भाजपा-अण्णाद्रमुक युतीचा अन्वयार्थ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
 
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने राष्ट्रीय लोकशाही आघाडी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू केले असून, त्याला यशही मिळत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात रालोआचा घटकपक्ष असलेेल्या शिवसेनेसोबत जागावाटपाचा समझोता झाल्यानंतर भाजपाने तामिळनाडूत अण्णाद्रमुकशी युती करत आपल्या दक्षिण दिग्विजयाचा मार्ग मोकळा केला आहे. देशाच्या इतर भागांच्या तुलनेत कर्नाटकचा अपवाद वगळता दक्षिण भारतातील अन्य राज्यांत भाजपाची स्थिती कधीच समाधानकारक राहिली नाही. त्यामुळे अण्णाद्रमुकसोबतच्या युतीचा भाजपाला मोठा दूरगामी राजकीय फायदा मिळू शकतो.
याआधी भाजपाने बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेडशी युती केली होती. यामुळे महाराष्ट्र, बिहार आणि तामिळनाडू या तीन राज्यांतील लोकसभा निवडणूक भाजपा आपल्या मित्रपक्षांसोबत लढणार, हे निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रवगळता बिहार आणि तामिळनाडूत हे पक्ष वेगवेगळे लढले होते.
 
 
 
 
तामिळनाडूत भाजपाने अण्णाद्रमुकशी केलेली युती पडुचेरीसाठीही राहणार आहे, त्यामुळे या तीन राज्यांत मिळून लोकसभेच्या 128 जागा आहेत. यातील किमान 80 ते 90 जागाही रालोआने जिंकल्या, तर भाजपाला केंद्रात सरकार बनवण्यासाठी त्याचा मोठा फायदा मिळणार आहे. भाजपा विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्ताच्युत करण्यासाठी कॉंग्रेस जंगजंग पछाडत आहे. पण, यश येण्याची चिन्हे नाहीत. तेलगू देसम, पीडीपीसारखे काही पक्ष रालोआतून बाहेर पडल्यामुळे भाजपाला नवे मित्रपक्ष शोधावे आणि जोडावे लागणार आहेत. तामिळनाडूत अण्णाद्रुमकसोबत झालेल्या युतीमुळे भाजपाला नवी ताकद मिळाली आहे.
 
 
 
 
गेल्या चार वर्षांपासून शिवसेना भाजपावर कितीही आगपाखड करत असली तरी ती रालोआतच होती. मात्र, जदयु आणि अण्णाद्रमुकचा नव्याने रालोआत समावेश करण्यात भाजपाला यश मिळाले आहे. लोकसभेच्या महाराष्ट्रात 48, बिहारमध्ये 40 तर तामिळनाडूत 39 जागा आहेत. 2019 मध्ये भाजपासाठी लोकसभेची एकेक जागा महत्त्वाची असल्यामुळे, या तीन राज्यांतील युतीला महत्त्व आले आहे. त्यामुळे यावेळची लोकसभा निवडणूक ही या दोन आघाड्यांमध्ये होणार असल्याचे सध्याच्या राजकीय घटनाक्रमावरून दिसते आहे. यातील पहिली आघाडी ही भाजपाच्या नेतृत्वातील, तर दुसरी आघाडी कॉंग्रेस-मित्रपक्षांची राहणार आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत तसेच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही बिहारमध्ये भाजपा आणि जदयु वेगवेगळे लढले होते. भाजपाने त्या वेळी लोकसभेच्या 30 जागा लढवत 22 जागा जिंकल्या होत्या. भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला सहा, तर उपेंद्र कुशवाह यांच्या लोकतांत्रिक समता पक्षाला तीन जागा मिळाल्या होत्या. यावेळी उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष भाजपासून दूर गेला आहे. जदयुला लोकसभा निवडणुकीत 40 जागा लढवत फक्त 2 जागा जिंकता आल्या होत्या. यावेळी राज्यातील लोकसभा निवडणूक भाजपा, जदयु आणि लोकजनशक्ती पक्षासोबत लढवणार आहे. राज्यातील लोकसभेच्या 40 पैकी भाजपा आणि जदयु प्रत्येकी 17 जागा लढवणार असून, सहा जागा रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षासाठी सोडण्यात आल्या आहेत. भाजपाच्या नेतृत्वातील बिहारमधील आघाडीचा सामना राजदच्या नेतृत्वातील दुसरी आघाडी करणार आहे. राजदच्या नेतृत्वातील आघाडीत कॉंग्रेस, उपेंद्र कुशवाह तसेच जितंराम मांझी यांचा तसेच अन्य पक्ष राहणार आहेत.
 
 
 
महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेना यांची युती होणार नाही, हे दोन पक्ष वेगवेगळे लढल्यामुळे होणार्या हिंदुत्ववादी मतांच्या विभागणीचा लाभ आपल्याला होईल, असे मांडे मनातल्या मनात रचणार्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला या युतीने मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रात भाजपा लोकसभेच्या 25 तर शिवसेना 23 जागा लढवणार आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेना एकत्रित लढले होते, त्याचा फायदाही या दोघांना झाला होता. महाराष्ट्रातील 48 पैकी 42 जागा भाजपा-शिवसेनेने जिंकल्या होत्या. भाजपाने 26 जागा लढवत 22 जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेनेने 22 जागा लढवत 18 जागा जिंकल्या होत्या. राज्यात कॉंग्रेसला दोन, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला चार जागा मिळाल्या होत्या. तामिळनाडूत अण्णाद्रमुकसोबत भाजपाची झालेली युती भाजपाचे दक्षिण भारतातील मनोबल वाढवणारी ठरणार आहे. राज्यातील 39 तसेच पुडुचेरीतील एक अशा 40 जागांसाठी ही युती आहे. यात भाजपा पाच, तर पीएमके सात जागा लढवणार आहे. अण्णाद्रमुकच्या हिश्श्याला 28 जागा येतील असे दिसत असले, तरी या आघाडीत आपल्या काही मित्रपक्षांना घुसवण्याचा भाजपाचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात अण्णाद्रमुक 20 जागा लढवेल, असा अंदाज आहे.
 
 
2014 च्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूत चौरंगी लढत झाली होती. यात अण्णाद्रमुक आणि कॉंग्रेसने राज्यात स्वबळावर सर्वच्या सर्व म्हणजे 39 जागा लढवल्या होत्या. भाजपाने सात पक्षांच्या मदतीने राष्ट्रीय लोकशाही आघाडी तयार केली होती. यात पीएमके, पीएनके, डीएमडीके, एमडीएमके, केएमडीके आणि इधिया जननयागा कात्ची यांचा समावेश होता. द्रमुकने पाच पक्षांची लोकशाही पुरोगामी आघाडी तयार केली होती. राज्यातील 39 पैकी 37 जागा अण्णाद्रमुकने जिंकल्या होत्या. भाजपा आणि पीएमके यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली होती. कॉंग्रेस आणि द्रुमकचे राज्यात खातेही उघडले नव्हते. अण्णाद्रमुकला 44.30 टक्के, तर भाजपाच्या नेतृत्वातील रालोआला 18.50 टक्के मते मिळाली होती. द्रमुक आघाडीची मतांची टक्केवारी 28.80, तर कॉंग्रेसची मतांची टक्केवारी 4.30 होती. अण्णाद्रुमक आणि रालोआच्या मतांची एकत्रित टक्केवारी 62.80 आहे. दुसरीकडे द्रमुक आणि कॉंग्रेसच्या मतांची एकत्रित टक्केवारी 33.10 होते. या आकडेवारीवरून अण्णाद्रमुक आणि भाजपा यांच्यात झालेल्या युतीचे महत्त्व तसेच त्याचे राजकीय परिणाम दिसून येतात.
 
 
 
अण्णाद्रमुकसोबतच्या युतीचा फायदा राज्यात भाजपाचा विस्तार होण्यासाठी मिळू शकतो. भाजपाच्या जागांची संख्याही वाढू शकते. त्याहीपेक्षा महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा फायदा म्हणजे एखाद्वेळी भाजपा केंद्रात स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवू शकली नाही, तर सरकार बनवण्यासाठी अण्णाद्रमुकचा उपयोग होऊ शकतो. लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री पलानीसामी यांच्या नेतृत्वात लढवण्याचा निर्णयही भाजपा आणि अण्णाद्रमुक नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
तामिळनाडूत नेहमीच द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांचाच प्रभाव तसेच आलटून पालटून सत्ता राहिली आहे. स्वत:ला राष्ट्रीय पक्ष म्हणवणार्या कॉंग्रेस आणि भाजपाला या राज्यात नेहमीच दुय्यम भूमिका घ्यावी लागली आहे. यातील एका पक्षाने भाजपाशी युती केली, तर दुसर्या पक्षाला नाइलाजाने कॉंग्रेसशी आघाडी करावी लागत होती. आताही अण्णाद्रमुकची भाजपाशी युती झाल्यामुळे द्रमुकला कॉंग्रेसचा हात धरावा लागणार आहे. त्यामुळे द्रमुक आणि कॉंग्रेस आघाडीची घोषणा एकदोन दिवसात झाली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
 
 
तामिळनाडूतील यावेळच्या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य म्हणजे यावेळी द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन्ही पक्षांच्या लोकप्रिय नेतृत्वाच्या अनुपस्थितीत ही निवडणूक होत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जयललिता अण्णाद्रमुकचे, तर करुणानिधी द्रमुकचे नेतृत्व करत होते. जयललिता त्या वेळी मुख्यमंत्रीही होत्या. गेल्या 50 वर्षांतील ही पहिलीच लोकसभा निवडणूक असावी, ज्यात हे दोघेही नाही. या दोन्ही पक्षांचे नेतृत्व सध्या दुसर्या फळीकडे आहे. या दोन्ही पक्षांतील विद्यमान नेतृत्व जयललिता आणि करुणानिधी यांच्या तोडीचे नसल्यामुळे हे दोन्ही पक्ष किती काळ राज्यात आपला टिकाव धरू शकतात, की पुन्हा भाजपा आणि कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षांचा राज्यातील प्रभाव वाढेल, याकडे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सगळ्यांचे लक्ष राहणार आहे.
 
 
श्यामकांत जहागीरदार
9881717817
@@AUTHORINFO_V1@@