इसिसचे समूळ उच्चाटन शक्य?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 

 
 
 
इस्लामिक राज्य अर्थात ‘इसिस’ म्हणजे एक स्वयंघोषित खिलाफतच. हे स्वयंघोषित राज्य आणि जगजाहीर असलेली दहशतवादी संघटना ‘इसिस’ २००४ पासूनच इराक आणि सीरिया या देशांमध्ये तग धरून बसली आहे. त्यामुळे आता या संघटनेचे समूळ उच्चाटन करावे, असा काहीसा पवित्रा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला. एका आठवड्यातच ‘इसिस’चे अस्तित्वच नष्ट होईल, अशा घोषणाही ट्रम्प यांनी आपल्या एका मुलाखतीत केल्या. खरेतर गेली दोन वर्षे अमेरिकेचे सैन्य या दहशतवादी संघटनेच्या क्रूर विचारसरणीशी सामना करीत आहे, असे म्हणायला हरकत नाही. मात्र, नुकतेच अमेरिकेने सीरियामधील आपले सैन्य परत बोलावले. त्यामुळे ट्रम्प यांचा हा निर्णय उतावळेपणाने तर घेतलेला नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र, ट्रम्प यांनी सद्यपरिस्थितीत इराक व सीरियात ‘इसिस’च्या ताब्यात केवळ एक टक्का जमीन आहे, असा दावाही केला. हा दावा खरा असला तरी, ‘इसिस’चे समूळ उच्चाटन होणं थोडं अवघड आहे.
 

२००४ पासून इराक आणि सीरिया या दोन्ही देशांतील मोठ्या भूभागावर ‘इसिस’चे नियंत्रण आहे. आधी अल-कायदा आणि ‘इसिस’ एकच असल्यामुळे २००४ ते २०१३ च्या दरम्यान ‘इसिस’च्या कुरघोडी या तुलनेने कमी होत्या. मात्र, २०१४ साली ‘इसिस’ अल-कायदामधून वेगळी झाली. अबू बक्र अल-बगदादी या ‘इसिस’च्या म्होरक्याने इस्लामिक खिलाफतीची घोषणा केली व स्वत:ला खलिफा जाहीर केले. त्याचवर्षी या हिंसक संघटनेने इराक आणि सीरियामध्ये थैमान घालण्यास सुरुवात केली व इराकमधील सर्वात मोठे शहर मानल्या जाणाऱ्या मोसुल या शहरावर ताबा मिळवला. जणू त्यांच्यात दहा हत्तींचे बळ आले आणि त्यांनी जगभरात आपल्या कारवाया करण्यास सुरुवात केली. त्यामुळेच भारत, अमेरिका, रशिया, युरोपियन संघ इ. प्रमुख देशांनी ‘इसिस’ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. मात्र, त्यांना असलेला बोको हराम, तालिबान इ. इतर मुस्लीम दहशतवादी संघटनांच्या पाठिंब्यामुळे दिवसागणिक ‘इसिस’चे जाळे पसरत आहे. यामुळेच गेल्या वर्षी ‘इसिस’विरुद्ध लढा पुकारण्यासाठी जागतिक आघाडी उघडण्यात आली आणि ‘इसिस’विरोधात जागतिक आघाडीतील बैठकीसाठी ८० देशांचे मुत्सद्दी संरक्षण विभागात एकत्र आले. मात्र, ‘इसिस’मुळे हे एक बरे झाले की, त्यांच्या वाढत्या कारवायांमुळे जागतिक आघाडी तरी आकारास आली.

 

ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या प्रशासनाने स्वीकारलेल्या आक्रमक धोरणामुळे अमेरिकी सैन्यापुढे ‘इसिस’ नतमस्तक होईलच. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे, गेल्या दोन वर्षांत अमेरिका व सहकारी देशांनी ‘इसिस’कडून इराक आणि सीरियामधील सुमारे २० हजार मैल जमीन परत ताब्यात घेतली. एवढेच नाही, तर अमेरिकी सैन्याच्या आक्रमक धोरणांमुळे ‘इसिस’मधील अंतर्गत वादालाही तोंड फुटले. त्यामुळे ‘इसिस’ आपल्या शेवटच्या घटका मोजत असल्याचा दावा अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने केला. काही दिवसातच सीरियात‘इसिस’ने अमेरिकेच्या चार नागरिकांना मारत, ‘हम अब तक जिंदा है’ असा पलटवार केला. त्यामुळे ट्रम्प यांचा ‘इसिस’ संपवण्याचा मनसुबा पूर्ण व्हावा, अशी सर्वांची इच्छा असली तरी, ते काम एका आठवड्यात होणार नाही. कारण, आजही अफगाणिस्तान, लिबिया, सिनाई व पश्चिम आफ्रिकेतील काही भागांमध्ये तर मध्य पूर्वेसोबतच युरोपियन देशांमध्येही ‘इसिस’चे अतिरेकी कार्यरत आहेत. त्यामुळे ट्रम्प यांनी ‘इसिस’चे समूळ उच्चाटन करण्याच्या घोषणा या त्यांच्या धोरणांसारख्या बोगस आहेत की काय, असे वाटायला लागते. यासंबंधी अमेरिकेच्याच एका इंग्रजी वृत्तपत्रात संयुक्त राष्ट्रांचा जागतिक सुरक्षा अहवाल जाहीर करण्यात आला होता. या अहवालानुसार ‘इसिस’कडे ३०० कोटी डॉलर्सपेक्षा अधिक रक्कम असून, इराक आणि सीरियामध्ये सुमारे १८ हजार दहशतवादी अजूनही कार्यरत आहेत. तीन हजारांहून विदेशी लढाऊ विमानेही आहेत आणि याच अहवालानुसार ‘इसिस’ची सध्याची परिस्थितीही पाहता त्यांना हरविणे थोडे कठीण आहे, असेही स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे ट्रम्प यांनी केवळ ढोबळमानाने जाहीर केलेले हे धोरण कितपत शक्य आहे, हे येत्या आठवडाभरात कळेलच.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@