साधता संवाद मिटे घरगुती वाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2019   
Total Views |

 

 
 
 
 

‘चला बोलूया’ समुपदेशनाचा एक नवीन उपक्रम

 

महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांनी ‘चला बोलूया’ हा समुपदेशनाचा एक नवीन उपक्रम चालू केला आहे. याअंतर्गत मुंबई उच्च न्यायालयातील महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात (पी.डब्लू.डी. बिल्डिंग, फोर्ट) समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यात घटस्फोटापूर्वी तसेच घटस्फोटानंतर उद्भवणारे विवाद सोडवण्यासाठी समुपदेशन केले जाते. या समुपदेशन केंद्राद्वारे पक्षकारांशी तज्ज्ञांच्या मदतीने शांतपणे संवाद साधून समाधानपूर्वक तोडगा शोधण्यासाठी मदत केली जाते.

 

‘विवाह’ ही केवळ कोण्या स्त्री आणि पुरुषाचे एकत्र सहजीवन सुरू होणारी घटना नाही, तर हिंदू समाजामधील १६ संस्कारांपैकी तो एक महत्त्वाचा धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिकही संस्कार आहे. तसेही जगाच्या पाठीवर सर्वत्रच विवाह संस्कार अस्तित्वात आहे. फक्त पद्धत वेगवेगळी. विवाह होतानाच्या पद्धती जरी वेगवेगळ्या असल्या तरी, जगभरात विवाह तुटण्याची सुरुवात मात्र समान दु:खाची जाणीव देणारी असते. विवाह का तुटतात, यावर कितीतरी संशोधन झाले आहे. त्यावर अनेक उपायही सुचवले जातात. पण वैश्विक स्तरावर त्याचे कारण जे सांगितले जाते ते म्हणजे, या हृदयाचे त्या हृदयाशी रेशमीबंध न जुळल्यामुळे विवाह तुटतात. आता मनातल्या गुजगोष्टी एकमेकांना सांगूनच पती-पत्नी विवाह टिकवू शकतात का? तर असेही नाही. खरे म्हणजे एकमेकांमधील गैरसमज, एकमेकांमध्ये अविश्वासामुळे आलेला दुरावा या सार्‍यांना दूर करणे गरजेचे असते. पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. ‘मी कसा चुकलोच नाही’ किंवा ‘मीच बरोबर होते,’ हे सिद्ध करण्यात वेळ आणि नातेही वाया जाते. जोडण्याचे तर दूरच. तोडण्यासाठी शब्द शस्त्रासारखे वापरले जातात. या दोघांना समजावणार कोण? कारण, माझा मुलगा किंवा माझी मुलगीच बरोबर आहे आणि तिला वा त्यालाच त्रास होतो, हे सांगण्याची मुलाच्या आणि मुलीच्याही नातेवाईकांची स्पर्धाच सुरू होते. अर्थात, सन्माननीय अपवाद असतातच. पण हल्ली जागतिकीकरणाच्या युगात ‘आपले घर भले आणि आपण भले.’ उंबरठ्याबाहेर काय चालले आहे, याचा विचार करण्याची कोणाला सवड नाही आणि दुर्दैवाने आवडच उरली नाही. तसेही आपल्या समाजात विवाह विधी समारंभ पार पडताना सगळा समाज एकवटतो. मात्र, तोच विवाह तुटताना कशाला त्यांच्या घरगुती भांडणात पडा, असा विचार केला जातो. त्यामुळे काही कारणांमुळे पती-पत्नीमध्ये आलेल्या दुराव्याला दूर करणारे कोणी सहसा आढळत नाही.

 

एका सर्वेक्षणानुसार असे सिद्ध झाले की, सध्या घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. लोकं छोट्या छोट्या कारणांवरूनही घटस्फोट घ्यायला लागले आहेत. कारण, ‘मी जमवून घेणार नाही. तुला काय ते जमवावे लागेल,’ ही भावना वाढीस लागली आहे. तरीही सर्वेक्षण सांगते की, मोबाईलच्या अतिवापरामुळे संसारातील संवाद तुटत चालला आहे. आपली पत्नी कोणाशी बोलते किंवा पती कोणाशी बोलतो, काय बोलतो यावर संशयात्मक पद्धतीने टीका-टिप्पणी करण्यात कौटुंबिक वेळ वाया घालवला जात आहे. त्यामुळे घरं तुटत आहेत. ‘तुटलेली घरं’ समाजाचा कणा खिळखिळा करत आहेत. या तुटू पाहणाऱ्या संसाराला वाचवणार कसे? तर त्यासाठी ‘महाराष्ट्र सेवा विधी प्राधिकरण’ यांनी ‘चला बोलूया’ हा उपक्रम सुरू केला आहे. त्यांचे म्हणणे आहे.

 

हळवी असतात मने जी,

शब्दांनी मोडली जातात

अन शब्द असतात जादूगार

ज्यांनी माणसे जोडली जातात,

साधता संवाद मिटे घरगुती वाद...

 

याबाबत या क्षेत्रात काम करणाऱ्या अश्विनी साखळकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ‘चला बोलूया’ या उपक्रमाची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, “असे म्हणतात की, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. भारतीय संस्कृतीत लग्नसंस्थेला एक विशिष्ट स्थान आहे. ५०-६० वर्षे एकत्र आनंदाने संसार केलेली जोडपी पाहणे हा एक सुखद अनुभव असतो. पण अलीकडे जेव्हा घटस्फोटांच्या संख्येत झालेली वाढ बघतो, तेव्हा फारच काळजी वाटते. घटस्फोटांची अनेक कारणे असतात. त्यामुळे संबधित संपूर्ण कुटुंबांना प्रचंड मानसिक तणावातून जावे लागते. पैसा आणि वेळ याचेही प्रचंड नुकसान होतेच. याहून सखोल विचार करता याचे दूरगामी परिणाम समाज स्वास्थ्यावरसुद्धा होत असतात. समाजात अनेक संस्था, समुपदेशक आणि मानसोपचार तज्ज्ञ या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रश्नावर काम करीत आहेत. ”

 

अश्विनी यांच्याशी चर्चा करून कळले की, या सर्वाचा सखोल अभ्यास करून समुपदेशकांचा अनुभव सांगतो की, मुंबईतील केंद्रात घटस्फोटाची याचिका दाखल करण्यापूर्वी समुपदेशनासाठी आलेल्या ९७ जोडप्यांपैकी १९ जोडपी घटस्फोटापासून परावृत्त होऊन सुखाने संसार करत आहेत. वेळेतच संवाद घडल्यामुळे व योग्य मार्गदर्शन मिळाल्याने ही जोडपी न्यायालयीन याचिका दाखल करण्यापर्यंत पुढे गेलीच नाहीत.समुपदेशक समेट झालेल्या जोडप्यांना फोन करून पाठपुरावासुद्धा करत असतात. या केंद्रात आलेल्या जोडप्यांना नि:शुल्क समुपदेशन केले जाते. समुपदेशकही सामाजिक बांधिलकीतून ही सेवा देतात व त्यासाठी अगदी थोडे मानधन त्यांना मुंबई उच्च न्यायालयातर्फे दिले जाते. सध्या पोलीस विभाग त्यांच्याकडे फिर्याद नोंदविण्यासाठी आलेल्या जोडप्यांना अक्षरश: स्वत: वाहन खर्च करून या केंद्रात घेऊन जात आहेत. या समुपदेशन केंद्रात ज्येष्ठ नागरिक, जर त्यांना संपत्तीच्या कारणावरून किंवा इतर मानसिक त्रास नातेवाईकांकडून होत असेल, तर संपर्क करू शकतात. सेवाभावी संस्थांना, वकिलांना आणि जनसामान्यांना विनंती आहे की, त्यांनी ‘चला बोलूया’ या प्रीलिटिगेशन समुपदेशन केंद्राची माहिती सर्व दूर पोहोचवावी. ज्यामुळे आपण अनेक संसार वाचवू शकतो.

 
महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांनी ‘चला बोलूया’ हा नवीन उपक्रम चालू केला आहे. टी. आय. एस. एस. (टीस), एस. एन. डी. टी. विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठातील प्रशिक्षित समुपदेशक व सेवा प्राधिकरण वकील वर्गाचे एक मंडळ इथे मार्गदर्शन करते. समुपदेशन केंद्र सध्या मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद येथे कार्यरत आहेत. सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी दुपारी २ ते ५ या वेळेत ही केंद्रे कार्यरत असतात. फोर्ट येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीमधील महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात हा उपक्रम नि:शुल्क राबवला जातो. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नागरिकही तक्रारींच्या निवारणासाठी येथे येऊ शकतात. अनेकदा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीला या केंद्रात जाण्याचा सल्ला दिला जातो. याबाबतची माहिती राज्य सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मुंबई पोलिसांना १ हजार ६८ संसार सावरण्यात, वर्षभरात ७९ दाम्पत्यांमध्ये समेट घडवण्यात व घटस्फोट रोखण्यात यश आले आहे. अधिक माहितीसाठी legalservices.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

 
@@AUTHORINFO_V1@@