पाकिस्तानची सौदी-कोंडी करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2019   
Total Views |


युवराज मोहम्मद यांच्या भारत भेटीचा पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर, भारताने मोहम्मद सलमान यांना पाकिस्तानातून थेट भारतात प्रवेश करण्यावरही नापसंती दर्शविली व म्हणूनच युवराज पाकिस्तानातून रियाधला जाऊन मग मंगळवारी उशिरा भारतात दाखल झाले.

 

पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४०हून अधिक जवान मारले गेल्यामुळे संपूर्ण भारतभर शोक आणि संतापाची लाट उसळली. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्याला वेळ, जागा आणि पद्धत ठरवण्याची मुभा दिल्याचे जाहीर केले आहे. सैन्य किंवा संबंधित यंत्रणा पाकिस्तानला धडा शिकवण्यास समर्थ आहेतच. त्यामुळे आपण हा बदला कधी घेतला जातो त्याचे दिवस न मोजता पुलवामाच्या हल्ल्याकडे प्रादेशिक परिप्रेक्ष्यातून पाहायला हवे. हा हल्ला व्हायच्या एक दिवस आधी, १३ फेब्रुवारीला इराणच्या सिस्तान प्रांतात, चाबहार बंदराजवळ इराणच्या रिवॉल्युशनरी गार्ड्स या कमांडो युनिटच्या सैनिकांना घेऊन जाणार्‍या बसवर तालिबानशी संलग्न जैश-ए-आदिल या दहशतवादी संघटनेने केलेल्या आत्मघाती हल्ल्यात इराणचे २७ सैनिक मारले गेले आणि १३ जखमी झाले. या हल्ल्यातही पुलवामाच्या हल्ल्याप्रमाणे स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा वापर करण्यात आला होता. जैश-ए-आदिलप्रमाणे जैश-ए-मोहम्मदचेही तालिबानशी जवळचे संबंध आहेत. १९९९ साली ‘कंदहार विमान अपहरण’ प्रकरणात अतिरेक्यांना मौलाना मसूद अझरची सुटका करण्यात यश मिळाले होते. सुरुवातीला इराणने या हल्ल्यासाठी अमेरिका आणि तिच्या मित्रराष्ट्रांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पण, लवकरच त्यांनी संशयाची सुई पाकिस्तानकडे वळवली.

 

१६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान ऊर्फ ‘एमबीएस’ पाकिस्तान दौर्‍यावर होते. सौदीचे राजे सलमान यांचे वय झाल्यामुळे सर्व सत्ता ‘एमबीएस’च्याच हातात एकवटली आहे. या भेटीची पाकिस्तान अनेक महिने वाट पाहत होता. सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी १२ अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचे गाजर दाखवले. यातील आठ अब्ज डॉलर्स ग्वादर येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पात गुंतवले जाणार असून बाकीचे चार अब्ज डॉलर्स अन्य क्षेत्रात गुंतवले जाणार आहेत. पाकिस्तानची अर्थव्यवस्था खपाटीला गेली असून, जागतिक नाणेनिधीही पाकिस्तानला कर्ज देताना आढेवेढे घेत आहे. आपण दिलेले कर्ज पाकिस्तान चीनचे कर्ज फेडण्यासाठी वापरेल अशी त्यांना भीती आहे. त्यामुळे पाकिस्तानला चीन वगळता सौदी अरेबियाचाच आधार आहे.

 

पाकिस्तानने युवराज मोहम्मद यांच्या स्वागतासाठी कोणतीही कमी ठेवलेली नाही. ते पाकिस्तानात असेपर्यंत इस्लामाबादमध्ये सुट्टी घोषित केली होती. एक दिवस इस्लामाबादवरून हवाई वाहतुकीला प्रतिबंध करण्यात आला होता. युवराजांची थेट इमरान खानच्या घरातच राहायची व्यवस्था केली होती. मोहम्मद यांच्यासाठी त्यांची जिम आणि सात आलिशान बीएमडब्ल्यू गाड्या खास विमानांनी पाकिस्तानमध्ये आणण्यात आल्या होत्या. इमरान खान यांनी युवराजांसाठी सारथ्याची भूमिका बजावली. त्यांना ‘निशान-ए-पाकिस्तान’ हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. लाळघोटेपणाची हद्द म्हणजे, सौदीचा पाकिस्तानी सुरक्षेवर विश्वास नसल्यामुळे इमरान यांच्या घराभोवती सुरक्षेचे पहिले रिंगण सौदी सैनिकांचे होते.

 

इमरान यांनी भारताकडून काश्मीर खोर्‍यात होत असलेल्या अत्याचारांबद्दल सादरीकरण करण्यात आले. दोन्ही देशांनी पारित केलेल्या अनेक ठरावांमधील एका ठरावात जगभरात मुसलमानांविरोधात होत असलेल्या मानवाधिकाराच्या हननाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. सौदीच्या तुरुंगात हजारो पाकिस्तानी कैदी आहेत. यातील २,१०० कैद्यांची मुक्तता करण्याचे आदेश सलमान यांनी दिले. याशिवाय पाकिस्तानमध्ये २० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचे स्वप्न दाखवून युवराज भारताच्या भेटीसाठी रवाना झाले. या भेटीमुळे दोन महिन्यांपुरते परकीय चलन उरलेल्या पाकिस्तानची अवस्था ‘आंधळा मागतो एक डोळे, देव देतो दोन’ अशी झाली. ‘एमबीएस’ तरुण असले तरी, मूर्ख नाहीत. चीनचा ‘सीपेक’ प्रकल्प यशस्वी ठरल्याशिवाय पाकिस्तानमध्ये गुंतवणुकीवर परतावा मिळणार नाही, हे त्यांना समजते. पाकिस्तानला केलेले गुंतवणुकीचे सर्व वायदे दोन्ही देशांसाठी बंधनकारक नाहीत, अशी तरतूद सामंजस्य करारांमध्ये आहे.

 

सौदी भारतातील तेलशुद्धीकरण प्रकल्पातही संयुक्त अरब अमिरातीच्या सोबत २१ अब्ज डॉलर्स गुंतवणार आहे. भारताच्या नेतृत्त्वाखाली उभ्या राहिलेल्या जागतिक सौर ऊर्जा भागीदारीतही सौदी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार आहे. २०१५ सालापासून सौदी अरेबिया आणि आखाती अरब राष्ट्रे येमेनमधील हुती बंडखोरांविरुद्ध लढत असून, या युद्धात सुमारे ६० हजार लोक मारले गेले आहेत. लाखो लोक निर्वासित झाले असून युद्धामुळे हजारो मुले कुपोषण आणि विविध आजारांनी ग्रस्त आहेत. हुतींना इराणचा पाठिंबा आहे. ऐषआरामात जगण्याची सवय असलेल्या सौदी आणि आखाती राष्ट्रांना जमिनीवरील युद्ध लढण्याची सवय नसल्यामुळे त्यांनी वेळोवेळी पाकिस्तान आणि अन्य गरीब मुस्लीम देशांतून भाड्याचे सैनिक आणले. यावेळीही सौदीला पाकिस्तानचे सैनिक हवे होते. नवाझ शरीफ पंतप्रधान असताना त्यांनी याबाबत विधेयक आणले असता, संसदेने ते फेटाळून लावले. इराण हा पाकिस्तानचा शेजारील देश असून दहशतवादी कारवाया आणि गनिमी युद्धात तरबेज आहे. पाकिस्तानमध्ये शिया अल्पसंख्याक असले तरी, सिंध आणि दक्षिण पंजाबमध्ये त्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे येमेनमध्ये सैन्य पाठवायची पाकिस्तानची तयारी नाही. ते पाठवल्याशिवाय सौदी पाकिस्तानला काही मदत करेल, अशी आशा बाळगणे व्यर्थ आहे.


 
 

पुलवामा हल्ल्याची वेळ महत्त्वाची आहे. ‘हेराफेरी’ चित्रपटात दुसर्‍या दिवशी २० लाख रुपये मिळणार म्हणून आदल्या रात्रीच दारु-पार्टी करणार्‍या परेश रावल आणि मंडळींप्रमाणेच पाकिस्तानची अवस्था झाली असावी. सौदीकडून मोठी गुंतवणूक येण्याच्या खात्रीने पाकिस्तानने जैशकरवी इराणमधील सिस्तान आणि भारतातील हल्ल्यांना हिरवा झेंडा दाखवला असावा. आयएसआयचे नवीन प्रमुख आसीम मुनीर यांना अशा कारवाया करण्याचा दीर्घ अनुभव असून त्यांनाही आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळाली असावीकाश्मीर खोर्‍यात भारतीय लष्कराने झाडझडती हाती घेऊन पुलवामा हल्ल्याच्या सूत्रधारांना यमसदनी धाडले. अमेरिकेवर दबाव टाकून १८ फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये होणारी अमेरिका आणि तालिबानमधील चर्चेची फेरी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यातही यश मिळवले. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील २००हून अधिक सरकारी संकेतस्थळे हॅक झाली, तर बलुचिस्तानमध्ये सैन्याच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात नऊ सैनिक मारले गेल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर दाबली गेली. एकूणच, युवराज मोहम्मद यांच्या भारत भेटीचा पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर, भारताने मोहम्मद सलमान यांना पाकिस्तानातून थेट भारतात प्रवेश करण्यावरही नापसंती दर्शविली व म्हणूनच युवराज पाकिस्तानातून रियाधला जाऊन मग मंगळवारी उशिरा भारतात दाखल झाले.

 

पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या घडवून आणल्याच्या आरोपांमुळे युवराज मोहम्मद अडचणीत आले आहेत. पाश्चिमात्य देशांत याबाबत जनमत तीव्र असल्यामुळेच ते पाकिस्तान, भारत आणि चीनच्या दौर्‍यावर आहेत. अमेरिका तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली असल्यामुळे सौदीसाठी चीन आणि भारताला तेल विकणे आवश्यक आहे. इराणची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी करण्यासाठीही भारत आणि चीनची भूमिका महत्त्वाची आहे. अमेरिका विरोधामुळे चीन इराणविरुद्ध निर्बंध लादण्याच्या विरोधात असतो. भारताने अमेरिकेच्या निर्बंधांतून सवलत मिळूनही इराणकडून तेलाची आयात कमी केली आहे. सौदीने पाकिस्तानला कुरवाळले, तर भारत इराणमधून होणारी तेलाची आयात तसेच चाबहार प्रकल्पातील आपली गुंतवणूक वाढवू शकतो, असा संदेश सौदीला जायला हवा. भारताला येमेनमधील संघर्षात देणे-घेणे नसले तरी, आखाती अरब राष्ट्रांच्या सुरक्षेत भारत जवळच्या अंतरामुळे मोलाचे योगदान देऊ शकतो. पूर्वी आपल्याला, अरब-इस्रायल संघर्षात इस्रायलची बाजू घेतल्यास आखातात काम करणारे लाखो भारतीय बेरोजगार होण्याची भीती वाटायची. पण आज प्रमुख आर्थिक सत्तांपैकी एक असलेला भारत, प्रवासी भारतीयांद्वारे, उदारमतवादी इस्लाम स्वीकारण्याचा प्रयत्न करणार्‍या आखाती राष्ट्रांना स्थैर्य देऊ शकतो.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@