अखेर माय-लेकराची ताटातूट ; 'त्या' पिल्लाची आई सापडण्याची शक्यता धूसर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2019   
Total Views |

tiger_1  H x W:


येऊरच्या पिल्लाचा बोरिवली नॅशनल पार्कमध्ये सांभाळ

 

मुंबई (अक्षय मांडवकर) - गेल्या आठवड्यात ठाण्यातील येऊर वनपरिक्षेत्रात सापडलेले बिबट्याचे पिल्लू पुन्हा त्याच्या आईच्या कुशीत विसवण्याची शक्यता धूसर झाली आहे. येऊरच्या वनाधिकाऱ्यांना गेल्या चार दिवसांमध्ये या पिल्लाचा आईचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे आता आईविना पोरक्या झालेल्या या पिल्लाला जगवण्याचे आव्हान 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील अधिकाऱ्यांसमोर असून याठिकाणीच त्याची आजन्म देखभाल करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

 

येऊर वनपरिक्षेत्रातील वायू दलाच्या उपकेंद्राजवळ बुधवारी पहाटे पादचाऱ्यांना बिबट्याचे एक नवजात पिल्लू आढळून आले होते. वनाधिकाऱ्यांनी पिल्लाला ताब्यात घेऊन त्याला पुन्हा आईकडे सुपूर्द करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी बुधवार आणि गुरुवारी रात्री या पिल्लाला ते सापडलेल्या ठिकाणी ठेवून त्याची आई येण्याची वाट पाहण्यात आली. मात्र, बुधवारी रात्री पिल्लाची पाहणी करुन गेलेली आई गुरुवारी रात्री परतलीच नाही. यादरम्यान पिल्लाची प्रकृती ढासळत गेली. त्यामुळे शुक्रवारी वनाधिकाऱ्यांनी येऊरमध्ये एखाद्या मादी बिबट्याचा वावर आढळून आल्यानंतरच पिल्लाला सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता पिल्लू सापडलेल्या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. मात्र, गेल्या चार दिवसांमध्ये या परिसरात बिबट्याचा वावर आढळून न आल्याचे येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी सांगितले आहे. शुक्रवारीपासून या परिसरात आम्ही तीन कॅमेरा ट्रॅपच्या आधारे पाळत ठेवली होती. परंतु, एकही बिबट्या फिरकला नसल्याची माहिती पवार यांनी दिली.

 
 

यादरम्यान पिल्लांचे संगोपन 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीअंतर्गत केले जात आहे. साधारण दोन आठवड्याच्या या नर पिल्लाची प्रकृती स्थिर असून त्याला जगवण्यासाठी आम्ही पुर्णपणे प्रयत्नशील असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. शैलेश पेठे यांनी दिली. तसेच मादीकडे सुपूर्द करण्यासाठी पिल्लाला थंडीमध्ये उघड्यावर ठेवणे त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे येऊरमध्ये मादी बिबट्याचा वावर आढळल्यावरच पिल्लाला पुन्हा सुपूर्द करण्यासाठी योग्य तो निर्णय घेणार असल्याचे, पेठेंनी स्पष्ट केले. सध्या पिल्लाला मांजरांसाठी येणाऱ्या मिल्क रिल्पेसरव्दारे दूध पाजले जात आहे. दूध आणि टाॅनिक्सवर त्याचे पालनपोषण करण्यात येत आहे.

@@AUTHORINFO_V1@@