'त्रिवेणी साहित्य संगमा'स वाईकरांचा भरभरून प्रतिसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Feb-2019
Total Views |



वाई : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मराठी भाषा विभागातर्फे वाई (जि. सातारा) येथे आयोजित दोनदिवसीय 'त्रिवेणी साहित्य संगमा'ला वाईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित या संमेलनाचा रविवारी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे व साहित्यिका डॉ. अरूणा ढेरे यांच्या उपस्थितीत समारोप झाला.

 

वाईतील द्रविड हायस्कूलच्या पटांगणावर पार पडलेल्या या त्रिवेणी साहित्य संगमाच्या समारोप कार्यक्रमाला व्यासपीठावर डॉ. आगाशे, अरूणा ढेरे यांच्यासह विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर, विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव शामकांत देवरे उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी आपल्या खुमासदार शैली व निरनिराळ्या किस्से आणि रोखठोक टोल्यांनी युक्त भाषणाने उपस्थितांची दाद मिळवली. ते म्हणाले की, गदिमा, बाबुजी यांच्याकडे प्रचंड शब्दसंपदा होती. त्यामुळे ते जर शाळेत गेले असते तर त्यांनी कदाचित शिक्षकांना बेजार करून सोडले असते. त्यामुळे त्यांनी लहानपणी शाळा सोडली, हे एका अर्थी बरेच झाले. संवेदनशील कलेपुढे बुद्धीला शरणागती पत्कारावी लागते, असेही मत आगाशे यांनी व्यक्त केले. अवांतर उपक्रम म्हटले जाणाऱ्या सर्व कला या कुठल्या ना कुठल्या संवेदना जागृत करतात. दिवसातील थोडा तरी वेळ आपण ज्यासाठी जगतो, त्यासाठी दिला तर जीवन कसे अर्थपूर्ण बनते, हे मी गदिमा-पुल-बाबुजी या त्रयींकडून शिकलो, असे आगाशे यांनी सांगितले. खरा मोठा माणूस हा किती साधा असतो, हे या तिघांनी दाखवून दिल्याचे ते यावेळी म्हणाले.

 

कार्यक्रमाच्या उद्घाटनापासून दोन्ही दिवस कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या डॉ. अरूणा ढेरे यांनी यावेळी सांगितले की, हा कार्यक्रम केवळ आठवणींचा नाही. आजच्या काळात आपण काय गमावले व ते परत कसे आणता येईल याचा विचार करण्याचा आहे. दोन दिवसीय कार्यक्रमात अनेकदा सुनीताबाई देशपांडे यांचा उल्लेख झाला. परंतु, ललिताबाई फडके आणि विद्याबाई माडगूळकर यांचाही उल्लेख व्हायला हवा होता. त्यांनी आपल्या पतीला दिलेल्या पाठिंब्याचे मोल खूप मोठे असल्याची भावना डॉ. ढेरे यांनी व्यक्त केले. दिलीप करंबेळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी करंबेळकर यांनी या त्रिवेणी साहित्य संगमास वाईकरांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आभार मानले. नवीन पिढीला या त्रयींचा वारसा मिळण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्वाचा असल्याचे ते म्हणाले.

 

वाईकरांचा उदंड प्रतिसाद

 

संपूर्ण दोन दिवस राज्य शासनस्तरावरील एवढा मोठा कार्यक्रम वाईमध्ये झाल्याबद्दल वाईकरांनी आनंद व्यक्त केला. त्रिवेणी साहित्य संगम सुरू होण्यापूर्वीपासूनच वाईत या अनोख्या कार्यक्रमाबद्दल चर्चा होत होती. आजकालच्या घाईगडबडीच्या काळातही या दोन दिवसीय भरगच्च कार्यक्रमातील प्रत्येक सत्रात वाईतील शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, आर्थिक क्षेत्रातील मंडळी आदींसह विविध क्षेत्रातील रसिकांची लक्षणीय उपस्थिती होती. विश्वकोश मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी घेतलेली अथक मेहनत, केलेले नेटके व वक्तशीर नियोजन यांचेही उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@