लोकहितकारी मुद्यांपासून भरकटलेली कॉंग्रेस!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2019   
Total Views |

 
 
 
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना अक्षरश: वेडे केले आहे. एखादा वेडा कसे दररोज एकच एक वाक्य बोलतो, तसे राहुल गांधी ‘चौकीदार चोर है,’ असे बेंबीच्या देठापासून बोंबलत देशाला सांगत आहेत. खरे चोर कोण आहेत, हे देशाला माहिती आहे. त्यामुळे ‘खोटे बोल पण रेटून बोल,’ या वाक्प्रचाराप्रमाणे राहुल गांधी कितीही खोटे बोलले तरी जनतेवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. ज्यांनी चोरी केली आणि देशाची तिजोरी रिकामी केली, तेच आज इतरांना चोर म्हणत आहेत, यात आश्चर्य वाटण्यासारखेही काही नाही. 1 लाख 76 हजार कोटी रुपयांचा कोळसा घोटाळा, 1 लाख 86 हजार कोटी रुपयांचा टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा जनता अजूनही विसरलेली नाही. ज्यांनी आकाश आणि पाताळातही घोटाळे केले त्यांना जनता कधीच माफ करणार नाही. त्यामुळे कितीही उसने अवसान आणून कॉंग्रेसने आणि त्या पक्षाच्या अध्यक्षाने कितीही बोंबाबोंब केली, तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
 
 
 
 
 
 
राफेल विमाने फ्रान्सकडून खरेदी करण्याच्या व्यवहारात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असे दस्तुरखुद्द सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केल्यानंतरही राहुल गांधी आरोप करणार असतील, तर त्यांचा त्यामागचा हेतू काय आहे, हे स्पष्ट होते. आपण दररोज एकच एक खोटी गोष्ट लोकांना सांगितली तर कालांतराने ती त्यांना खरी वाटायला लागते, असा जर राहुल गांधी यांचा कयास असेल, तर त्यांच्या भ्रमाचा भोपळा मे महिन्यात फुटल्याशिवाय राहणार नाही! 2004 ते 2014 या दहा वर्षांच्या कालावधीत कॉंग्रेस आणि राहुल गांधींना कधीच शेतकर्यांचा पुळका आला नाही. आताच त्यांना शेतकरीहित आठवण्याचे कारण? लेकसभा निवडणूक, दुसरे काय? राहुल गांधी यांची कॉंग्रेस भरकटली आहे. त्यांच्याकडे मोदींवर टीका करण्याशिवाय अन्य कुठलाही मुद्दाच राहिलेला नाही. पण, मोदींवर दररोज आरोप करून आपण त्यांना मोठे करतो आहोत आणि जनतेच्या मनातून उतरत आहोत, याचे जराही भान त्यांना राहिलेले नाही. आजची कॉंग्रेस मुद्यांवर न लढता लोकांची दिशाभूल करते आहे. जनहिताचा कुठलाही मुद्दा नसलेली दिशाहीन कॉंग्रेस सातत्याने रसातळालाच जाताना दिसते आहे.
 
 
 
 
‘डुबती नैया को तिनके का आधार,’ याप्रमाणे कॉंग्रेस सध्या प्रियांका गांधी यांच्या आधाराने स्वत:चे अस्तित्व टिकवू पाहात आहे. चीनने 1962 च्या युद्धात भारताचा पराभव केला होता. संपूर्ण देशात कॉंग्रेसच्या विरोधात असंतोषाची लाट होती. आपले अस्तित्व कसे टिकवावे, असा प्रश्न कॉंग्रेसला पडला होता. त्यातच लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असतानाच त्यांचे निधन झाले आणि इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या. त्यांच्या रूपाने कॉंग्रेसला एक नवा चेहरा मिळाला होता. एका महान पित्याची मुलगी आपल्या पक्षाचे नेतृत्व करणार असल्याने त्याचा फायदाच होईल, या विचाराने कॉंग्रेस आनंदी होती. पण, त्याच वेळी ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांनी एक विधान केले होते- ‘‘आता दररोज सकाळी वर्तमानपत्रांमधून एक सुंदर चेहरा पाहायला मिळेल,’’ असे ते म्हणाले होते. आता प्रियांका गांधी यांच्याबाबतीत जर कुणी असे म्हणाले, तर आपण त्याला काय म्हणणार? परवाच लखनौ येथे कॉंग्रेसचा रोड शो झाला. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधीही त्यात सहभागी झाल्या. त्यांना पाहायला लखनौच्या रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती. गर्दीतले सगळे लोक कॉंग्रेसचे होते? त्यांना पाहायला आलेले सगळे कॉंग्रेसला मतदान करणार? लखनौतील रोड शो संपल्यानंतर प्रियांका गांधी यांनी जनसमुदायाला संबोधित करणे अपेक्षित होते. त्या बोलणार का आणि बोलल्या तर काय बोलतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
 
 
 
 
 
मात्र, त्या बोलल्याच नाहीत. ज्यांना ऐकायला लोक जमले होते, त्याच बोलल्या नाहीत तर उपयोग काय? ते येणार्या काळात दिसेलच. चीनकडून भारताचा अपमानजनक पराभव झाला होता. जिकडेतिकडे असंतोष होता. कॉंग्रेसच्या सरकारविरुद्ध आंदोलनं होत होती. त्यातच इंदिरा गांधी यांनी देशाची सत्तासूत्रे सांभाळली. प्रारंभीच्या काळात इंदिरा गांधी काही करिष्मा दाखवू शकल्या नाहीत. पण, नंतर 1967 च्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसने तयार केलेल्या जाहीरनाम्यात इंदिरा गांधी यांनी देशात समृद्धी आणण्याचे आश्वासन दिले. देशातल्या गरीब जनतेसाठी हे फार मोठे आश्वासन होते. पण, प्रत्यक्षात काय झाले, संपूर्ण देशाला माहिती आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी आता मोदी यांच्यावर कितीही आरोप केले आणि देशातील जनतेचे किमान उत्पन्न वाढविण्याचे आश्वासन दिले, तरी त्याचा फार काही उपयोग होईल, असे चित्र दिसत नाही.
 
 
 
 
राहुल गांधी यांच्या आश्वासनाने जे लोक खूश आहेत, त्यांनी गतकाळात जाऊन जरा 1967 सालचा कॉंग्रेसचा जाहीरनामा वाचला पाहिजे. मग लक्षात येईल की, कॉंग्रेसने कशी नुसतीच घोषणाबाजी केली होती. 1962 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला 361 जागा मिळाल्या होत्या, त्या घटल्या आणि 1967 साली केवळ 283 जागा मिळाल्या. याचा अर्थ कॉंग्रेसची लोकप्रियता घटली होती, असाच घेता येईल ना! लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढली असताना कॉंग्रेसच्या जागा कमी झाल्या होत्या आणि सात राज्यांच्या विधानसभांची निवडणूकही कॉंग्रेस हरली होती. ही बाब लक्षात घेतली, तर कॉंग्रेसच्या लोकप्रियतेला कसे ग्रहण लागले होते, हे आपल्याला कळेल. पहिल्यांदा राज्य विधानसभांच्या निवडणुकीत कॉंग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. शिवाय, 1967 सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांतच उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या पक्षांतरामुळे तिथली निवडून आलेली कॉंग्रेसची सरकारंही पडली होती. त्या वेळी उत्तरप्रदेशात चौधरी चरणिंसह आणि मध्यप्रदेशात गोविंद नारायण सिंह मुख्यमंत्री बनले होते. 1967 सालच्या निकालांपासून धडा घेत जेव्हा 1969 साली इंदिरा गांधी यांनी स्वत:च्या सरकारला आणि पक्षाला लोकहितकारी मुद्यांशी जोडले, तेव्हा 1971 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला 352 जागा मिळू शकल्या होत्या. याचे सगळे श्रेय हे इंदिरा गांधी यांना जाते. त्यांचा ‘गरिबी हटाव’ हा नारा अतिशय लोकप्रिय झाला होता. तो लोकांच्या पसंतीस उतरल्याने लोकांनीही कॉंग्रेसला भरभरून मतदान केले होते. इंदिरा गांधींमध्ये कर्तृत्व होते, निर्णय घेण्याची आणि बाजी पलटवण्याची क्षमताही होती. ती क्षमता प्रियांका गांधींमध्ये आहे का, हे तपासून पाहण्याची गरज आहे. प्रियांका गांधी या केवळ इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसतात म्हणून पक्षाला त्यांचा फायदा होईल, असे ज्यांना वाटते त्यांनी इंदिरा गांधींच्या काळात जाऊन तथ्य जाणून घेतले पाहिजे.
 
 
 
 
आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती ही की, 1969 साली कॉंग्रेसमध्ये फूट पडली होती. इंदिरा गांधींनी कॉंग्रेस आयची स्थापना केली होती. जवळपास सगळे मोठे नेते मूळ कॉंग्रेसमध्येच होते. तिकडे इंदिरा गांधी यांनी ‘गरिबी हटाव’चा नारा दिला आणि 1971 च्या निवडणुकांना त्यांचा कॉंग्रेस आय हा पक्ष सामोरा गेला. नारा लोकप्रिय झालाच होता. इंदिरा गांधी यांनी, राजेमहाराजे यांना मिळणारे विशेषाधिकार संपुष्टात आणले होते. चौदा बँकांचे राष्ट्रीयीकरणही करण्यात आले होते. लोक असे समजायला लागले की, आता इंदिरा गांधी आपले दारिद्र्य दूर करण्यासाठीच कामाला लागल्या आहेत, श्रीमंतांविरुद्ध कारवाई करीत आहेत. लोकभावनेचा फायदा उठवत इंदिरा गांधींनी प्रचंड बहुमत मिळविले होते. नंतर भलेही लोकांना आपला विश्वासघात झाल्याचे लक्षात आले असेल, तोपर्यंत इंदिरा गांधी आणखी मजबूत झाल्या होत्या. तसा कुठलाही करिष्मा दाखविण्याची ताकद नवनियुक्त कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यात आहे, असे प्रथमदर्शनी तरी दिसत नाही. इंदिरा गांधी यांनी ज्याप्रमाणे स्वत:ला आणि पक्षाला लोकहितकारी मुद्यांशी जोडत यश मिळविले होते, तसे काही करण्याची क्षमता जर प्रियांका गांधी यांनी सिद्ध केली, तर लोक निश्चितपणे कॉंग्रेसला मतदान करतील. अन्यथा, 1977 साली कॉंग्रेसची जी गत झाली होती, तशीच यंदाच्याही निवडणुकीत होईल, यात शंका नाही!
..................
@@AUTHORINFO_V1@@