कबड्डीचे मैदान गाजवणारा 'विकास'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



भारताचे प्रतिनिधीत्व करणे, हे कोणत्याही खेळाडूसाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आहे. शेवटी त्या एका गोष्टीसाठी सगळा आटापीटा असतो, त्यासाठी नक्कीच माझे प्रयत्न सुरू आहेत.


'कबड्डी' हा मूळचा भारतीय उपखंडातील खेळ आणि त्यानंतर एक आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा खेळ. पण कबड्डीची मूळं रोवली गेली ती भारतात. त्यातही भारताच्या प्रत्येक राज्यात हा खेळ वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. म्हणजे महाराष्ट्रात 'हुतूतू', केरळात 'वंडीवडी', चेन्नईमध्ये 'चेडूयुडू', पंजाबात 'झाबर गंगा' व 'सौची पक्की', बंगालमध्ये 'हुडूडू', उत्तर भारतात 'कोनवरा' 'साबरगण्णा.' मात्र, या साऱ्या प्रादेशिक सुरांचं एकात्मिकीकरण करण्याचे काम महाराष्ट्राने केले. प्रादेशिकता बाजूला ठेऊन संपूर्ण भारतात हा खेळ 'कबड्डी' म्हणून ओळखला जाऊ लागला तो महाराष्ट्राच्या, मराठी माणसांच्या प्रयत्नांमुळे. या खेळातील विविधतेतून महाराष्ट्राने एकता निर्माण केली. त्यामुळे दरवर्षी जाहीर होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या 'शिवछत्रपती पुरस्कारा'त 'कबड्डी' खेळाची विशेष दखल घेतली जाते. यावर्षी हा पुरस्कार जाहीर झाला तो पुण्याच्या 'विकास काळे' याला. पुण्याच्या बाणेर येथे जन्मलेला विकास काळे ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतसुमारे ११ वर्षांनी महाराष्ट्राच्या ज्या संघाने सुवर्णपदक जिंकले, त्याचा सदस्य होता. तसेच त्याच वर्षी पुणे संघाला राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा जिंकून देण्यात विकासने मोलाचा वाटा उचलला होता. ६४व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य, तर फेडरेशन कप स्पर्धेत रौप्य अशी अन्य दोन पदके विकासच्या नावावर आहेत. एवढेच नाही, तर 'प्रो-कबड्डी' या कबड्डी लीगमध्ये 'पटना पायरट्स' या संघाच्यावतीने विकास खेळत आहे आणि यावर्षीचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पण विकासचा आजवरचा प्रवास सोपा नव्हता.

 

पुण्यात शालेय शिक्षण घेत असतानाच विकासला 'कबड्डी' या खेळाचे विशेष आकर्षण होते. मात्र, घरच्यांनी अभ्यासाकडे लक्ष देण्याचा आग्रह धरल्याने काही काळ विकासने कबड्डी खेळणे बंद केले. पण फारकाळ विकास कबड्डीपासून दूर राहू शकला नाही. आपलं शिक्षण पूर्ण करून वयाच्या १८ व्या वर्षापासून त्याने कबड्डीचे रितसर प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. या प्रतिभावान खेळाडूने काही दिवसांतच कबड्डी जगताला आपली दखल घ्यायला लावली आणि डिफेंडर म्हणून आपली जागा महाराष्ट्र व पुण्याच्या संघात मिळविली. पण या सगळ्या प्रवासात त्याला त्याच्या पालकांची मदत झाली नाही. कारण, त्यांच्या मते कबड्डी हा खेळ उपजीविकेचे साधन असू शकत नाही. त्यामुळे त्यांनी विकासला क्रिकेट खेळण्याचेही सल्ले दिले होते. शेवटी साहेबांचा खेळ हा आपल्या मातीतल्या खेळापेक्षा जास्त पैसे मिळवूण देतो, हा इतरांप्रमाणे त्यांचाही दृष्टिकोन! पण हाच मातीतला खेळ मोठा होत आहे, याची जाणीव विकासने त्याच्या पालकांना करून दिली. विकासच्या मते, "घरच्यांनी नकार देणे साहजिक होते, कारण, तेव्हा खरंच कबड्डी हे उपजीविकेचे साधन नव्हते. पण आज वेगवेगळ्या लीगमुळे खेळाडूंना ओळख मिळते आणि पैसेही मिळतात. माझी आर्थिक परिस्थितीही बेताची होती. मात्र, या स्पर्धेमुळे मला स्वत:चा खेळ दाखवण्याची संधी मिळाली. त्यामुळे आता पालकांची तशी काही हरकत नाही."

 

विकास 'प्रो-कबड्डी लीग' या बहुचर्चित स्पर्धेत २०१४पासून सामिल झाला. एक उत्कृष्ट डिफेंडर म्हणून त्याने आपली जागा निर्माण केली आणि २०१८च्या या स्पर्धेत २५ कोटींच्या कराराने त्याला पटनाच्या संघाने विकत घेतले. त्यामुळे विकासने या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर त्याच्यावर टीकाही करण्यात आली. पण यावर विकासने, "ही स्पर्धा केवळ पैसे कमवण्यासाठीच नाही, तर स्वत:ची ओळख आणि इतर दर्जेदारखेळाडूंकडून शिकण्यासाठी आहे," असे सांगत विरोधकांची तोंडं बंद केली होती. त्याच्या गतवर्षीच्या याच स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर विकास ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतमहाराष्ट्रासाठी बहुमोल कामगिरी करू शकला. सध्या विकास महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत असला तरी, पुण्याला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळवून द्यायचे आहे, आणि अर्थातच आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणे हे विकासचे स्वप्न आहे. विकासच्या मते, "भारताचे प्रतिनिधीत्व करणे, हे कोणत्याही खेळाडूसाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आहे. शेवटी त्या एका गोष्टीसाठी सगळा आटापीटा असतो, त्यासाठी नक्कीच माझे प्रयत्न सुरू आहेत." त्याचबरोबर यंदाचा महाराष्ट्र राज्य सरकार 'शिवछत्रपती पुरस्कार'ही विकासला जाहीर झाल्याने भारतीय कबड्डी संघात विकासची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या भारतीय संघ हा २०१९मध्ये दुबईत होणाऱ्या 'कबड्डी विश्वचषक स्पर्धे'च्या तयारीत आहे. त्यामुळे विकासची निवड झाल्यास महाराष्ट्राचा विकास काळे, परदेशी खेळाडूंना चारीमुंड्या चीत करताना दिसेल.

 

विकासच्या या आपल्या मातीतल्या खेळावर असलेल्या प्रेमाकरिता,

 

तू सभ्यताओं की मेल है

तू संस्कृति का खेल है,

इस खेल के खिलाड़ी

खिलेगा तेरा चेहरा भी

तुझे भी सम्मान मिलेगा

क्रिकेट जितनी पहचान मिलेगी...

 

या अज्ञात कवीच्या या ओळी आठवतात. विकासला दै. 'मुंबई तरुण भारत'कडून यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@