ब्रिटिशांनी, परकीयांनी पाडलेली फूट सांधायचीय! डॉ. शरद हेबाळकर यांचे प्रतिपादन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
 

इतिहास भारती जनजाती, संशोधन, संवर्धन व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन 

 
 

दिघाशी (भिवंडी) : ब्रिटीशांना सर्वप्रथम विरोध करणारी वीरवान मंडळी वनवासी समाजातली होती. देशाच्या प्रांताप्रांतात जिथे जिथे वनवासी समाज आहे, तिथून ब्रिटीशांना प्रतिकार केला गेला. मात्र, नंतर याच ब्रिटीशांनी भारतीयांना विभिन्न भेदांमध्ये विभागले. आदिवासी, वनवासी, नगरवासी नि अन्यही कितीतरी शब्द प्रचलित केले. ही अलगतेची भावना इथल्या समाजात नव्हती, पण ती ब्रिटीशांनी निर्माण केली. ब्रिटीशांनी, परकीयांनी इथल्या समाजात पाडलेली हीच फूट आपल्याला सांधायची आहे, असे प्रतिपादन डॉ. शरद हेबाळकर यांनी केले. भिवंडी तालुक्यातील अंबाडी गावापासून जवळ असलेल्या दिघाशी येथे इतिहास भारती-जनजाती, संशोधन, संवर्धन व प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दि. १७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. इतिहास संकलन समितीचे अखिल भारतीय उपाध्यक्ष डॉ. शरद हेबाळकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. सदर उद्घाटनाच्या कार्यक्रमवेळी व्यासपीठावर रा. स्व. संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचारप्रमुख प्रमोद बापट, प्रकल्पाचे अध्यक्ष नाना चंपानेरकर, मयुरभाई श्रीधरानी, उद्योजक शामराव आमरे, नवसुदादा वळवी आदी उपस्थित होते.

 

समारोपाच्या भाषणात डॉ. शरद हेबाळकर म्हणाले की, ब्रिटीशांनी भारतीयांत पाडलेली अलगतेची, वेगळेपणाची फूट सांधण्याचे काम या जनजाती, संशोधन, संवर्धन व प्रशिक्षण केंद्रातून व्हावं. जनजाती, वनवासी समाजाकडे हजारो वर्षांपासूनची स्वत:ची भाषा, ज्ञान आणि विद्या आहे, साहित्य आहे. हे सगळंच प्राचीन काळापासून प्रथा-परंपराच्या माध्यमातून चालत आलेलं ज्ञान एकत्र करण्याचं काम इथल्या केंद्रातून व्हायला हवं, हाच या केंद्राचा उद्देश आणि उद्दिष्ट आहे. आपल्या समाजात कित्येक वर्षांपूर्वी वनवासी भागात अनेकानेक विद्याकेंद्रं अस्तित्वात होती. काळाच्या ओघात, परकीयांच्या आक्रमणात, ब्रिटीशांच्या मतलबी राजवटीत या विद्याकेंद्रांचं अतोनात नुकसान झालं. ज्ञान, विद्या, माहिती विखुरली गेली. हेच विखुरलेल्या माहितीचं एकत्रीकरण या केंद्रातून झालं पाहिजे, असं ते म्हणाले. जनजातींकडील ज्ञानाच्या संशोधनासाठी एम. ए. वा पीएचडीची गरज नाही. किंवा ग्रंथालयात दिवसरात्र बसून पुस्तकं वाचण्याचीही आवश्यकता नाही. कारण इथे प्रत्यक्ष वनवासी समाजात राहून, अनुभव घेऊन, संवाद साधून त्यांच्याकडील ज्ञान आत्मसात करण्यासाठी हे केंद्र आहे. इथले ज्ञानसंपन्न वनवासी बांधवच अभ्यासकांचे गुरु होतील, असे सांगत डॉ. हेबाळकर यांनी, दिघाशी येथील इतिहास भारतीचे हे केंद्र अखिल भारतीय स्तरावर रोल मॉडेल ठरावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

 

नुकताच राज्य शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर झालेले आणि वनवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असलेले आप्पा जोशी यावेळी म्हणाले की, इथल्या वैदू समाजाने पूर्वापारपासून चालत आलेल्या वनस्पतींचे, वनौषधींचे ज्ञान मिळवले व जोपासले. वैदू समाजाने अभ्यास केलेल्या व गुणकारी असलेल्या काही वनस्पतींची इथल्या प्रकल्पात लागवड करण्यात आली आहे, असे म्हणत आप्पा जोशींनी अनेक आठवणी, किस्से व माहितीही सांगितली. सोबतच वनवासींकडे असलेल्या कितीतरी औषधी वनस्पतींच्या गुणाचे, उपयुक्ततेचे स्वत:ला आलेले अनुभव व केलेले प्रयोगही सांगितले. दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलवामा हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मल्हार कृष्ण गोखले यांनी माजी लष्करप्रमुख के. सुंदर यांची १९८६ सालातली आठवण सांगत सकारात्मकतेची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

 

वनवासी समाजाचे प्रतिनिधी नवसुदादा वळवी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, वनवासी समाजाकडे ज्ञानाचं भांडार आहे. पाऊस कधी व किती पडेल, पूर येईल की दुष्काळ, कोणत्या आजारावर कोणती वनस्पती गुणकारी ठरेल... अशा कितीतरी गोष्टींचा, माहितीचा खजिना वनवासी बांधवांकडे आहे. पण हे त्याला कोणी शिकवले? कोणी सांगितले? कोठे अभ्यास केला त्याने? तर निसर्गातच ना. स्वत:च्या अनुभवाने, सवयीने, परंपरेने तो शिकत आला. आता मात्र, वनवासी समाजातील याच ज्ञानाचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास झाला पाहिजे. इथल्या केंद्रातून तसे होईल, अशी मी खात्री बाळगतो, असे ते म्हणाले. दरम्यान, सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव मल्हार कृष्ण गोखले यांनी केले. ते म्हणाले की, इतिहासविषयक अध्ययन केंद्राच्या स्थापनेची इच्छा इंद्रभान बसीन यांनी मोरोपंत पिंगळे यांच्याकडे व्यक्त केली होती. २५ वर्षांपूर्वी आपली जमीन त्यांनी अशा उपक्रमासाठी दिली व ते स्वप्न आज पूर्ण झाले. ईश्वर नागराणी यांनी यासाठी आर्थिक मदत केली व आज त्यातून हे केंद्र उभे राहिले आहे, असे ते म्हणाले. सोबतच आम्ही इतिहास संशोधन नव्हे तर जे आधीच संशोधन झाले आहे, शोध लागले आहेत, त्याचे केवळ संकलन करतो, असे सांगत समितीच्या नावामागची भूमिकाही स्पष्ट केली.

 

कार्यक्रमाच्या शेवटी नाना चंपानेरकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. सोबतच इतिहास भारती-जनजाती, संशोधन, संवर्धन व प्रशिक्षण केंद्रात भावी काळात उभारल्या जाणाऱ्या व नर्सरी, वनौषधी, गोशाळा, स्थायी मंडप, कंपाऊंड आदी प्रकल्प व उपक्रमांसाठी आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन केले. सोबतच या कार्यक्रमात वैदू समाजातील अनेकांचा सत्कार करण्यात आला. सोबतच वनवासी बांधवांनी तारपा, कन्सेरी आदि वाद्येही वाजवत आपली कलाही सादर केली. तर परिसरातीलच योगिनी झिंजाळे या संगीत शिक्षिकेने सुरुवातीला ये मेरे वतन के लोगोआणि नंतर स्वागतगीत व ईशस्तवन आणि अखेरीस पसायदान गायन केले.

 

रोजगार व स्वावलंबनाचेही उपक्रम

 

दिघाशी येथील इतिहास भारती-जनजाती, संशोधन, संवर्धन व प्रशिणण केंद्रात केवळ अध्ययन वा अभ्यासाचेच काम होणार नसून परिसरातील वनवासी, जनजाती समाजातील तरुण-तरुणींच्या रोजगाराचेही काम केले जाणार हे, अशी माहिती आजच्या कार्यक्रमातून देण्यात आली. वनवासी बांधवांना स्वावलंबी व्हावे, स्वत:च्या पायावर उभे राहावे, यासाठी इथे लघुउद्योग सुरु करण्याचा मान असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

 

विस्कळीत झालेले दुवे घट्ट होतील

 

"देशात सध्या निरनिराळ्या शक्तींकडून समाज विघटनाचे, राष्ट्राच्या तेजोभंगाचे शेकडो प्रयत्न होत आहेत. वनवासी-जनजाती समाजाला भारतीयांपासून वेगळे पाडण्याचेही काम सुरु आहे. मात्र, देशातल्या वनवासी समाजात आपला संस्कृतीगुरु होण्याचे सामर्थ्य आहे. याच कारणामुळे त्याला आमच्यापासून दूर केले जात आहे. मात्र, हेच समाजातले, संस्कृतीतले विस्कळीत झालेले दुवे घट्ट करण्याचे काम इथल्या संशोधन, संवर्धन व प्रशिक्षण केंद्रातून होणार आहे. अन हे काम सुरु असतानाच भविष्यात आताच्यापेक्षाही अधिक उन्नत असे केंद्र उभे राहिल्याशिवाय राहणार नाही."

- प्रमोद बापट, रा. स्व. संघ पश्चिम क्षेत्र प्रचारप्रमुख

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 

 
@@AUTHORINFO_V1@@