डेबुजी ते गाडगेबाबा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2019   
Total Views |


 

 
माणसाला तो कितीही सामान्य असला आणि कुठल्याही अवस्थेत, कसाही जगत असला, तरीही त्याच्या जगण्याची दखल पुढच्या पिढ्यांनी घ्यावी असे वाटते. ही आदिम भावना आहे. त्यासाठी मग तो काय काय करत असतो. अगदी अश्मयुगात त्याने दगडांवर चित्रे काढली, आपल्या शिकारकथा कोरून ठेवल्या, नंतरच्या लोकांनी काव्यातून, महाकाव्यातून त्यांचे जगणे मांडून ठेवले. राजेराजवाड्यांनी बखरी लिहून घेतल्या... विचारवंतांनी ग्रंथ लिहिलेत, आत्मचरित्रे-चरित्रे लिहिलीत. संतांनी पोथ्या लिहिल्या. त्यांच्या आरत्या, देवळे, टोप्या, साधक, शिष्य, संप्रदाय अन्आजकाल तर संत, आध्यात्मिक गुरू काय काय प्रॉडक्ट निर्माण करून विकायलाही लागलेत... तर एकुणात माणसाला त्याच्या जगण्याचा ठसा त्याच्या जगण्याच्या कालखंडावर उमटवून ठेवावासा वाटत आला आहे. मी कसा जगलो ते नंतरच्या पिढ्यांना कळावे यासाठी त्याने काय काय यत्न केले. या आदिम प्रेरणेवर फारसा कुणाला विजय मिळविता आलेला नाही. गाडगेबाबांनी मात्र त्यावरही विजय मिळविला. माणसे जगण्यासाठी अत्यावश्यकच कामे करतात आणि त्याला कर्तृत्व म्हणतात. म्हणजे उदरनिर्वाह चालविण्यासाठी अर्थार्जन करतात आणि त्याला कर्तृत्व म्हणतात. बाजजाद्यांनी दिलेली इस्टेट सांभाळतात आणि त्यालाही कर्तृत्व म्हणतात...
 

गाडगेबाबांनी खर्या अर्थाने कर्तृत्व गाजविले आणि त्यांचा अभिनिवेशही बाळगला नाही. म्हणूनच मग मी हे हे करून ठेवले हे पुढच्या पिढीला कळावे, काळाच्या कुपीत आपल्या मुद्रेचा ठसा उमटलेला असावा, यासाठी अगदी संत म्हणविणारेही आटापिटा करताना दिसतात. आपला पंथ निर्माण करतात. पोथ्या करतात. आरत्या लिहिून घेतात अन्संप्रदाय, पूजाविधीही ठरवून मोकळे झालेले असतात... गाडगेबाबांनी यातले काहीच केले नाही, इथवरही ते सामान्यच म्हटले तरीही त्यांनी अत्यंत द्रष्टेपणाने ते होऊ दिले नाही. आपला फोटोही राहू नये अन्तसबिरी लावून अंगारे- धुपारे चालावेत, असे त्यांना अजीबातच वाटत नव्हते. त्यामुळे कुणी फोटो काढताना दिसला तर पुढच्या भेटीत ते त्याला अत्यंत प्रेमाने विचारत, ‘‘बाबू, माहा फटू काढलाना तुहा?’’ त्यावर तो अत्यंत उत्साहाने तो फोटो दाखवी अन्मग गाडगेबाबा त्या फोटोचे तुकडे करत. फिल्म असते फोटोची हेही माहीत होते त्यांना. तीही मागून जाळून टाकायचे... ‘‘कहाले पाह्यजेन फटू माहा?’’ असे ते विचारत अन्मग साहजिकच समोरून उत्तर येई, ‘‘तुमी नसतानी आठवन पाह्यजेना...’’ ‘‘म्हनजे तुमी तसबिर्या करान, पुतळे करान माहे अन्मग मंग हारफुलं वाहन्याची दुकानदारी सुरू करान... नको ना मले थे!’’ असे गाडगेबाबा म्हणत.

 

येत्या आठवड्यात संत गाडगेबाबा आणि गजानन महाराज या विदर्भलौकिक पुरुषांच्या तिथ्या येत आहेत. दोघांनाही नावाचा गलबला नव्हता. गजानन महाराजांना त्यांचे नावही माहिती नव्हते अन्हे नाव त्यांच्या वायबोलावरून त्यांना लोकांनी दिले. गाडगेबाबांनाही गाडगेबाबा हे नाव लोकांनी दिले. नंतर मग त्यांना नावरूप आल्यावर त्यांचे डेबुजी झिंगराजी जानोरकर हे नाव शोधून काढण्यात आले. त्यांनी तर नावा-गावासकट सगळेच त्यागून समाजासाठी संन्यास घेतला होता. त्यांचा देव हा माणूस होता. या माणसांच्या देवाचीच त्यांनी पूजा केली. भुकेला असेल त्यांचा हा देव, तर त्याला त्यांनी मिष्टान्नाचे भोजन दिले. दहा-दहा हजारांच्या गर्दीला त्यांनी पुरणपोळीचे जेवण दिले आणि स्वत: मात्र कुठल्यातरी अंधार्या झोपडीत जाऊन त्यांनी भाकर मागून खाल्ली आहे. त्यांचा हा माणसाचा देव भिकारी असेल, तर त्याला त्यांनी अंघोळ घालून स्वच्छ केले. या माणसांच्या देवाच्या वसाहती त्यांनी स्वच्छ केल्या, त्यांचे जिणे सुकर व्हावे, विज्ञाननिष्ठ होण्यासाठी त्याने बुद्धिनिष्ठ व्हावे यासाठी घसा फाडून कीर्तन केले. माणसाच्या या देवासाठी त्यांनी धर्मशाळा बांधल्या. मंदिरे नाही बांधली अन्तिथे देवांच्या दगडी मूर्तीही नाही ठेवल्या. कर्मकांडाला प्रोत्साहन मिळेल, असे काहीही केले नाही. गोपाला गोपाला हे भजन म्हणायला लावले अन्देव कसा नाही, हे समजावून सांगितले. त्यामुळे स्वत:ची नाममुद्रा उमटावी, असा कुठलाही अट्टहास त्यांचा कधीही नव्हता...

 

डेबुजी झिंगराजी जानोरकर हा, तरुण सावकाराच्या पाशात अडकलेल्या मामाची दैना पाहून अन्अंधश्रद्धेच्या कचाट्यात सापडलेल्या समाज आणि आप्तांची अवस्था पाहून हेलावला आणि एका रात्री घर सोडून निघून गेला... त्यानंतर तो गाडगेबाबा अवस्थेतच ऋणमोचनच्या यात्रेत दिसला. या बारा वर्षांत नेमके त्याने काय केले, हे कुणालाच सांगितले नाही अन्समजूही दिले नाही. कुणी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. कारण आपल्या माणसाकडे आस्थेने न पाहण्याचा करंटेपणा आपण नेहमीच करत आलो आहोत. आपल्या माणसातला मोठेपणा मान्य करून त्याला त्या पद्धतीची वागणूक देण्याचे मोठेपण आमच्या ठायी कधीच नाही. आम्ही मग पुण्या- मुंबईच्या लोकांना ते कमी कुवतीचे असूनही कसे मोठे होतात, यासाठी कोसत असतो. गाडगेमहाराजांचे काम खूप मोठे आहे आणि त्यांची वैचारिक बैठक आभाळाच्या उंचीशी अन्समुद्राच्या खोलीशी स्पर्धा करणारी आहे, हे आम्ही दिसत असूनही मान्य केले नाही. डेबुजी भैताडला, अशीच संभावना आम्ही केली. दगडांचे टाळ करून कीर्तन-भजन करतो बेटा, म्हणत त्याला बाहेरची बाधा झाली म्हणत त्याच्या आईला त्यावर इलाज करण्याचा सल्ला दिला... बाबांच्या कामाचा अवाका वाढत गेला. अगदी नाशिक, पंढरपूर, मुंबईपर्यंत ते पोहोचले. पंढरपुरात एकदा त्यांना आचार्य अत्रे भेटले अन्‌ ‘‘इतके घाट स्वच्छ करता. इतकी कामे करता, मग कधी पांडुरंगाच्या दर्शनाला नाही गेले का?’’ असे अत्र्यांनी विचारले. बाबा काम करत राहिले अन्झाडू मारताना म्हणाले, ‘‘असन तो (पांडुरंग) तर येईन ना भेट्याले बाहरं...’’ या उत्तराने हा माणूस बाह्य वेशाने बावळा वाटत असला तरीही अंतरी नाना कळा असलेला आहे, हे आचार्य अत्रेंसारख्यांना सांगण्याची गरज नव्हती.

प्रबोधनकार ठाकरे यांनी बाबांच्या कार्याची दखल घेतली. त्यावर लेखन केले आणि मग तिकडचा शिक्का लागल्यावर आम्हीही त्यांनाआमचाम्हणू लागलो. बाबा मात्र सांगत, ‘‘मी कोनाचा गुरू नाही न कोनी माहा चेला नाही...’’ त्यांची आई अन्बायकोही त्यांच्या मागे जात तर ते सांगत, ‘‘मी तुमचा कोनी नाही अन्तुमी माहे कोनीच नाही...’’ ते कुणाच्या मागे गेले नाहीत अन्कुणाला त्यांनी माझ्या मागे या, असेही म्हटले नाही. ते घरून निघाल्यावर जे चालत राहिले तसेच चालत राहिले अन्वाटेतच गेलेही... ‘सारे काही देता यावे, श्रेय राहू नये हाती, यावी लावता कपाळी भक्ती भावनेने माती...’ या म. . देशपांडेंच्या कवितेच्या ओळी त्यांनी साकार केल्या खर्या अर्थाने. महात्मा गांधी सेवाग्राम आश्रमात असताना बाबांनी सारा गाव झाडून लख्ख केला. बापूजी म्हणाले, ‘‘चला माझ्या सोबत.’’ तर बाबा म्हणाले, ‘‘तुहं काम तू कर, माहं काम मले करू दे...’’ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींवर त्यांचे विशेष प्रेम होते, आदर होता, मात्र त्यांच्याकडून बाबांना काहीच हवे आहे, असे नव्हते. ज्यांच्यासाठी आपण राबतो त्या वंचितांसाठी हे महामानवही काम करत आहेत, हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. पुरस्कार, सत्कार त्यांना नकोच होते... मीपण, माझेचा त्याग जो करू शकतो, त्या आदिम प्रेरणांवर जो विजय मिळवू शकतो, तोच बाबांचा अनुयायी होऊ शकतो. आपली ती लायकी नाही, हे मात्र त्यांच्या, 23 फेब्रुवारीला येणार्या पुण्यतिथीला आपण मान्य करायला हवे!
@@AUTHORINFO_V1@@