खोटारड्या प्रसारमाध्यमांचा निषेध...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2019   
Total Views |


 


पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या खोटारडेपणामुळे भारतीय शहिदांचे बलिदान मुळीच कमी होणार नाही. उलट ‘व्यर्थ न हो बलिदान’ म्हणत जागतिक स्तरावर भारतीयांचे शौर्य, देशप्रेम नव्या तेजाने, नव्या दमाने निर्माण होत राहील आणि संक्रमित होत राहील.

 

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याने देशात संताप आणि दु:खाची भावना तीव्रपणे उमटली आहे. जागतिक स्तरावर या दहशतवादी हल्ल्याची कडक निंदाही केली गेली. इस्रायल, रशिया, अमेरिका, श्रीलंका, नेपाळ, भूतान, बांगलादेश, मालदीव आणि सर्वच देशांनी या निर्घृण हल्ल्याचा निषेध करत, शून्य सहिष्णुता दाखवत दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. पण या सर्व पार्श्वभूमीवर अकृत्रिमरीत्या पैदा झालेला आणि जो सध्या भीकेच्या वळचणीला लागला आहे, असा भीकिस्तान म्हणजे पाकिस्तान. त्या पाकिस्तानने पुलवामाच्या हल्ल्याबाबत काय करावे? तर हल्ला झाल्या झाल्या त्याने आपल्या सीमारेषेवरील सुरक्षा नव्याने कार्यान्वित केली. या दहशतवादी हल्ल्याचा विरोध, निषेध किंवा भारताला नैतिक समर्थन देणे हे जागतिक स्तरावर प्रत्येक देशाची एक अलिखित भूमिकाच होती. तशी ती भूमिका जगाच्या सर्वच देशांनी पारही पाडली. पण अगदी भारत देशाच्या खांद्याला लागून असलेल्या या देशाला भारतावर हल्ला झाल्यानंतर नऊ तासांनी जाग आली. नऊ तासांनी पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैजल यांनी या घटनेची निंदा केली. निंदा करताना मात्र फैजल हे सांगायला विसरले नाहीत की या हल्ल्यात पाकिस्तानचा काही हात नाही. या हल्ल्यात आपण दोषी नाही, असे पाकिस्तान म्हणतो. पण दुसरीकडे पाकिस्तानची प्रमुख वर्तमानपत्रे या हल्ल्याची जी दखल घेतात, त्यावरून दिसून येते की, पाकिस्तानची दहशतवादाबाबत भूमिका काय आहे ते!

 

जगभरात प्रसारमाध्यमांची शाश्वत मानवी मूल्य मानणे अशी वैश्विक भूमिका असते. ती भूमिका कालातीत आहे. पण ही भूमिका पाकिस्तानची प्रसारमाध्यमे पाळताना दिसत नाहीत. पाकिस्तानमध्ये काही वर्षांपूर्वी पेशावर येथे दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट केला. शेकडो विद्यार्थी मृत्युमुखी पडले. त्यावेळी भारत सरकार पाकिस्तानच्या दु:खात सहभागी झाले. इतकेच नव्हे, तर भारतीय प्रसारमाध्यमांनीही पाकिस्तानमधील हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यावेळी भारतीय प्रसारमाध्यमांनी त्या दहशतवादी कृत्याला ‘मानवतेवरचा हल्ला’ ठरवले. मात्र, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची बातमी देताना पाकिस्तानमधील ‘दी नेशन’ वृत्तपत्राने मोठी बातमी छापली.ती अशी, ‘फ्रीडम फायटरच्या हल्ल्यात ४४ जणांचा मृत्यू.’ भारतीय सैन्यावर क्रूर हल्ला करणाऱ्या पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांच्या मते स्वातंत्र्यसैनिक आहेत? तर दुसरीकडे ‘दी डॉन’ वृत्तपत्राने या बातमीला छोट्याशा कॉलममध्ये एका कोपऱ्यात छापले आहे. जणू ‘दी डॉन’ला सांगायचे आहे की, भारतीय सैनिक मारले गेले, ही पाकिस्तानच्या दृष्टीने दुर्लक्ष करण्याची गोष्ट आहे.

 

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांचे वर्तन म्हणजे जे आडात तेच पोहऱ्यात येते. पाकिस्तानची आजवरची कृत्ये पाहता असे वाटते की, मानवी मूल्यांची राखण करणे हा धर्म पाकिस्तानचा नाहीच. त्यामुळे ज्या देशाच्या रक्तातच माणुसकी नाही, तर ती त्या देशाच्या प्रसारमाध्यमांमध्ये कुठून येणारअसो, ज्या देशात जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संस्थेचे मुख्यालय आहे. ज्या देशात भारतातले अनेक देशद्रोही, दहशतवादी लपून छपून सुखाने राहतात, त्या देशाला दहशतवाद्यांचे आणि दहशतवादाचे वावडे नाहीच. उलट अमन-शांतीच्या नावाने जगभरात हिंसेचा नंगानाच करण्यात पाकिस्तानचा इथून तिथून सहभाग असतोच असतो. पण गल्लीच्या गुंडाने चोरीमारी करावी आणि गुन्हा सिद्ध झाला, तर मार मिळेल या भीतीने आपण त्यातले नाही, असा बेरकी आविर्भाव आणावा, तसे पाकिस्तानचे आहे. दहशतवाद पेरत, पाकिस्तान अशा टोकाला पोहोचला आहे की, या देशाला दहशतवाद पोसण्याशिवाय गत्यंतर नाही.

 

सैनिकी जोरावर किंवा भ्रष्टाचाराच्या आरोपावरसातत्याने होणारे सत्तांतर, सत्तांतर टिकवण्यासाठी केला जाणारा हिंसाचार,दहशतवाद यामुळे पाकिस्तान अस्थिरतेच्या गर्तेत कधीच न बाहेर येण्यासाठी पडला आहे. त्यातच भारताबद्दल पाकिस्तानला कमालीची असूया आहे. त्यामुळे रात्रंदिवस भारतावर कुढत कुढत या देशाने स्वत:ची कब्र स्वत:च खणली आहे. कोळसा उगळावा तितका तो काळाच होत जातो. तसेच या देशाबद्दल, या देशाच्या भूमिकेबद्दल जितके बोलावे तितके नकारात्मकच येणार. असो. पण, एक मात्र नक्की वाटते की, पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या खोटारडेपणामुळे भारतीय शहिदांचे बलिदान मुळीच कमी होणार नाही. उलट ‘व्यर्थ न हो बलिदान’ म्हणत जागतिक स्तरावर भारतीयांचे शौर्य, देशप्रेम नव्या तेजाने, नव्या दमाने निर्माण होत राहील आणि संक्रमित होत राहील. पाकिस्तानी खोटारड्या प्रसारमाध्यमांचा निषेध...!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@