पाणी मिळणं हा सजिवांचा अधिकार, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही - भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2019
Total Views |

 
भविष्यातला भारत सुजलाम सुफलाम ठेवायचा असेल तर दूरदृष्टी ठेवून उपाययोजना करण्यासाठी आता समाज पुढे आला पाहिजे. लोकांना आपण निवडलेल्या मार्गाविषयी विश्वास निर्माण करुन देता आला पाहिजे. भगिरथाप्रमाणे आपले कार्य यश मिळेपर्यंत चिकाटीने चालू ठेवले पाहिजे. यश आपल्याच हाती आहे, असे प्रतिपादन रा.स्व.संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले. महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान (औरंगाबाद) व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगांव) आयोजित 'जलसंवाद- २०१९' या जलविषयक कार्यक्रमात जळगांव येथे ते बोलत होते.
 
कार्यक्रमास उपस्थित असलेल्या आणि जलविषयात कार्य करणा-या जलसेवकांना उद्देशून भैय्याजी म्हणाले की , 'ढग हे आकाशावरील जलदूत असून आपण जमिनीवरील जलदूत आहात. आता आकाशातील जलदुताची जमिनीवरील जलदुताशी मैत्री झाली पाहिजे'. जलव्यवस्थापनातील त्रुटींमुळे व जलसमस्येचे गांभीर्य नसल्यामुळे आज पाणी समस्या बिकट बनत चालली आहे. जे जे सजीव या पृथ्वीवर आहेत त्यांना सर्वांना पाणी मिळणं हा त्यांचा अधिकार आहे. तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. पण आज पाणी विकत घेण्याची वेळ येणं ही दुर्दैवी बाब आहे.
 
एकूणच जलसंवाद या कार्यक्रमाकडे बघितले तर हा 'पाणी शोधण्यासाठी केलेला उपक्रम' असल्याचे लक्षात येते. तसेच जलजागृतीसाठी उचललेले हे सकारात्मक पाऊल आहे. पाणी हे पंचमहाभूतापैकी एक तत्व आहे. त्यामुळे त्याच्याशिवाय मानवाचे जगणे अशक्यप्राय आहे. पंचमहाभूतापैकी एकाही तत्वाविना मानवी जीवन अपूर्ण असून त्यांच्या अस्तित्वाशिवाय सजिवांचे अस्तित्व राहणे दुरापास्त आहे. परंतु, नुसतेच अस्तित्वात राहून उपयोग नाही तर त्यांची उपलब्धता मुबलक प्रमाणात असावयास हवी. कमी झाल्यास तुटवडा निर्माण होतो तर वाढ झाल्यास हानी होते. त्यामुळे पंचमहाभूतांचा समतोल अबाधित असणं गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
 
पाण्याबरोबरच वृक्षसंवर्धन व वृक्ष लागवड करताना भैय्याजींनी जळगांवच्या जैन उद्योग समुहाचे कौतुक करीत त्यांनी केलेल्या वृक्षारोपणामुळे त्या भागात आज चांगला पाऊस पडताना दिसून येतो. यावरुन पाणी आणि वृक्षांचा संबंध लक्षात घेतला पाहिजे. जल संवर्धनासोबत वृक्षसंवर्धनही झालं पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
 
आजच्या शिक्षणप्रणालीतूनच सर्व काही साध्य होईल असे अजिबात नाही, असे सांगताना त्यांनी झाबूआ जिल्ह्यातील एका शिवगंगा नामक प्रकल्पाचे उदाहरण दिले. जिथे एकही पदवी मिळवलेली किंवा इंजिनियरिंग करून काम करणारी व्यक्ती नाही. परंतु, सगळे आपल्या कामात तज्ञ आहेत व हा प्रकल्प आज देशाची ओळख निर्माण करीत आहे. त्यामुळे उच्चशिक्षीत नसले तरी चालतील , परंतु अनुभवाने अत्यंत हुशार असलेल्या लोकांना हाताशी घेऊन मोठमोठे प्रकल्प व अभियान साध्य करता येऊ शकतात. सगळ्या सोयी सुविधा मिळण्यासाठी सरकारवर अवलंबून राहणं योग्य नाही. शासनाकडून मदत मिळवून लोकसहभागातून कामं झाली पाहिजे. ब-याच ठिकाणी शासनाने केलेल्या कामावर लोकांची अनास्था दिसून येते. म्हणून लोकसहभाग महत्वाचा आहे. आजकाल लोकसहभागातून अनेक प्रकल्प यशस्वी होताना दिसून येत आहेत. अजूनही बरेच लोक जनजागृतीतून पुढे येत आहेत. त्यांच्या कृतीला समर्थन करीत मदतीसाठी पुढे आले पाहिजे  असेही ते म्हणाले.
 
देशातील सप्तगंगा म्हणजेच गंगा, गोदावरी, यमुना, सरस्वती, कावेरी व नर्मदा या नद्या एकमेकीना जोडल्या गेल्या तर देशातील पाणीप्रश्न कायमचा मिटू शकतो. हे काम धाडसाचे आहे. वेळखाऊ आहे. पण प्रभावी आहे, असेही मत त्यांनी मांडले.
 
पाण्याचा होणारा अपव्यय व रासायनिक खतांचा पाण्यावर होणारा परिणाम सांगताना भैय्याजी म्हणाले की, आज ब-याच ठिकाणी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, परंतु, त्याचा होणारा अपव्यय काळजी निर्माण करणारा आहे. हवे तेवढेच पाणी आपण जर वापरले तर खूप मोठा पाणी अपव्यय टाळला जाऊ शकतो व पाणी बचत होऊ शकते.
 
 
हरितक्रांतीमुळे अनेक फायदे जरुर झाले. पण हरितक्रांतीमुळे संकरित बीज आले. त्यासोबत रासायनिक खतं पुढे आले व त्याच्या वाढीतून अनावश्यक किटकांचा नाश करण्यासाठी किटकनाशकं आली. या सगळ्यातून मिळालं काय तर विषारी अन्न व नवनवीन आजार. त्यामुळे सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले पाहिजे यावर त्यांनी विशेष भर दिला.
 
भविष्यातील भारत सुजलाम सुफलाम ठेवायचा असेल तर दूरदृष्टी ठेऊन उपाययोजना करण्यासाठी आता सर्व समाज पुढे आला पाहिजे. जे पुढे येत आहेत त्यांना मदत व प्रोत्साहन दिले पाहिजे. लोकांना आपण निवडलेल्या मार्गाविषयी विश्वास निर्माण करुन देता आला पाहिजे. तसेच भगिरथाप्रमाणे आपले कार्य यश मिळेपर्यंत चिकाटीने चालू ठेवले पाहिजे. येथे उपस्थित सर्व जलदूत हे भगिरथच आहेत. त्यांना एक दिवस जरूर यश मिळेल असा आशावाद व्यक्त करीत त्यांनी आपल्या प्रबोधनाला विराम दिला.
@@AUTHORINFO_V1@@