‘याबा’चा बांगलादेशी बंदोबस्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2019   
Total Views |



बांगलादेश सरकारनेही फिलिपिन्सच्या धर्तीवर देशातील सर्व ड्रग्जमाफियांना सरकारला शरण जा, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जाण्याचा गंभीर इशारा दिला. बांगलादेशच्या किनाऱ्यावरील टेकनफ शहरात तब्बल १०२ ‘मेथ’नामक ड्रग्जची विक्री करणाऱ्यांनी, तर २४ ‘याबा’ नावाच्या ड्रग्जविक्रीतील माफियांनी बांगलादेशी सरकारपुढे शरणागती पत्करली.


‘ड्रग्ज’ आणि ‘नशाखोरी’च्या समस्येने आज जवळपास जगातील बहुतांश देश त्रस्त आहेत. मग यामध्ये अमेरिकेसारखे प्रगत देश असो, भारतासारखे विकसनशील देश किंवा आफ्रिकेतील अविकसित देश. पण, ड्रग्जच्या समस्येने प्रामुख्याने दक्षिण-पूर्व आशिया, द. अमेरिका आणि आफ्रिकेतील देशांना सर्वाधिक पोखरून काढले. या समस्येकडे सरकारने केलेले दुर्लक्ष, बेरोजगार तरुणांची फौज आणि वाढती गुन्हेगारी ही यामागची काही सामायिक कारणे सांगता येतील. सुरुवातीला हे विविध प्रकारचे ड्रग्ज अगदी स्वस्तात तरुणाईला उपलब्ध करून दिले गेले आणि एकदा का त्यांना त्या ड्रग्जचे व्यसन लागले की, मग त्यांच्या किंमतीत घवघवीत वाढ केली जाते. परिणामी, नैराश्यग्रस्त असंख्य तरुण या ड्रग्जच्या भयानक नशेसाठी कोणत्याही थराला जाऊन पैशांची जमवाजमव करतात आणि या नशाखोरीला बळी पडतात. द. अमेरिकेतील व्हेनेझुएला, ब्राझील हे देश ड्रग्जविरोधी मोहिमा राबवून आपल्या देशातील तरुणाईला या नशेच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी गेल्या काही काळापासून आवर्जून प्रयत्न करताना दिसत आहेत. तीच गत द. पूर्व आशियातील फिलिपिन्स आणि थायलंडचीही. सरकारने केलेले कडक कायदे आणि ड्रग्जमाफियांवर केलेल्या धडक कारवाईने सध्या या देशांमध्येही नशाबाजांचे कंबरडे मोडल्याचे चित्र आहे. पण, जवळच्याच म्यानमार आणि बांगलादेशमध्येही ड्रग्जचे जाळे चांगलेच मुरलेले दिसते. त्यातही रोहिंग्या मुसलमानांसाठी ड्रग्जविक्री हा रोजीरोटीचा धंदाच होऊन बसला. याची गांभीर्याने दखल घेत बांगलादेशातील शेख हसिना सरकारने ड्रग्जमाफियांच्या नाड्याच आवळायला सुरुवात केली. कारण, बांगलादेशच्या जवळपास १६५ दशलक्ष लोकसंख्येपैकी जवळपास पाच दशलक्ष लोकसंख्या ही नशेच्या अधीन असल्याचे निष्पन्न झाले.

 

बांगलादेश सरकारनेही फिलिपिन्सच्या धर्तीवर देशातील सर्व ड्रग्जमाफियांना सरकारला शरण जा, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जाण्याचा गंभीर इशारा दिला. सध्या त्याचेच सकारात्मक परिणाम बांगलादेशमध्ये दिसून येण्यास सुरुवात झाली आहे, असे म्हणता येईल. बांगलादेशच्या किनाऱ्यावरील टेकनफ शहरात तब्बल १०२ ‘मेथ’नामक ड्रग्जची विक्री करणाऱ्यांनी, तर २४ ‘याबा’ नावाच्या ड्रग्जविक्रीतील माफियांनी बांगलादेशी सरकारपुढे शरणागती पत्करली. ‘याबा’ नावाचे हे ड्रग्ज छोट्या लाल गोळ्यांच्या स्वरूपात म्यानमारमधून बांगलादेशात तस्करी करून रोहिंग्यांच्या माध्यमातून पोहोचवले जायचे. त्यामुळे बांगलादेशमध्ये या नशाखोर गोळ्यांची मागणीही प्रचंड वाढली होती. खरं तर ‘याबा’च्या मूळ गोळ्या या थायलंडच्या. त्याचा थाय भाषेतला अर्थही ‘वेड लावणाऱ्या गोळ्या’ असाच होतो. थायलंड सरकारने १९७० सालीच कायदा करून ‘याबा’वर बंदी लादली खरी, पण तरीही ‘याबा’च्या नशेची जादू काही कमी झाली नाही. थायलंडमधून ‘याबा’चे हे प्रस्थ म्यानमार, लाओस, कंबोडिया, फिलिपिन्स, बांगलादेश तसेच जवळच्या द. पूर्व आशियाई देशांतही त्सुनामीच्या वेगाने पसरले. पण, आज तितक्याच वेगाने बांगलादेश सरकारने ‘याबामाफियां’ची नसबंदी सुरू केलेली दिसते. गेल्या मे महिन्यापासून बांगलादेशच्या पोलिसांनी ड्रग्जविरोधी कायद्यांतर्गत तब्बल २५ हजार जणांना अटक केली आहे, तर यामध्ये ३०० बांगलादेशींचा बळीही गेला आहे. पण, ही लढाई अद्यापही सुरू आहे. कारण, म्यानमारमार्गे बांगलादेशात आलेल्या रोहिंग्यांच्या माध्यमातून ‘याबा’ची ही विषवल्ली पेरली गेली. गेल्या शुक्रवारीच बांगलादेशी पोलिसांनी म्यानमार सीमेवर तब्बल ५ लाख, ७० हजार ‘याबा’च्या गोळ्या जप्त केल्या आहेत. त्यामुळे बांगलादेशातील ड्रग्जमाफियांचे धाबेही चांगलेच दणाणले आहेत. तसेच ऑक्टोबर महिन्यापासून ‘याबा’सारख्या हानिकारक ड्रग्जचा व्यापार करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याचा कडक कायदाही बांगलादेश सरकारने पारित केला आहे. त्यामुळे आगामी काळात बांगलादेशातील एकूणच ड्रग्जमाफियांचा सुळसुळाट कमी होईल, यात शंका नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, याचा फायदा भारतालाही होईल. कारण, भारत-बांगलादेश सीमेवरून तस्करी केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या यादीमध्ये ‘याबा’ नसले तरी गांजा, कफ सिरपच्या बाटल्या यांचे प्रमाणही दखलपात्र आहेत. त्यामुळे बांगलादेश सरकारने ड्रग्जमाफियांविरोधात उघडलेल्या या धडक मोहिमेचे सकारात्मक परिणाम आगामी काळात बांगलादेशातही दिसून येतील, अशी अपेक्षा.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@