नवनाझीवादाचे चिन्हसंकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2019   
Total Views |


jagachya pathivr_1 &


झुरळ दिसल्यासारखे ‘हिटलर’ ‘हिटलर’ ओरडून काही साध्य होणार नाही. त्यातून नवनाझीवादासारख्या आव्हानांचा सामना करणे शक्यच नाही. निवडणुकीपुरते व्यक्तीच्या प्रतिमाभंजनाचे कार्यक्रम नक्की चालू शकतील, पण त्यातून समाजावर येणारे संकट दूर होणे अशक्य!



नवनाझीवादाच्या
‘स्वस्तिका’ची चिन्हे फ्रान्समधील भिंतीवर आढळली आहेत. संबंधित प्रकाराने फ्रान्स जसा हादरून गेला आहे. त्यासोबतच या प्रकाराची दखल आंतरराष्ट्रीय पटलावरही घ्यायला हवी. फ्रान्समधील ज्यू समुदाय मोठ्या संख्येने राहतो. ‘स्प्रे’चा उपयोग करून शेकडो ठिकाणी हिटलरच्या नाझीवादाचे चिन्ह रंगवले गेले आहे. हा प्रकार करणार्‍यांनी ‘ज्यू’च्या दफनभूमीलाही सोडलेले नाही. फ्रान्सचे मंत्री ख्रिस्तोफर कॅस्टनर यांनी सगळ्या घटनेवर भाष्य केले. ‘अ‍ॅण्टिहेट क्राईम’ कार्यालयाची स्थापना करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनीही यावर निषेध नोंदवला.



झाला प्रकार नव्या वर्णवर्चस्ववादाचा परिणाम म्हणावा लागेल
. दुसर्‍या महायुद्धात जर्मनीचा व पर्यायाने हिटलरचा पाडाव झाला. मात्र, हिटलरने द्वेषाच्या आधारावर पेरलेल्या नाझीवादाची मुळे आजही सापडतात. ‘निओ-नाझीझम’ या नावाने आजही त्याची वैचारिक मांडणी सुरू असते. भारतातील तथाकथित उदारमतवाद्यांना, पुरोगाम्यांना नाझीवादाचे संबंध कुठेतरी भलतीकडेच शोधण्यात रस असतो. नाझीवादाचा समूळ नायनाट झालेला नाहीच. मात्र, त्या नवनाझीवादाचे बळी ठरणारा ज्यू समुदाय ‘प्रपोगंडा’ चालवण्याच्या दृष्टीने सोयीचा नसल्याने या प्रकारांवर भाष्य करणे तर दूर राहिले, साधी प्रसिद्धी देण्याची तसदीही घेतली जात नाही. त्यातूनही ज्यांनी या प्रकारचे वार्तांकन केले. त्यातील बहुतांश मंडळींना नि:स्पृहता टिकवता आली नाही. अत्यंत द्वेषपूर्ण उद्योगाला ‘अ‍ॅण्टिसेमिटीक’ असे म्हटले आहे. वास्तवात ‘सेमिटीक’ धर्म आणि त्यांचा कडवटपणा हा स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे.



मात्र
, एरव्ही छोट्याशा टिवटिवाटावरूनही जग निराशेच्या गर्तेत लोटू इच्छिणार्‍यांसाठी या घटना मामुली प्रकारात मोडव्यात, हे बुद्धिवंतांच्या दांभिकपणाचे लक्षण आहे. उपलब्ध माहितीनुसार, दरवर्षी हजारो ज्यू फ्रान्स सोडत आहेत. जगभरातील उदारमतवादी यांच्याविषयी सहानुभूती बाळगतात का, हा प्रश्न विचारलाच पाहिजे. किमान या ज्यूंना ‘शरणार्थी’ प्रकारात तरी मोजणार का, हाही प्रश्न असतोच. विश्वशांतीच्या प्रार्थनेच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरूनही स्वतःचेच अजेंडे पुढे रेटणारे अशा प्रकारांवर व्यक्त होत नाहीत. असहिष्णुता, द्वेष किंवा वर्णवाद किती भीषण असतो, याचा प्रत्यय फ्रान्ससारख्या देशात घडणार्‍या घटनांकडे पाहिल्यावर येईल. वास्तविक द्वेषाची पाळेमुळे खणून काढण्याची आवश्यकता मुख्यप्रवाहातील बुद्धिजीवींना वाटत नाही. त्याऐवजी स्वतःच्या राजकीय सोयीनुसार अजेंडे रेटण्यावर भर दिला जातो. खरा हिटलर कुठे आहे, कोण आहे व तो कसा आहे, अशा प्रश्नांची नेमकी उत्तरे डोळसपणे शोधावे लागतील. सध्या ‘हिटलर’ कोण हे ठरवणारे लोक निर्धास्तपणे वावरताना पाहून, ज्याला ‘हिटलर’ म्हटले जाते, ते खरंच ‘हिटलर’ असावेत का, असा प्रश्न पडतो.



धर्मनिरपेक्षता
, समता आणि लोकशाही या मूल्यांचा आधुनिक आविष्कार युरोपातीलच. तरीही तिथे अशा प्रवृत्ती मूळ धरून राहतात, हे दुर्दैवी. किंबहुना, अशा प्रवृत्तींनीच त्या मूल्यांना रुजविण्यासाठी पोषक जमीन तयार केलेली असते. नाझीवाद ज्या काळात जोमात होता, तेव्हा तो किती तीव्र असेल याचा अंदाज आपण नुकत्याच घडलेल्या घटनेवरून लावू शकतो. आज जग उदारमतवादाच्या नवनव्या संकल्पना उलगडत असताना अशा प्रवृत्ती फोफावतात हेच भयानक आहे. पण, त्या उदारमतवादाचे विश्वस्त बनू पाहणार्‍यांचा दुटप्पीपणा अशा प्रकारांना कारणीभूत ठरतो. जन्माच्या आधारे स्वतःला श्रेष्ठ समजणारी मानसिकता केवळ स्वतःच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पना करून थांबत नाही. त्यापुढे जाऊन ही मानसिकता इतरांचे जन्म-मरणाचे निर्णय घेऊ इच्छिते. हे थांबविणे मानवजातीसमोरचे आव्हान आहे. समाजाला लागलेल्या अशा रोगांचे निदान करणे हेच बुद्धिवंतांचे दायित्व. त्याकरिता रोगाचे योग्य निदान करण्याचे कष्ट आणि धारिष्ट्य जमवावे लागेल. झुरळ दिसल्यासारखे ‘हिटलर’ ‘हिटलर’ ओरडून काही साध्य होणार नाही. त्यातून नवनाझीवादासारख्या आव्हानांचा सामना करणे शक्यच नाही. निवडणुकीपुरते व्यक्तीच्या प्रतिमाभंजनाचे कार्यक्रम नक्की चालू शकतील, पण त्यातून समाजावर येणारे संकट दूर होणे अशक्य!

@@AUTHORINFO_V1@@