भाजप सरकार लोकाभिमुख आणि विकासाभिमुख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Feb-2019
Total Views |

 

 
 
 

राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांचे प्रतिपादन

 

नाशिक : लोकाभिमुख आणि विकासाभिमुख अशी भाजप सरकारची आजवरची वाटचाल आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांत भाजपचा जाहिरनामा हादेखील लोकसहभागातून साकार करण्याचे भाजपचे धोरण असून, त्यासाठी ‘भारत के मन की बात, मोदी के साथ’ या उपक्रमांतर्गत ‘सूचना पेटी’ साकारण्यात आली आहे. या पेटीत सर्व समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांनी दिलेल्या सूचनांचा अभ्यास करून त्यांचा समवेश असलेला जाहिरनामा भाजपतर्फे येत्या निवडणुकीत तयार करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी दिली. या उपक्रमांतर्गत देशभर जागृती अभियान राबविले जात असून त्याकरिता माहिती देण्यासाठी व या उपक्रमाचा नाशिकमध्ये शुभारंभ करण्यासाठी जाजू येथे आले होते. यावेळी वसंतस्मृती या भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली.

 

यावेळी भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार, आ. बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, लक्ष्मण सावजी,स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, भाजप गटनेते दिनकर पाटील, प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर, विजय साने आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना जाजू म्हणाले की, “भाजपमार्फत निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. तसेच, ‘मेरा परिवार भाजप परिवार’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार असून त्याअंतर्गत भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे आपल्या घरावर भाजपचा ध्वज फडकवून या अभियानास प्रारंभ करणार आहेत. यावेळी त्यांनी भाजपचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच, शासनाच्या योजनांमुळे फायदा झालेल्यांनी व भाजपवर विश्वास असणाऱ्या सर्व नागरिकांनी आपल्या घरावर भाजपचा ध्वज फडकवावा,” त्याचप्रमाणे दि. २६ फेब्रुवारी रोजी ‘कमल ज्योती संकल्प’ हा कार्यक्रम व दि. ३ मार्च रोजी सर्व विधानसभा मतदार संघात ‘युवा मोटरसायकल रॅली’चेदेखील आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधण्यावर आमचा भर आहे. जाहिरनामा निर्मितीचे काम केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पंतप्रधानदेखील त्यातील महत्त्वाचा घटक आहेत. या सूचना थेट त्यांच्यापर्यंत जाणार आहेत.

 

यावेळी सपा व बसपा यांच्या युतीबाबत जाजू म्हणाले की, “या युतीला मतदार चांगलेच ओळखून आहे, त्यांना एक नेता आणि एक विकासाभिमुख कार्यक्रम नाही. केवळ ‘मोदी हटाव’ या नकारात्मक धारणेवर ही युती झाली आहे.” तसेच, प्रियांका वडेरा यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत भाष्य करताना जाजू म्हणाले की, “त्यांच्या राजकारण प्रवेशामुळे काही एक फरक पडणार नाही. घराणेशाहीच्या परंपरेतील अजून एक घटक राजकारणात आला,” असे ते यावेळी म्हणाले. राज्यातील सेना-भाजप युतीबाबत बोलताना ते म्हणाले की, “सेना आमचा मित्र आहे. अपवाद वगळता आमची युती आजही आहे, लवकरच युतीबाबत निर्णय होईल,” असे ते यावेळी म्हणाले.

 

समाजातील विविध घटक आणि संघटना यांच्याशी थेट वार्तालाप करण्यावर भाजपचा भर असून बूथ पातळीवरील शक्तिकेंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

- श्याम जाजू, राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजप

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@