दोघांच्या भांडणात...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 

 
 
 
 
गेले अनेक दिवस चीन आणि अमेरिकेत सुरू असलेले व्यापार युद्ध सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरले आहे. एकीकडे अमेरिका आपल्या निर्णयावर ठाम आहे, तर दुसरीकडे चीनही आता व्यापाराच्या दुसऱ्या वाटा शोधण्याच्या तयारीत आहे. आशियाई देशांकडून खऱ्या अर्थाने अमेरिकेला आयात कमी होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मित्रराष्ट्र, शत्रूराष्ट्र असा कोणताही द्वेष न करता आपल्याला हवे तसे निर्णय घेताना दिसतात. त्यातच जपान हे अमेरिकेच्या जवळचं राष्ट्र. परंतु, जपानलाही अमेरिका कधी बाजूला सारेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे आता कुठे का होईना पण जपानने आपला मोर्चा युरोपियन राष्ट्रांकडे वळवल्याचं चित्र सध्या निर्माण होताना दिसत आहे. अमेरिकेकडून व्यापाराची शाश्वती नसल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जपानने आपला व्यापार कुठे वाढवता येईल आणि त्यानिमित्ताने कायदा आणि सुव्यवस्था कोणत्या ठिकाणी चांगली आहे, याचा अभ्यास सुरू केला होता. जगात सध्या मंदीचं वातावरण आहे. परंतु, ब्रिटनचा अपवाद सोडला, तर युरोपियन संघात तुलनेने स्थिती तशी चांगलीच आहे. याचाच फायदा जपानने घेण्याचा निर्णय घेतला आहे. जपानने युरोपियन संघाशी करार केला असून हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार असल्याचे म्हटले जात आहे. या कराराचा फायदा युरोपियन संघाला जसा होणार आहे, तसाच मोठ्या प्रमाणात याचा फायदा जपानलाही होणार आहे. युरोपियन संघाकडून जपानला कमी दरात वाईन, तर जपानकडून युरोपियन संघाला कमी दरात वाहने देण्यात येणार आहे. जपानचे वाहन उद्योगात असलेले प्राबल्य सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे येत्या काळात युरोपियन संघातल्या परिस्थितीचा आणि त्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या दर्जाचा विचार करून जपानकडून वाहने तयार करण्यात येणार आहे. अमेरिका-चीन यांच्यात सुरू असलेल्या व्यापारयुद्धात सध्या आयात शुल्क वाढवण्याची स्पर्धा जरी थांबली असली तरी, त्यातून अद्याप कोणताही मार्ग निघालेला नाही. त्यातच या स्पर्धेत युरोपियन संघ आणि जपानने आयात शुल्क कमी करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधला व्यापार वाढणार आहे. जपानमधीलही निर्यात वाढीस लागणार आहे. त्याचाच फायदा रोजगार वाढीसही होईल आणि जपानमधून युरोपीय संघातील देशांमध्ये निर्यात होणाऱ्या वाहनांवरील कर २०२७ पर्यंत शून्य टक्के होणार आहे. त्यामुळे जपानच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात एक टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार हे नक्की.
 

भारताचे काय?

 

एकीकडे जपानने युरोपियन संघात शिरकाव केला असला तरी, दुसरीकडे भारत आणि युरोपियन संघात सुरू झालेल्या बैठका आणि वाटाघाटी आता थंडावल्या आहेत. अर्थातच, इतर देशांच्या तुलनेत पाहिले तर भारतात आयात कर अधिक आहे आणि ते कमी करण्याचा भारताचा विचारही नाही. त्यामुळे याचा काहीसा फटका भारताला बसत आहे. सध्या जगाच्या जीडीपीचा विचार केला, तर यामध्ये सर्वाधिक वाटा हा सेवा क्षेत्राचा आहे आणि सर्वाधिक रोजगारही याच क्षेत्रातून निर्माण होत आहेत. भारत आणि युरोपियन संघातला व्यापार आणि गुंतवणूक करार पूर्ण झाल्यास दोन्ही अर्थव्यवस्थांसाठी ते फायद्याचे ठरणार आहे. त्यातच भारताला याचा अधिक फायदा होणार असून चीन आणि अमेरिकेतील कंपन्यांच्या तुलनेत भारतात निर्यात करणे युरोपियन संघाला फायदेशीर ठरेल. त्यातच व्यापाराशिवाय अन्य क्षेत्रातही याचा फायदा होण्याची शक्यता आहे. युरोपियन संघातील देशांकडून भारताला भांडवल किंवा नवे तंत्रज्ञान घेणेही शक्य होईल. त्याचप्रमाणे व्यापार वाढल्यामुळे रोजगार निर्मिती, कौशल्यविकास आणि भारताला आवश्यक गुंतवणूक असे सर्वच पर्याय खुले होतील. यातला भारतासाठी चिंताजनक मुद्दा एकच आहे आणि तो म्हणजे आयात शुल्काचा. व्यापार आणि गुंतवणूक करार पूर्ण झाल्यास भारताला आणि युरोपियन संघाला आयात शुल्क कमी करावे लागणार आहे. भारतात युरोपियन संघापेक्षा अधिक असलेला आयात दर हा चिंतेचा विषय आहे. जपान आणि युरोपियन संघात झालेल्या करारापासून भारताने काही गोष्टी आत्मसात करणे आज गरजेचे झाले आहे. जपान आणि युरोपियन संघाच्या करारामुळे अमेरिकेने धसका घेतला असून त्यांनीही जपानसोबत आज द्विपक्षीय करार करण्याची तयारी दाखवली आहे. त्यातच सद्यस्थिती जपानच्या बाजूने असल्यामुळे त्यातच जपानला युरोपियन संघातून मोठा फायदा मिळणार असल्यामुळे जपाननेही अमेरिकेशी होणारी द्विपक्षीय चर्चा तूर्त थांबवली आहे. जपानकडून अपेक्षित वस्तू खरेदी होणार असल्यानं युरोपिय संघाने अमेरिकेबरोबर करण्यात येणाऱ्या तडजोडी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात भारतानेही याचा विचार करणे अपेक्षित आहे. युरोपियन संघाशी करार झाल्यास आयात कर कमी करावा लागणार आहेच. तर भारतीय कंपन्यांनाही स्पर्धेत राहण्यासाठी आपला खर्च कमी करून आपली कार्यक्षमता वाढवण्यावर भर द्यावा लागणार, हे नक्की.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@