वर्षांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर हल्ला झाला. काश्मीरमध्ये हिंसाचार सुरू आहे. आता पुलवामा घडल्यानंतर पाकिस्तानवर आक्रमण, पाकिस्तानचा सफाया असे वातावरण प्रसारमाध्यमे निर्माण करीत आहेत. सामान्य भारतीयाला पुलवामाच्या घटनेचा संताप येणे स्वाभाविक आहे. या भावनांना कोणत्या प्रकारे हाताळावयाचे याचा योग्य विचार सरकार करीत आहे. सरकारने जनभावनांचा आदर करावा, असे मानले जाते. पण, काश्मीर-पाकिस्तान हे एवढे गुंतागुंतीचे मुद्दे आहेत की, जनभावना व सरकार यांच्या भूमिकेत भिन्नता असणे स्वाभविक आहे आणि अशा स्थितीत सरकार जी भूमिका घेत आहे, ती अधिक राष्ट्रहिताची मानली पाहिजे.

 

युद्ध पर्याय?

 

पाकिस्तानवर अगदी उद्या हल्ला चढविला तरी त्यातून फार काही साध्य होणार नाही. चार-पाच दिवस युद्ध चालेल. नंतर अमेरिका-चीन यांची मध्यस्थी होईल. ती न झाल्यास युद्ध चुकीच्या दिशेने जाईल. भारत-पाकिस्तान दोन्ही देश अण्वस्त्रसंपन्न आहेत. परंपरागत युद्धात पाकिस्तान पराभूत होण्याची स्थिती निर्माण झाल्यास, तो अण्वस्त्रांचा वापर करील काय? समजा, भारताने पाकिस्तानला निर्णायक मात दिली तरी, पाकिस्तानातील अण्वस्त्रांचा साठा कुणाच्या हाती पडेल? ही अण्वस्त्रे इमरान खानच्या हाती असणे सुरक्षित की मौलाना मसूद अझहरच्या हाती पडणे सुरक्षित, हे सारे गंभीर प्रश्न आहेत. पाकिस्तानजवळ १३० ते १४० अण्वस्त्रे असल्याचा अंदाज आहे. ही अण्वस्त्रे मौलाना अझहरच्या हाती पडणे म्हणजे, माकडाच्या हाती अण्वस्त्रे देण्यासारखे ठरणार आहे. या साऱ्या पैलूंची जाणीव सरकारला असल्यामुळेच, सरकारला फार विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. पाकिस्तानला मार बसला तरी सहा-आठ महिन्यांत तो पुन्हा आयएसआयच्या माध्यमातून कारवाया सुरू करील. हे चक्र न संपणारे असेल आणि म्हणून पाकिस्तान व काश्मीरबाबत एक नवे धोरण भारताला ठरवावे लागेल.

 

नवा मार्ग?

 

काश्मीरमध्ये जे काही होत आहे त्याचे केंद्र इस्लामाबाद आहे. विदेशी दबाव आणून पाकिस्तानला वठणीवर आणता येईल, या प्रयत्नात ७० वर्ष गेली. ते झाले नाही. आता, लष्करी कारवाईचा विचार होत आहे. या ठिकाणी हे विसरता कामा नये की, भारत- पाकिस्तान यांच्यात आजवर झालेल्या लष्करी कारवायांचा केंद्रबिंदू काश्मीर राहिलेले आहे. १९४८, १९६५, १९७१ व १९९९ या तिन्ही युद्धात भारताने पाकिस्तानला पराभूत केले आहे. तरी पुलवामा झाले. म्हणजे कारगिल युद्धात एका दिवसात जेवढे भारतीय जवान शहीद झाले नाहीत, तेवढे जवान एका दिवसात पुलवामात शहीद झाले आणि म्हणून, आता केवळ युद्ध ही उपाययोजना परिणामकारक राहणार नाही. त्यासाठी भारताला, पाकिस्तानातील दहशतवादी गट व आयएसआय यांना अक्षरश: टारगेट करावे लागेल. होय! आम्ही आयएसआयच्या प्रमुखाला, मौलाना मसूद अझहरला ठार केले, हे जगाला सांगावे लागेल. त्यात कोणतीही लपवालपवी करून चालणार नाही. मात्र, हे करीत असताना, काश्मिरी जनतेला राष्ट्रीय प्रवाहात आणावे लागेल. हे केल्याशिवाय काश्मीरमधील हिंसाचार आटोक्यात येणार नाही. काश्मीरमध्ये आता भारताचे किती सुरक्षा जवान आहेत, याचा नेमका आकडा सांगता येणार नाही. मात्र, भारतीय लष्कराचे चिनार क्राप, राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ, सीमा सुरक्षा दल यांच्या अनेक बटालियन काश्मीर खोऱ्यात तैनात आहेत. तरीही खोऱ्यातील हिंसाचार थांबलेला नाही. काश्मीर खोऱ्यात फार बळाचा वापर करणे योग्य ठरणार नाही, ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. पुलवामाचा आत्मघाती हल्लेखोर स्थानिक होता, हे लक्षात ठेवले गेले पाहिजे. जोपर्यंत काश्मिरी जनतेला मुख्य प्रवाहात आणले जात नाही, पाकिस्तान हे करीत राहणार. काश्मीरमधील दहशतवादामागे पाकिस्तान आहे, हे साऱ्या जगाला माहीत आहे. मात्र, काश्मीर खोऱ्यात असंतोष आहे, हेही त्यांना माहीत आहे. पाकिस्तान या असंतोषाचा फायदा उठवित आहे आणि तो उठवित राहणार.

 

काश्मीरचे हिरो

 

सुरक्षा दलांनी ठार केलेल्या अतिरेक्यांचे अंत्यविधी हे नवे अतिरेकी तयार होण्याचे एक मोठे कारण ठरत आहे, असाही एक निष्कर्ष काढण्यात आला आहे. अतिरेक्यांच्या अंत्यविधीसाठी ५० हजारांहून अधिक लोक एकत्र होतात. यावर सुरक्षा दलांचे जवान काय कारवाई करणार? पुलवामाचा हल्ला ज्या युवकाने घडविला, त्याच्या घरी भेटणाऱ्यांची रिघ लागली आहे. हे कसे थांबणार?काश्मीरमधील असंतोष ही पाकिस्तानची खरी ताकद आहे. या सर्व पैलूंचा विचार करण्याची वेळ आली आहे आणि हा विचार नोकरशाही नाही तर राजकीय नेतृत्वाने केला पाहिजेआजही काश्मिरी जनतेचे हिरो- जनरल अयुब खान, झिया उल हक, परवेझ मुशर्रफ नाहीत तर जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी व जॉर्ज फर्नांडिस आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर साऱ्या देशाला जेवढे दु:ख झाले, तेवढेच दु:ख काश्मीर खोऱ्यालाही झाले. आम्हाला समजणारा हाच तर एक नेता होता, तोही गेला-अशी काश्मिरींची भावना होती. या भावना समजण्याची वेळ आली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@