जल बचतीसाठी नवी दृष्टि देत 'जलसंवाद- २०१९' चा उत्साहात समारोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2019
Total Views |

 
कवयित्री बहिणाबाई चौधरी उ.म. विद्यापीठात १ फेब्रुवारी, शुक्रवार रोजी 'जलसंवाद- २०१९' हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे रा. स्व. संघाचे सरकार्यवाह मा. भैय्याजी जोशी उपस्थित होते. तसेच विद्यापीठाचे कुलगुरु व कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.पी. पाटील, रा.स्व. संघ देवगिरी प्रांत संघचालक मधुकर जाधव, डाॅ. एस. एन. पाटील, प्रा. डाॅ. एस. टी. इंगळे, पश्चिम क्षेत्र सेवा प्रमुख प्रा. डाॅ. उपेंद्र कुलकर्णी व महात्मा फुले कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज कंक आदी मान्यवर उपस्थित होते. महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान, औरंगाबाद व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. एस. एन. पाटील यांनी पाण्याचे प्रश्न, समस्या व म. फुले कृषी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. तसेच या कार्यक्रमामागील जलसंवादविषयक भूमिका देवगिरी प्रांत जलपरिषद प्रमुख सर्जेराव वाघ यांनी मांडली. याप्रसंगी सेवावर्धिनी या संस्थेची पुस्तिका 'जलमंथन' व दै. तरुण भारतचा विशेषांक 'जलसंवाद'चे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच जलविषयात विशेष कार्य करणा-या जलसेवकांचा सत्कार करण्यात आला.
 
 
उपस्थित मान्यवरांपैकी उपेंद्र कुलकर्णी यांनी आपल्या प्रबोधनात पाण्याचे दूर्भिक्ष्य व त्यावरील उपाययोजनांचे महत्व विशद केले तर, प्रा. पी. पी. पाटील यांनी जलसंधारणाची गरज मांडत केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात निर्माण झालेली जलसमस्या मांडत जल संधारणाचे महत्व विशद केले. तसेच जलविषयक कार्य करताना जलसंवाद व जल परिषदेसोबत विद्यापीठ सदैव मदतीसाठी तत्पर राहील असे आश्वासन त्यांनी दिले.
 
 
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात विविध विषयांवर संवादसत्र आयोजित केले होते. त्यापैकी पहिल्या संवादसत्रात डाॅ. दत्तात्रय रेगुलवार यांनी 'वातावरणातील बदलांमुळे पर्जन्यावर होणारे परिणाम' या विषयावर आपले मत मांडले. तसेच श्याम लोहार यांनी 'भूआच्छादन व भू वापर', उल्हास परांजपे यांनी 'कमी किंमतीत पाणी साठवण, कमी किंमतीचे बंधारे निर्मिती' या विषयावर तर, अरुण घाटे यांनी 'फेरोसिमेंट बंधारा' या विषयावर मार्गदर्शन केले. दुपारच्या संवाद सत्रात राजेंद्र दहातोंडे यांनी 'नेसू नदी, नंदूरबार' यावरील केस स्टडी सादर केला तर पुढील सत्रात सागर धनाड यांनी 'माथा ते पायथा काम केल्याने होणारे बदल व पाण्याचा ताळेबंद' या विषयावर आपले विचार मांडले. तसेच या पुढील सत्रात ज्येष्ठ जलविषयक कार्यकर्ते वसंतराव ठाकरे यांनी पाण्याबाबत संवेदनहिन समाजाला आपल्या परखड वाणीतून जागृत करण्याचा प्रयत्न केला. आपले अनुभवही मांडले. तर पी.पी. माहुलीकर यांनी जलसंवर्धन व जलजागृतीचे महत्व विशद करत जलसंवाद- २०१९ या कार्यक्रमाचे विद्यापीठातर्फे आभार व्यक्त केले.
 
 
कार्यक्रमाच्या समारोपापूर्वी उपस्थितांसोबत प्रश्नोत्तराचे सत्र ठेवण्यात आले होते. समारोपाचे भाषण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रा.स्व. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या भाषणाने झाले. 'भविष्यातला भारत सुजलाम सुफलाम ठेवायचा असेल तर दूरदृष्टी ठेवून उपाययोजना करण्यासाठी आता सर्व समाज पुढे आला पाहिजे. जे पुढे येत आहेत त्यांना मदत व प्रोत्साहन दिले पाहिजे. लोकांना आपण निवडलेल्या मार्गाविषयी विश्वास निर्माण करुन देता आला पाहिजे. तसेच भगिरथाप्रमाणे आपले कार्य यश मिळेपर्यंत चिकाटीने चालू ठेवले पाहिजे. येथे उपस्थित सर्व जलदूत हे भगिरथच आहेत. त्यांना एक दिवस जरूर यश मिळेल.' असा आशावाद व्यक्त करीत त्यांनी आपल्या भाषणास विराम दिला.
 
 
विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात शेकडो उपस्थितांच्या व जलसेवकांच्या साक्षीने जलसंवाद - २०१९ हा उपक्रम उत्साहात केवळ पारच पडला असे नव्हे तर सर्वाना तो अन्तर्मुखही करून गेला .
@@AUTHORINFO_V1@@