वॉचमन ते सुवर्णपदक विजेता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Feb-2019   
Total Views |

 

 
 
 
एक वॉचमन ते राष्ट्रीयस्तरावर युनी फाईट (कराटेचा एक प्रकार)मध्ये सुवर्णपदक विजेता या दोन टोकांचा प्रवीण रूपवते यांचा प्रवास प्रतिकूलतेवर मिळवलेला इच्छाशक्तीचा विजय आहे.
 

आसान हो न हो जिंदगी

ख्वाईशों का जूनून

सिकंदर चाहिये

 

प्रत्येक क्षण अटीतटीचा आणि आजचाच अशा आशयाने जगणे महत्त्वाचे. हे जगणे प्रवीण रूपवते क्षणाक्षणाला जगले. दिल्ली येथे नुकतीच ‘राष्ट्रीय युनीफाईट कराटे’ स्पर्धा झाली. त्या स्पर्धेत गोवंडीच्या प्रवीण रूपवते यांना सुवर्णपदक मिळाले. आता याच क्रीडाप्रकाराची आंतरराष्ट्रीय स्पर्धा रशियाला होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवीण रूपवते यांची निवड झाली आहे. प्रवीण रूपवते यांनी ही स्पर्धा कशी जिंकली? किंबहुना या स्पर्धेपर्यंत ते पोहोचले कसे? याचा मागोवा घेणे म्हणजे ‘नाही रे’ परिस्थितीवर विजय मिळवणाऱ्या माणसाचा शोध घेणे आहे.

 

रूपवते कुटुंब मूळ अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरच्या कुरण गावचे. १९८० च्या दशकात अहिलाजी आणि पत्नी रमाबाई रूपवते मुंबईला आले. रमाबाईने आनंदनगर खाडी परिसरात जागा पकडून झोपडीदादाला काही पैसे देऊन बारदानाचे घर थाटले. रमाबाईंवर घरची सर्व जबाबदारी. या दाम्पत्याला तीन मुले. त्यातला मोठा मुलगा प्रवीण. आई दगड फोडायला जायची, घरकाम करायची, रुग्णालयामध्ये चतुर्थ श्रेणी कामगारांची बदली कामगार म्हणून काम करायची आणि यावर घर चालले. या काळात रमाबाईंचे भाऊ खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिले. रमाबाईंचे उर फुटेपर्यंतचे कष्ट, वडिलांचे आणि वस्तीतील इतरही पुरुषांचे व्यसनी जगणे, पत्नीला मारझोड करून वर तिच्याच कष्टावर जगणे हे सगळे पाहत प्रवीण मोठे होत होते. आई म्हणायची, “बाबासाहेब कसे शिकले तसा शिक बाबा. बापासारखा होऊ नकोस.” बाबासाहेबांची गाणी, जलसे प्रवीण ऐकायचे. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या बाबासाहेबांच्या विचारांनी त्यांच्या आयुष्याची दिशा आणि दशा बदलली. प्रवीण म्हणतात, “बाबांनी सांगितले ‘शिका, संघटित व्हा’ म्हणजे आपल्या लोकांना धरून राहा. ‘संघर्ष करा’ म्हणजे आपल्या प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करा. या परिस्थितीवर मात करा.”

 

प्रवीण यांना खेळामध्ये खूप रस. त्यातच त्यांचा मित्र कराटे क्लासला जायचा. प्रवीणकडे क्लासचे शुल्कभरायलाही पैसे नव्हते. मग प्रवीण शिकता शिकता अर्धवेळ नोकरी करू लागले. त्यातून कोर्सचे शुल्क भरू लागले. शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द होती. पण आर्थिक तंगी, अभ्यास करायला जागा आणि वेळेचीही वानवा. त्यामुळे दहावीला ते चार वेळा नापास झाले. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी मार्ग बदलला. टिळक विद्यापीठातून ते शिकू लागले. पदवी शिक्षण घेता घेता ते नोकरी करू लागले. कराटेचा सरावही सुरू होताच. अशातच एका रात्री झोपडीचा पत्रा प्रवीण यांच्या डोक्यावर पडला. जखम झाली. जखम चिघळत गेली. जखमेमध्ये जंतुसंसर्ग झाला. त्यामुळे पूर्ण अंगभर फोड आले. नाका-कानातही फोड आले. त्यामुळे ऐकायला आणि श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. एका रात्री तर श्वासच कोंडला. रमाबाईंनी प्रवीणना रुग्णालयात नेले. रात्रीची वेळ. घरात विष खायला पैसा नाहीत. डॉक्टरने खंडीभर औषधे आणि इंजेक्शन लिहून दिली. त्यांनी सांगितले की, “याच्या नाकाच्या फोडांचे इन्फेक्शन डोळ्यामंध्ये जायच्या आत ते फोड आणि नाकाच्या आतल्या भागाची त्वचा काढायला हवी, आताच्या आता.” इतकी औषधं आणायची कुठून? त्यावेळी रमाबाई जे. जे. रुग्णालयामध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करत होत्या. मध्यरात्री त्या वस्तीतल्या मेडिकलवाल्याकडे गेल्या. त्याच्याकडे आपले कंत्राटी कामगार असल्याचे ओळखपत्र गहाण ठेवले आणि औषध घेऊन आल्या. तोपर्यंत प्रवीण तळमळत होते. ती औषधे घेऊन आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले. पूर्ण शुद्धीत असताना, कोणतीही भूल न देताच त्यांच्या नाकातले फोड आणि त्वचा खरडून काढण्यात आली. वेदनेमुळे प्रवीणच्या अश्रूंचा बांध फुटला होता. पण ती वेदना भूल न देता केलेल्या उपचाराची नव्हती. तर ती वेदना होती गरिबीमुळे मध्यरात्री आपल्या आईला अनन्वित त्रास सहन करावा लागला याची.

 

ती वेदना आयुष्याची प्रेरणा झाली. प्रवीण नव्या उमेदीने शिकू लागले. नोकरी करू लागले. कराटेचा सराव सोडला नव्हता. कराटेचा सराव करताना त्यांना सगळ्या गोष्टींचा विसर पडे. सराव करताना व्यवस्थित आहार करणे गरजेचे होते. पण प्रवीण घरी जो भाकर-तुकडा असे ते खाऊनच सराव करीत. कधी तेही नसे, तर पाणी पिऊन पोट बांधून सराव करीत असत. हा सराव ते कोणती स्पर्धा जिंकण्यासाठी नाही, तर आत्मिक समाधानासाठी करत. त्यांनी कराटे ब्लॅक बेल्ट मिळवला. ‘सावली’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून वस्तीमधील मुलांनाही ते युनीफाईट कराटे विनामूल्य शिकवू लागले. त्यांचे कितीतरी विद्यार्थी ब्लॅक बेल्ट स्तरापर्यंत गेले. पुढे त्यांचा परिचय ‘इंडियन शोतोकांत कराटे’ या संस्थेशी झाला. त्यामुळे खेळ हा भविष्य म्हणूनही खेळू शकतो, याची जाणीव झाली. तोपर्यंत ते गार्ड बोर्ड सिक्युरीटीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करू लागले होते. नोकरी करता करताच त्यांनी सोशल वर्क विषयात पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. पत्नीलाही बी. एडचे शिक्षण दिले. रशियाला स्पर्धेला जाण्यासाठी तयारी करणारे प्रवीण म्हणतात, “प्रत्येकामध्ये ऊर्जा आहे. त्या ऊर्जेला सकारात्मक विचारांची प्रेरणा मिळाली आणि व्यासपीठ मिळाले, तर कोणीही विघातक विचार करणारच नाही. जगामध्ये कोणाचीही ओळख ही गुणवत्ता आणि कार्यक्षमतेमुळेच निर्माण होते.”

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@