मुठाई माऊली माझी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2019   
Total Views |



सह्याद्री पर्वत मोठा की हिमालय? या प्रश्नाची दोन उत्तरं आहेत. उंचीने जगातला सर्वात मोठा पर्वत हिमालय. पण वयाने सह्याद्री पर्वत हिमालयापेक्षा मोठा आहे. वास्तविक हिमालय हा जगातला सर्वात तरुण पर्वत आहे. सुमारे सहा कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून सह्याद्रीची निर्मिती झाली असं मानलं जातं. तर हिमालयाची निर्मिती साधारणत: एक कोटी वर्षांपूर्वीची मानली जाते. दक्षिण गोलार्धात असलेलं भारतीय उपखंड गोंडवन भूमीपासून वेगळं झाल्यानंतर उत्तरेकडे सरकू लागलं. उत्तरेकडे सरकत सरकत हा भूभाग जेव्हा मुख्य आशिया खंडाला जाऊन धडकला, तेव्हा दोन भूभागांदरम्यान असलेल्या टेथिस समुद्रातील गाळ उंचावला गेला व हिमालयाची निर्मिती झाली. त्यामुळे सह्याद्री पर्वतातल्या नद्या या हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांपेक्षाही जुन्या आहेत. मुळा-मुठा नद्यांचा जन्म हा गंगा नदीच्याही कित्येक वर्ष आधी झालेला आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्र. के. घाणेकर यांनी त्यांच्या 'मुठेकाठचे पुणे' या पुस्तकात मुठा नदीच्या प्राचीनतेबद्दल एक संदर्भ दिला आहे. प्रख्यात प्राच्यविद्यासंशोधक रा. गो. भांडारकर यांना १८८४ साली एक जुनं हस्तलिखित सापडलं. त्या हस्तलिखितात 'भीमामहात्म्य' सांगणारं एक काव्य आहे. या काव्याच्या २६व्या अध्यायात मुळा-मुठा आणि भीमा यांच्या संगमाची वर्णने आहेत. त्या अध्यायाचा शेवट "इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडे भीमा माहात्म्ये मुळा-मुठा संगम महिमानं षट विंशति नमो अध्याय:।" अशा शब्दात केलेला आहे.

 

ज्येष्ठ पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. शरद राजगुरू यांनी मुठा नदीच्या प्राचीन इतिहासाचा सखोल अभ्यास केला आहे. मुठा नदीच्या किनारी बंड गार्डन व टेमघरजवळ प्राचीन अश्मयुगीन हत्यारे सापडली आहेत. ती बनवण्याच्या पद्धतीवरून ती मध्य वा पूर्व अश्मयुगीन असावीत. होमो इरेक्टस आणि होमो सेपियन सेपियन या दोन मानवप्रजातींचे मुठेकाठी वास्तव्य होते, असा अंदाज आहे. मुठा नदीच्या काठी पूर्वी घनदाट जंगल होते, याचे अनेक पुरावे आढळतात. मराठ्यांच्या इतिहासात पेशवे मुठा नदीच्या काठी शिकारीला जायचे, असा उल्लेख आहे. मुठेच्या काठी हत्तीच्या दाताचे आणि सोंडेचे अवशेष सापडले आहेत. तसंच 'औरोच' नावाच्या गायीसारख्या दिसणाऱ्या, परंतु सध्या नामशेष झालेल्या प्राण्याचे अवशेषही सापडले आहेत. इतिहास अभ्यासक पद्माकर प्रभुणे यांना १९९४-९५ साली मुठा नदीच्या प्रवाहात एक विष्णुमूर्ती सापडली. ज्येष्ठ प्राच्यविद्या अभ्यासक डॉ. गो. चं. देगलूरकर यांनी त्या मूर्तीचा अभ्यास केल्यावर ती मूर्ती इ. स. १२ व्या शतकातली, म्हणजेच यादव काळातली होती, असं लक्षात आलं. इ.स. १७६० ते १९६० हा मुठा नदीच्या इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो. मुळा-मुठा संगमावर होड्यांमधून वाहतूक आणि मासेमारी सुरू असल्याची चित्रं उपलब्ध आहेत. मुठेच्या पुराच्या पाण्यात पोहणे हा पुणेकरांचा आवडीचा छंद होता. लकडी पुलावरून उडी मारून ओंकारेश्वरापर्यंत पोहत येण्याची स्पर्धा लावली जाई. पट्टीचे पोहणारे फारच थोडे लोक हे अंतर पार करू शकत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत अंबिल ओढा आणि नागझरी ओढा या उजव्या बाजूने मुठा नदीला येऊन मिळणाऱ्या दोन प्रवाहांच्या मध्येच फक्त पुणे नगरी वसलेली होती. या दोन ओढ्यांमधूनच या नगरीला पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे अजूनही प्रत्यक्ष नदीवर मानवी हस्तक्षेप वाढला नव्हता.

 

अठराव्या शतकापासून मुठेच्या किनारी मंदिरं आणि घाट बांधण्यास सुरुवात झाली. आधुनिक पुणे शहराची मुहूर्तमेढ नानासाहेब पेशव्यांच्या काळात घातली गेली. वाढत्या शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अंबिल ओढ्याच्या पाण्यावर कात्रज इथे दोन तलाव बांधले गेले. शहराचा विस्तार करण्यासाठी अंबिल ओढ्याचा मार्ग बदलण्यात आला. अनेक ठिकाणी विहिरी आणि हौद बांधण्यात आले. पुण्याची सध्याची सदाशिव पेठ आणि डेक्कन जिमखाना ही दोन ठिकाणं जोडणारा 'लकडी पूल' हा नानासाहेब पेशव्यांनी बांधलेला मुठा नदीवरचा पहिला पूल होय. १८४० च्या पुरामध्ये हा पूल कोसळल्याने ब्रिटिशांनी तो सिमेंटचा बांधला. ब्रिटिशांनी पुण्याला मुंबईची 'पावसाळी राजधानी' म्हणून जाहीर केले. १८५१ साली पुणे छावणीला पाणीपुरवठा करण्यासाठी मुळा-मुठा नदीवर एक बंधारा बांधण्यात आला. त्याला 'जमशेदजी जीजीभाई बंधारा' म्हणत. १८६७ मध्ये 'बंड गार्डन बंधारा' बांधण्यात आला. १८७९ साली खडकवासला हे मोठं धरण मुठा नदीवर बांधण्यात आलं. माणसांचा नदीशी थेट संपर्क तुटण्यास खरं तर तेव्हापासून सुरुवात झाली. कारण, या धरणामुळे पुणे शहरात घरोघरी नळाने पाणीपुरवठा सुरू झाला. १९२३ साली मुठेवर तिसरा पूल बांधला गेला. खडकवासला धरण १८७९ मध्ये बांधलं गेलं. या धरणाच्या भिंतीची उंची ३१.९० मीटर आहे आणि याचं पाणलोट क्षेत्र ५०१ चौ.किमी. आहे. खडकवासला जलाशयात तीन अब्ज घनफूट जलसाठा असतो. मुठेच्या पात्रातच ओंकारेश्वर मंदिराच्या शेजारी विख्यात धन्वंतरी महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांची समाधी आहे. १९६१ च्या महापुरातही ही समाधी अभंग राहिली. ओंकारेश्वर मंदिराच्या पाठीमागे एक बारमाही वाहणारा जीवंत झरा आहे. या झऱ्याचं पाणी अजूनही स्वच्छ आहे. त्याला 'बापूचा झरा' म्हणतात. १७४९ साली, म्हणजेच नानासाहेब पेशव्यांच्या काळात बांधलेलं सिद्धेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.

 

दि. १२ जुलै, १९६१ रोजी मुठेची उपनदी असणाऱ्या अंबी नदीवर नुकतंच बांधलेलं पानशेतचं धरण फुटलं. पाण्याचे महाकाय लोटच्या लोट पुणे शहरात येऊ लागले. मुठा नदीवर त्यावेळी सर्वात उंच असणारा लकडी पूल पाण्याखाली गेला. पानशेतचं धरण फुटल्यावर अवघ्या आठ तासांनी खडकवासला धरण फुटलं आणि पुण्यात प्रचंड हाहाकार माजला. मुठा नदीकाठची मोठमोठी झाडं जलप्रलयात उन्मळून पडली. मुठा नदीच्या पुराच्या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की, त्याने मुळा नदीच्या पाण्याला मागे ढकललं. यामुळे मुळेचं पाणी आजूबाजूच्या भागांत पसरलं. त्यावेळी पुण्यात उडालेला हाहाकार सर्वांच्या परिचयाचा आहे. लाखो वर्षांच्या वहनातून नदीने आपल्या पात्रात आणि खोऱ्यात (पात्राच्या आजूबाजूच्या भागात) एक स्वतंत्र परिसंस्था तयार केलेली असते. नदीच्या खोऱ्यात जसजसा मानवी हस्तक्षेप वाढत जातो तसतसे त्या परिसंस्थेत बदल होत जातात. पुणे शहराची जसजशी वाढ झाली तसतसे मुळा-मुठा नद्यांच्या परिसंस्थेतही लक्षणीय बदल घडून आलेले आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@