भाजपच्या झंझावातापुढे विरोधक हतबल!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Feb-2019   
Total Views |

 

 
 
 
ममता बॅनर्जी यांनी कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची सीबीआय अधिकारी चौकशी करणार असल्यावरून प्रचंड आकांडतांडव केले. तीन दिवस ‘धरणे’ धरण्याचे नाटक केले. यानिमित्ताने सर्व देश आपल्यामागे उभा राहील, असे त्यांना वाटले असावे! पण सर्वोच्च न्यायालयाने राजीव कुमार यांना सीबीआयपुढे जाण्याचा आदेश दिल्याने ममता बॅनर्जी यांच्या ‘धरणे’ कार्यक्रमातील हवाच निघून गेली.
 

लोकसभा निवडणुका घोषित होण्याआधीच प्रचारात भाजपने जी आघाडी घेतली आहे, ती पाहता विरोधक हतबल झाल्याचे दिसत आहे. काही तरी निमित्त काढून भाजपला अडचणीत आणण्याचे प्रयत्न विरोधकांकडून चालू असले तरी, त्या सर्वांना पुरून उरून, आपल्या ५५ महिन्यांच्या विकास कामांच्या बळावर भाजप मतदारांच्यापुढे आपली बाजू मांडत आहे. त्याउलट विरोधी पक्षांचा विचार केला, तर भाजपला सातत्याने विरोध करण्यापलीकडे त्यांच्याकडे काही कार्यक्रम आहे, असे दिसत नाही. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असोत किंवा आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू असोत किंवा कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी असोत, असे सर्व नेते भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यामध्ये विनाकारण वेळ वाया घालविताना दिसतात.

 

ममता बॅनर्जी यांनी कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची सीबीआय अधिकारी चौकशी करणार असल्यावरून प्रचंड आकांडतांडव केले. तीन दिवस ‘धरणे’ धरण्याचे नाटक केले. यानिमित्ताने सर्व देश आपल्यामागे उभा राहील, असे त्यांना वाटले असावे! पण सर्वोच्च न्यायालयाने राजीव कुमार यांना सीबीआयपुढे जाण्याचा आदेश दिल्याने ममता बॅनर्जी यांच्या ‘धरणे’ कार्यक्रमातील हवाच निघून गेली. असे असताना, ‘हा लोकशाहीचा विजय आहे’, ‘देशातील जनतेचा विजय आहे’, ‘हा घटनेचा विजय आहे’, अशी वक्तव्ये करून जनतेची सहानुभूती मिळेल असे गृहित धरून, आपली नाटकबाजी मागे घेत असल्याचे त्यांनी घोषित केले. अखेर पोलीस आयुक्त राजीव कुमार सीबीआयपुढे गेले. शारदा चीट फंड प्रकरणी त्यांची नेमकी भूमिका काय राहिली, त्याची चौकशी सीबीआयकडून करण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची सीबीआयने अनेक तास चौकशी केल्याचे पाहता संबंधित पोलीस अधिकाऱ्याचा व्यवहार संशयास्पद आहे, असे म्हणण्यास वाव आहे. शारदा चीट फंड घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसचे काही नेते अडकले आहेत. या घोटाळ्यामागील सत्य बाहेर येऊ नये म्हणून ममता बॅनर्जी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची पाठराखण तर करीत नव्हत्या? ममता बनर्जी यांच्या ‘धरणे’ कार्यक्रमात सर्व संकेत धाब्यावर बसवून ज्येष्ठ पोलीस अधिकारी सहभागी व्हावेत, याला काय म्हणावे?

 

राजीव कुमार प्रकरण गाजत असतानाच प. बंगालमधील नादिया जिल्ह्यातील हंशखली येथे तृणमूल काँग्रेसच्या एका आमदाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी पोलीस तपास चालू असून, काही जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यात तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. या प्रकरणात ममता बॅनर्जी यांचे एकेकाळी खंदे पाठीराखे असलेले पण आता भाजप नेते असलेले मुकुल राय यांचेही नाव गोवण्यात आले. ममता बॅनर्जी यांच्या सांगण्यावरून या हत्येत आपले नाव गोवण्यात आले असल्याचा आरोप मुकुल राय यांनी केला आहे. राज्यात भाजपचा जो प्रभाव वाढत चालला आहे, त्याचा धसका घेतल्याने त्या असे वागत आहेत. या हत्येची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही मुकुल राय यांनी केली आहे. सत्यजित विश्वास या तृणमूल काँग्रेस आमदाराची हत्या व्यक्तिगत द्वेषातून झाली असल्याचा संशय पोलीस आणि तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षी कालिपूजेच्या वेळी एका कार्यकर्त्यास आ. विश्वास यांनी मारहाण केली होती. त्या रागातून त्यांची हत्या झाल्याचीही चर्चा आहे. असे असताना भाजपची घोडदौड रोखण्यासाठी या हत्येत भाजप नेते मुकुल राय यांचे नाव गोवून ममता बॅनर्जी मोकळ्या झाल्या!

 

. बंगालमध्ये अशा घडामोडी घडत असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडलेल्या चंद्राबाबू नायडू यांनी आता नवी नाटकबाजी चालू केली आहे. आपले सासरे एन. टी. रामाराव यांनी आंध्रच्या अस्मितेच्या मुद्द्यावरून काँग्रेस राजवटीला उलथवून टाकले होते. आता सोयीचे राजकारण खेळणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांनी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करून आंध्रच्या जनतेच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न चालविला आहे. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी त्यांनी राजधानी दिल्लीत एक दिवसांचे उपोषण करण्याचा कार्यक्रम काल आयोजित केला होता. राजधानी दिल्लीतील आंध्र भवनात चंद्राबाबू यांच्या या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी नेहमीची नेतेमंडळी धावून गेली. त्यामध्ये राहुल गांधी, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांचा समावेश होता. हे सर्व पाहिले की, विरोधी पक्षात जी नेते मंडळी आहेत त्यांच्यापुढे कोणी धरणे धरले, उपोषण केले की धाव तिकडे, असा एकच कार्यक्रम आहे की काय,असे वाटू लागले आहे. चंद्राबाबू यांच्या या एक दिवसाच्या नाटकबाजीला पाठिंबा दर्शविण्यासाठी आंध्रमधून दोन रेल्वेगाड्यांतून पाठीराख्यांना आणण्यात आले होते.

 

ममता बॅनर्जी किंवा चंद्राबाबू नायडू ही मंडळी भाजप आणि मोदी यांची जितकी बदनामी करता येईल, तितकी करण्यात गुंतली असताना मोदी यांनी दक्षिणेकडील तीन राज्यांचा झंझावाती दौरा करून विरोधकांचा खोटारडेपणा उघडा पाडला आहे. आंध्र प्रदेशला केंद्राकडून जो प्रचंड पैसा देण्यात आला, त्याचा हिशेब मागितल्याने चंद्राबाबू राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू आणि त्यांचा मुलगा लोकेश यांचे ‘बाप-बेटे के सरकार’ असल्याची टीका त्यांनी केली. जनतेच्या नव्हे, तर आपल्या मुलाच्या उत्कर्षाकडेच चंद्राबाबू यांचे लक्ष असल्याची टीका त्यांनी केली. चंद्राबाबू नायडू यांची खिल्ली उडविताना, आघाड्या बदलणारे, महागठबंधन बनविणारे, आपल्या सासऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसणारे आणि निवडणुकांमागून निवडणुका हरणारे असे तेसर्वात ज्येष्ठ राजकारणी’ आहेत, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

 

याच दौऱ्यात मोदी यांनी, कर्नाटकमधील हुबळी येथे झालेल्या सभेत कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची अवस्था एखाद्या ‘पन्चिंग बॅग’प्रमाणे कशी झाली आहे, त्याकडे जनतेचे लक्ष वेधले. कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकारची हतबलता पाहता देशाला ‘मजबूर सरकार’ हवे की, ‘मजबूत सरकार’ हवे, असा प्रश्न त्यांनी जनतेला केला. केंद्रात ‘मजबूर सरकार’ असेल, तर आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची पत राहणार नाही, हेही त्यांनी जनतेच्या लक्षात आणून दिले. आपल्या ‘इंद्रधनुष्यी महागठबंधना’च्या माध्यमातून कर्नाटक सरकारसारखे ‘मजबूर सरकारचे प्रारूप’ देशावर लादण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत, अशी टीका मोदी यांनी केलीआंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांना विरोध करण्यासाठी तेलुगू देसमने निषेधाचे कार्यक्रम योजिले होते. ‘मोदी गो बॅक’ असे फलक झळकविल्याबद्दल तेलुगू देसमच्या कार्यकर्त्यांना ‘मी दिल्लीला जात आहे आणि पुन्हा पंतप्रधान बनणार आहे. आपल्याला भविष्यात काय घडणार याची आधीच चाहूल लागली असल्याबद्दल आपला आभारी आहे,’ असे सांगण्यास मोदी विसरले नाहीत! ममता बनर्जी, चंद्राबाबू नायडू, कुमारस्वामी, राहुल गांधी आणि आता त्यांच्या भगिनी प्रियांका वडेरा यांच्यासह अन्य विरोधी नेते भाजपच्या विरोधात रान उठविण्याचा प्रयत्न करीत असले तरी, भाजपच्या झंझावातात त्यांचा टिकाव लागताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@