उबाळेंची स्मृतिप्रवण पेंटिंग्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


अनुभवी चित्रकार बालाजी उबाळे यांचे जहांगिर कला दालनात नुकतेच २ डिसेंबरला प्रदर्शन संपन्न झाले. 'अशी पाखरे येती आणिक स्मृति ठेऊनी जाती...' या काव्यपंक्तींप्रमाणेच त्यांच्या कलाकृतींबद्दल बोललं पाहिजे. काही कलाकृती या स्मरणात का राहतात? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बालाजी उबाळे यांच्या कलाकृती होय. त्यांची रंगलेपनाची शैली, अ‍ॅक्रेलिक रंग मिश्रणांच्या गडद आणि उठावदार छटांमधील लपंडाव थक्क करणारा असतो. लाल, निळा, हिरवा, पिवळा या रंगछटांच्या थिरकण्याला 'काळ्या'ची समेवरील थाप पडावी, तशी नजाकत म्हणजे बाळाजी उबाळेंच्या प्रत्येक कलाकृती पेशकशच ठरावी. त्यांचं प्रत्येक पेंटिंग म्हणजे रंगसंगतीची लयकारी मैफीलच. वास्तविक त्यांच्या कलाकृतींचा विषय ग्रामीण वनवासी दैनंदिन जीवनाच्या निरीक्षणांच्या नोंदीच आहेत. मग सकाळी-सकाळी पाणी आणण्यासाठी घागरी घेऊन जाणाऱ्या ललना असोत, की केशशृंगारातील केशसंभारात माळलेला रानफुलांचा गजरा असो... अगदी साधी साधी निरीक्षणेदेखील उबाळेंनी समृद्ध केलीत.

 

त्यांची काही पेंटिंग्ज ही श्रीकृष्ण-राधेच्या मैत्रीची आठवण करून देणारी आहेत. सामवेदातील 'नारदीय शिक्षा' या प्रकरणातील स्वरांचं उत्पत्ती स्थान समर्पक असा शब्दात वर्णन केलेलं आहे. मोराच्या आवाजापासून 'षड्ज'(सा)ची निर्मिती, बैलाच्या आवाजापासून 'रिषभ' (रे) चा जन्म मेंढा वा बोकड यांच्या आवाजपासून गांधार(ग) ची उत्पत्ती झाली. सारस, बगळा वा करकोंचाच्या आवाजापासून 'मध्यम'(म)ची निर्मिती, कोकीळाच्या आवाजाने 'पंचम'(प) निर्माण केला, तर घोड्याच्या आवाजाने धैवत (ध) हा स्वर निर्माण झाला. या साऱ्या स्वरांच्या नंतर हत्तीच्या चित्कारापासून 'स्वरमेळा'ची रचना निश्चित केली गेली. प्रा. उबाळे यांनी या स्वरांना त्यांच्या प्रतिभेद्वारे रंगबद्ध करून 'ओरिजीन ऑफ स्वरा' ही कलाकृती निर्माण झाली. एकूणच बाळाजी उबाळे हे संशोधन करून, सूक्ष्म टिपणे काढून चिंतन करून रंगाकारांच्या साहाय्याने कलाकृती निर्माण करतात. म्हणून त्यांची प्रत्येक कलाकृती ही स्मृतिप्रवण ठरते. त्यांनी त्यांच्या कलाकृतींच्या विषय आणि आशयानुसार आकार निश्चित केलेले असल्यामुळे, अंतर्गत सजावटी करतेवेळी, कलाकृती किती आणि कोणत्या आकारांतील असावी हाही अचूक विचार उबाळे यांनी केलेला दिसतो. मला वाटते, अशा प्रकारचा विचार करणारे चित्रकार फारच कमी दिसतात. त्यांच्या कलाकृती या हॉटेल्स समूह, रुग्णालये, मॉल्स, सार्वजनिक वा धार्मिक ठिकाणे अशा ठिकाणी उचित परिणाम साधणाऱ्या अशा भासतात.

- प्रा. गजानन शेपाळ

@@AUTHORINFO_V1@@