राष्ट्रवाद-राष्ट्रद्रोह भेद करून काम करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Feb-2019
Total Views |

  • सैनिक, सरकारच्या समर्थनार्थ मोर्चाप्रसंगी डॉ. संदीपराज महिंद यांचे प्रतिपादन
  • राष्ट्रीय सुरक्षा मंच, स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
 


 
जळगाव, २२ फेब्रुवारी
देशात राष्ट्रवाद आणि राष्ट्रद्रोह हे दोनच मुख्य घटक आहेत. देशाचे जातीपातींमध्ये तुकडे करण्याचा अनेकवेळा प्रयत्न झाला. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर प्रत्येकवेळी आमच्या मनात देशप्रेम जागृत होते, परंतु ते काही काळापुरते जागृत असते. दशहतवाद संपवायला तुम्हाला-आम्हाला एकत्र राहण्यावाचून पर्याय नाही. प्रत्येकाने नेहमी राष्ट्रवाद आणि राष्ट्रद्रोह असा भेद करून कार्यरत राहावे, असे प्रतिपादन डॉ. संदीपराज महिंद यांनी केले.
 
 
पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले आहेत. आज आपापसातील वाद संपवून भारतीय सैनिकांच्या व सरकारच्या पाठबळासाठी शुक्रवारी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळ व राष्ट्रीय सुरक्षा मंचातर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
भारतीय सैनिक व पोलिसांनी अनेकवेळा आपले शौर्य दाखविले. परंतुु, आमची आता आरपारची लढाई असल्याचे निवेदन पंतप्रधानांना देणार असे, नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सांगितले. तसेच देशात देशविरोधी लिखाणावर बंदी असायला हवी, भारतीय सैनिक आणि पोलिसांच्या शौर्यगाथा अभ्यासक्रमात असायला हव्या, देशभक्ती लहानपणापासून अभ्यासक्रमात हवी. हिंदू-मुस्लीम बांधवांचा हा पहिला मोर्चा आहे. पुढे हाच जळगाव पॅटर्न सर्वत्र होईल, असेही ते म्हणाले.
 
 
पाकिस्तानने समोरून हल्ला करावा, आमचे सैनिक त्यांना उत्तर द्यायला सक्षम आहे. ज्या ठिकाणी भारताचा सैनिक दिसेल तिथेच त्याला सॅल्युट करायला विसरू नका, असे आवाहन आ. सुरेश भोळे यांनी केले.
 
 
शहिदांंच्या कुटुंबीयांसाठी सहवेदना निधी संकलित
मोर्चा संपल्यानंतर महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी सहवेदना निधी धनादेशाद्वारे संकलित करण्यात आला. त्यात आ. सुरेश भोळे यांनी ५१ हजार, मणियार बिरादरीकडून ५ हजार, मलिक फाउंडेशनतर्फे ५ हजार, सालार फाउंडेशनतर्फे ५ हजारांचा निधी देण्यात आला. तसेच रेल्वेस्थानक रिक्षा युनियनतर्फे रेल्वेस्थानकावर येणार्‍या सर्व भारतीय सैनिकांसाठी मोफत सेवा देण्याचे जाहीर करण्यात आले.
 
 
मोर्चातील नागरिकांकडून विविध घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला. मोर्चाचा समारोप वंदे मातरम्ने करण्यात आला. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडलीकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
 
 
मोर्चामध्ये तृतीयपंथी, हॉकर्स, भाजीपाला विक्रेते, नगरसेवक, विविध सामाजिक संघटनांचे सदस्य, विद्यार्थी-विद्यार्थिनी, आर्मी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विविध आस्थापनांचे कर्मचारी यांच्यासह देशभक्त नागरिक सहभागी झाले होते.
 
 
अशा आहेत मागण्या
प्रास्ताविकात राष्ट्रीय सुरक्षा मंचचे अनिल सोनवणे यांनी, घटनेचे कलम ३७० तत्काळ हटवावे, पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करावा, पाकीस्तानसोबतचे राजकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक संबंध संपवावे, सैन्याच्या तिन्ही दलांना निर्णायकी कारवाईसाठी परवानगी द्यावी, दहशतवादी गटांवर कारवाई करावी, सिंधू पाणी वाटप कराराचा पुनर्विचार करावा, घरामध्ये दहशतवाद्यांना आश्रय देणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, सैन्यदलावर दगडफेक करणार्‍यांवर देशद्रोही कायद्यानुसार कारवाई करावी, भारतीय सैन्याला पॅलेट गन वापरण्याची मुभा द्यावी या मागण्या प्रास्ताविकात मांडल्या.
पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून सुरुवात
 
 
दुपारी ४ वाजता चौबे शाळा चौकात पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आ. सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष कैलास सोनवणे, राष्ट्रीय सुरक्षा मंचाचे जिल्हाध्यक्ष अनिल सोनवणे, माजी उपमहापौर करीम सालार, गफ्फार मलिक यांच्यासह नगरसेवक व मोर्चेकरी उपस्थित होते. पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून मोर्चाला सुरुवात झाली.
 
@@AUTHORINFO_V1@@