नवी मुंबई मनपाचा ३ हजार ४५५ कोटींच्या शिलकीचा अंदाजित अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर

    16-Feb-2019
Total Views |

 


 
 
 

अंदाजपत्रकात ४०० कोटींची वाढ, शैक्षणिक, आरोग्यसेवा सक्षम करण्यावर भर

 

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचे २०१९-२० वर्षातील ३ हजार ४५५ कोटींच्या अर्थसंकल्पाचे अंदाजपत्रक आयुक्त डॉ. रामसस्वामी एन.यांनी शनिवारी स्थायी समितीसमोर सादर केले. मागील २०१८-१९ या वर्षी आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकापेक्षा यात तब्बल ४०० कोटींची वाढ करण्यात आली आहे. स्थायी समितीत आता यावर चर्चा करण्यात येणार असून विविध योजनांसाठी या रकमेत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

यावर्षी नवी मुंबई महानगरपालिकेने शैक्षणिक आणि आरोग्यसेवा सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करत पाणी नियोजनासाठी विविध उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच शैक्षणिक क्षेत्रावरही जोर देण्याचा निर्णय घेण्यात आला असून दृकश्राव्य वर्गखोल्या, संगणक आणि सुसज्ज प्रयोगशाळा तयार करण्यात आल्या आहेत. ई-कंटेंट अभ्यासक्रमासह प्रोजेक्टर व निर्मिती करण्यात आली असून रोबोटिक्स या नवीन तंत्राज्ञानाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे. तसेच कनिष्ठ आणि रात्र महाविद्यालय सुरू करण्यात येणार असून नेरुळ येथे सायन्स सेंटर बनवण्यात येणार आहे.

 

रूग्णालयांचे सक्षमीकरण

 

वाशी रुग्णालयावर पडणारा भार पाहता ऐरोली, नेरुळ व बेलापूर येथील रुग्णालयांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. तसेच डॉक्टरांची संख्याही वाढवण्यात येणार असून २४ तास डॉकटर्स व इतर स्टाफ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.दंत उपचार विभाग सुरू करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हिमोफिलिया व कर्करोग कक्ष सुरू करण्यात येणार आहे.

 

सी अँड डी’ प्रकल्प राबविणार

 

शहराला सध्या कचऱ्याची मोठी समस्या भेडसावत आहे. यासाठी पालिकेने ‘सी अँड डी’ प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. क्षेपणभूमीवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तयार झालेल्या खडी व रेतीचा वापर पदपथ,रस्ते,गटारे बांधकामात करण्यात येणार आहे. तसेच सीवूड्स सेक्टर ५० व महापे औद्योगिक केंद्राजवळ महाराष्ट्र प्रदूषण मंडळामार्फत केंद्र उभारण्यात येणार आहे. मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी पालिका लीडर प्रणाली वापरणार आहे. नवी मुंबई शहराला भेडसावणारी पार्किंगची समस्या लक्षात घेता मल्टिपल पार्किंगसाठी शहरात नियोजन करून कमीत कमी जागेत जास्त गाड्या कशा राहतील याचा विचार करण्यात येणार आहे.