भारताची शूटिंग गार्ड प्रशांती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



ज्या खेळाचं भारतात अस्तित्व अगदी नगण्य आहे, अशा भारतीय बास्केटबॉल संघाची कर्णधार, ‘अर्जुन’ आणि यंदाच्या ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झालेल्या प्रशांती सिंहची कहाणी...


शहर का तब्दील होना शाद रहना और उदास ।

रौनके़ं जितनी यहां है औरतों के दम से है॥

 

मुनीर नियाज़ी यांची ही शायरी खरंतर खूप काही सांगून जाते. पण, त्यातच महिलांचे चौकटीत असलेले आयुष्यही दाखवते. आजवर अनेक महिलांनी या चौकटी मोडून आपल्याला हवं ते केलं, शेवटी ‘उमीद पे दुनिया कायम है।’ अशीच एक चौकटी बाहेर, आपल्याला हवं ते करणारी आणि भारताच्या महिला बास्केटबॉल संघाची कर्णधार प्रशांती सिंह. ज्या खेळाचं भारतात अस्तित्व नगण्य होतं, त्या खेळात प्रशांतीने भारताचं प्रतिनिधीत्व करत भारतीय महिला फुटबॉल संघाला ‘फिफा बास्केटबॉल चॅम्पियन’ खेळात पाचवा क्रमांक मिळवून दिला. हे स्थान आतापर्यंत भारताचे सर्वोत्कृष्ट स्थान ठरले आहे. अशा या भारताच्या ‘शूटिंग गार्ड’ला यंदाचा ‘पद्मश्री’ जाहीर झाला आहे. याआधी २०१७ साली प्रशांतीला ‘अर्जुन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बास्केटबॉल या खेळाकरिता असे हे दोन पुरस्कार मिळवणारी प्रशांती ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. बास्केटबॉल आणि त्यातही महिला संघाची कर्णधार या गोष्टींचं आपल्याला अप्रूप वाटतं; त्याचप्रमाणे तिच्या १५ वर्षांची कारकिर्द पाहिली की वाटतं, बास्केटबॉल म्हणजे पाश्चिमात्य देशांची मक्तेदारी असलेला खेळ. आश्चर्य वाटेल पण, भारतात १९३०मध्ये हा खेळ सर्वात प्रथम खेळला गेला. त्यानंतर प्रशांतीसारख्या खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी ‘बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया’ची स्थापना झाली. एवढी सगळी सोय असूनही प्रशांतीला तिच्या नातेवाईकांनी ‘तू क्रिकेट खेळ, म्हणजे प्रसिद्धी मिळेल,’ असे बिनबुडाचे सल्लेही दिले. मात्र, बास्केटबॉलवर असलेलं प्रेम प्रशांतीला अडवू शकलं नाही.

 

उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे अगदी मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या प्रशांतीला तीन बहिणी आहेत. प्रशांती ज्या परिसरात राहत होती, तिथे मुलींनी असे खेळ खेळणे मान्यच नव्हते आणि त्यात बास्टेकबॉल हा पुरुषी खेळ, अशी लेबलं लावली जायची. तरी प्रशांतीची मोठी बहीण दिव्या सिंह हिने मुलांसोबत बास्केटबॉलचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. तिच्या प्रशिक्षणादरम्यान प्रशांती नेहमीच तिच्या सोबत जायची आणि त्यातूनच तिला बॉस्केटबॉल खेळाची आवड निर्माण झाली. घराशेजारी असलेल्या उदय प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच तेथे जवळच एक ‘स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया’चे एक प्रशिक्षण केंद्र होते. मात्र, या केंद्रात फक्त मुलांना बास्केटबॉलचे प्रशिक्षण दिले जात होते. या प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक होते ते भारतीय संघाचे तत्कालिन प्रशिक्षक अमरजित सिंह. त्यांनी प्रशांतीचा खेळ पाहताच, तिने आपल्या प्रशिक्षण क्रेंद्रातूनच प्रशिक्षण घ्यावे, म्हणून प्रशांतीच्या घरी जाऊन, तिच्या घरच्यांना तिला बास्केटबॉल खेळण्यासाठी पाठवावे, अशी विनंती केली. महाविद्यालयाच्या मैदानापासून ते बास्केटबॉल कोर्टपर्यंतच्या प्रशांतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. प्रशांतीच्या मते, "हा निर्णय माझ्या घरच्यांसाठी सोप्पा नव्हता. कारण, माझी बहीण आधीच बास्केटबॉल खेळत होती. त्यामुळे मलाही प्रशिक्षण देणं, त्यांच्या बजेटमध्ये नव्हतं. पण, त्यांनी मला अडवलं नाही. आपल्याकडे पालक मुलांचे पंख छाटतात, त्यामुळे मुले उडूच शकत नाही."

 

२००२ साली प्रशांतीने भारतीय महिला बास्केटबॉल संघात प्रवेश केला आणि त्याचवर्षी ती या संघाची कर्णधार झाली. कर्णधार म्हणून प्रशांतीने २००९ साली झालेल्या आशियाई खेळात भारताला रौप्यपदक मिळवून दिले. प्रशांती सिंह ही एकमेव अशी खेळाडू आहे, जिने दोन आशियाई आणि एक राष्ट्रकुल स्पर्धेतभारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. प्रशांतीही भारताच्या चौथ्या क्रमांकाची ’ए’ श्रेणी असलेली खेळाडू आहे. २०११ साली झालेल्या ‘आशियाई बीच गेम्स’मध्ये तिने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. बास्केटबॉल खेळणाऱ्या किंवा खेळू इच्छिणा़ऱ्या अनेक मुलींसाठी प्रशांती प्रेरणास्थानी आहे. ३६ वर्षीय प्रशांतीला यंदाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर "हा सन्मान माझ्यापेक्षा देशातील स्वप्न पाहणाऱ्या आणि ती पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक मुलीचा आहे. मला माहीतही नव्हतं की, हा पुरस्कार मला मिळेल. आपल्याकडे बास्केटबॉल या खेळाला प्रोत्साहन दिले जाते याचा आनंद वाटतो," अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. प्रशांतीला याआधी २०१६ साली उत्तरप्रदेश सरकारकडून दिला जाणारा ‘राणी लक्ष्मीबाई पुरस्कार,’ तर त्याचवर्षी ‘पूर्वांचल रत्न पुरस्कारा’नेही सन्मानित करण्यात आले होते. एकीकडे सरकार खेळाडूंकडे लक्ष देत नाही, अशी टीका करणारा एक वर्ग असतो, तर दुसरीकडे प्रशांती म्हणते की, "एवढ्या मोठ्या देशात सरकार प्रत्येक मुलाकडे लक्ष देईल किंवा प्रत्येक खेळाडूकडे लक्ष देईल ही अपेक्षाच मुळात हास्यास्पद आहे. त्यामुळे सरकारला दोष देण्यापेक्षा, तुम्ही स्वत: आपल्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करावे. कोणत्याही खेळात पुढे जाण्यासाठी केवळ त्या खेळाची साधने असणे गरजेचे नसते, तर समर्पण आणि काहीही करण्याची तयारी असणे गरजेचे असते." घराशेजारील एका लहान मैदानापासून ते बास्केटबॉल कोर्टपर्यंत प्रवास करत, अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या ‘पद्मश्री’ पुरस्कार विजेत्या या भारताच्या या प्रशांती सिंहला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून आभाळाएवढ्या शुभेच्छा...!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@