खर्चाचे ओझे कमी करणाऱ्या सामूहिक विवाहासारख्या उपक्रमांची गरज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2019
Total Views |



आसनगाव येथे पार पडला १,१०१ आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळा

 

ठाणे : "सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन ही खूप चांगली संकल्पना असून त्यामुळे कुटुंबांवर पडणारे मोठे खर्चाचे ओझे दूर करता येईल. आज विवाह होणाऱ्या आदिवासी जोडप्यांच्या परिवारात आम्हीही सहभागी होऊ शकलो, माझे खूप आशीर्वाद." अशा भावपूर्ण शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११०१ जोडप्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी भावली धरणातील पाण्याच्या प्रश्नासह शहापूर तालुक्याच्या सर्व समस्या प्राधान्याने दूर करण्यात येतील, असेही सांगितले. खासदार कपील पाटील फाऊंडेशन व हिंदू सेवा संघ (महाराष्ट्र) यांच्या सहयोगातून आसनगाव येथे ११०१ आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळा रविवारी पार पडला, त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

 

"भावली धरणातील पाणी शहापूर आणि परिसराला देण्यासंदर्भात सर्व कार्यवाही पूर्ण झाली आहे, याबाबतीत जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या निर्णयानंतर तातडीने अंमलबजावणी केली जाईल." असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. "तसेच पेसा कायद्यातील काही तरतुदींमुळे विवाद होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सामूहिक विवाह सोहळ्यासारखे उपक्रम अधिकाधिक व्हावयास हवे. आदिवासी समाजाने जल - जमीन- जंगल खऱ्या अर्थाने टिकविले, आपल्या संस्कृतीचे रक्षण केले," असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून आदिवासी जोडप्यांना शुभाशिर्वाद दिल्यामुळे नवविवाहित जोडप्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत झालेला दिसत होता. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार कपील पाटील, दिंडोरीचे खासदार हरिशचंद्र चव्हाण, खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, आमदार किसन कथोरे, आमदार गणपत गायकवाड, नरेंद्र पवार, निरंजन डावखरे, हिंदू सेवा संघाचे काका जगे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींची यावेळी उपस्थिती होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@