दिवाळी अंक, मराठी भाषा आणि यास्मिन शेख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2019
Total Views |


yasmin_1  H x W


मराठी भाषा जगवा, समृद्ध करा. मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत आहेत, बंद होत आहेत. शतकी परंपरा असूनही मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळत नाही. इंग्लिश माध्यमांच्या शाळांत मराठी भाषेची सक्ती नाही. मराठी माध्यमांच्या शाळांतून शिकलेल्या मुलांना इंग्लिश बोलता येत नाही. म्हणून त्यांची टिंगल केली जाते. अशा विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. दुसरं म्हणजे, मराठी भाषेची दुर्दशा होते. त्या भाषेतील शब्द, वाक्यरचना, शब्दार्थ यांबद्दल सामान्य मराठी माणसाला काही देणंघेणं नसतं. या सार्‍याला आपण मराठी भाषिकच जबाबदार आहोत! मराठी भाषा जगवायची असेल, तिचं स्थान भक्कम करायचं असेल, तर आज आपण सर्वांनी निश्चय करूया.


कुठल्याही भाषिक व कोणत्याही धार्मिक समाजाच्या सांस्कृतिक समृद्धीसाठी
, त्या भाषेतील वाङ्मयीन नियतकालिकांचे अस्तित्व ही एक फार महत्त्वाची गोष्ट असते. मराठी भाषेच्या बाबतीत ही जबाबदारी भागवतबंधूंच्या ‘सत्यकथे’ने बराच काळ उत्तमरित्या निभावली होती. नेमकं सांगायचं तर गिरगावच्या खटाववाडीतून नोव्हेंबर १९३३ मध्ये सुरू झालेले ‘सत्यकथा’ मासिक ऑगस्ट १९८२ मध्ये निरुपायाने बंद करावे लागत असल्याची घोषणा प्रा. श्री. पु. भागवत यांनी केली. तेव्हा ते म्हणाले होते, “साहित्याला वाहून घेतलेल्या मासिकाला जाहिराती मिळत नाहीत. काम करायला माणसं मिळत नाहीत. मासिक छापण्याचा, लेखकांना मानधन देण्याचा, नोकरांना पगार देण्याचा सारा बोजा संपादकांवरच पडतो, जो परवडत नाही. त्यामुळे कितीही इच्छा असली तरी, नाईलाजाने मासिक बंद करावं लागलं.”


‘सत्यकथा’ बंद पडल्यामुळे मराठीत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी ‘अभिरुची’, ‘अनुष्टुभ’, ‘ललित’, ‘शब्दरुची’ वगैरे मासिके धडपडत राहिली. या धडपड्यांतील एक महत्त्वाचे नाव होते पुण्याचे व्यासंगी पत्रकार-साहित्यिक भानू काळे संपादित ‘अंतर्नाद’चे! ऑगस्ट १९९५मध्ये सुरू केलेला ‘अंतर्नाद’ सर्व चोखंदळ रसिकांच्या पसंतीला उतरलाच. एक अंतर्मूख साहित्यिक म्हणून स्वतःत उंचबळणारे नवनिर्मितीचे उन्मेष मार्ग दडपून काळेही २४ वर्षे नफा-तोटा न बघता, ‘अंतर्नाद’ मासिक स्वरुपात प्रकाशित होत राहिले. पण, अखेर जानेवारी २०१७ला मासिक बंद करून दिवाळी वार्षिकाच्या स्वरूपात ‘अंतर्नाद’ प्रकाशित भरण्याची पाळी त्यांच्यावर आलीच. तरीही २०१९चा रौप्यमहोत्सवी ‘अंतर्नाद’चा दिवाळी अंक प्रकाशित करताना, तो ‘अंतर्नाद’चा शेवटचाच अंक ठरेल, अशी एकूण हवा होती. त्यामुळे त्या वार्षिक अंकाचे प्रकाशन २० ऑक्टोबर, २०१९ला पुण्याच्या नवीन पेठेतील एसेम जोशी सभागृहात समारंभपूर्वक करण्यात आले. तेव्हा मुसळधार पाऊस असूनही मुंबईपासून महाराष्ट्राच्या निरनिराळ्या विभागांतून ‘अंतर्नाद’चे कैक चाहते, वाचक सकाळच्या त्या कार्यक्रमास पोहोचलेच!


डॉ
. नरके यांच्या हस्ते प्रकाशन


पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख ज्येष्ठ विचारवंत डॉ
. हरी नरके यांच्या हस्ते या रौप्य महोत्सवी अंकाचे समारंभपूर्वक प्रकाशन झाले. त्यावेळी ते म्हणाले, “आज आपल्या समाजात एकीकडे चंगळवाद बोकाळताना पाहायला मिळत असताना, दुसरीकडे अभिरुची-संपन्नतेच्या बाबतीतील सजगता मात्र आढळत नाही! अशा परिस्थितीत काही दिवाळी अंकांनी मात्र आपली बांधिलकी जपली आहे. आपल्याकडील दिवाळी अंकांनी जगणे व जगण्याविषयीच्या जाणिवा समृद्ध केल्या. अलीकडच्या काळात दिवाळी अंकांना दर्जा व सातत्य टिकवून ठेवणे अवघड झाले आहे. ‘अंतर्नाद’ने मात्र या दोन्हींच्या बाबतीत कधीच तडजोड केलेली नाही. मराठीला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा, या बाबतीत शासन व समाज अशा दोन्ही पातळ्यांवर उदासीनता अजूनही दिसते. याविषयी या दोन्ही घटकांनी आत्मपरीक्षण करावे,” असा सल्लाही डॉ. नरके यांनी दिला.


अध्यक्षपदी डॉ
. दाभोळकर


व्याकरण सल्लागार म्हणून
‘अंतर्नाद’मध्ये शुद्ध लेखनाविषयी गेली २४ वर्षे दक्ष राहिलेल्या ज्येष्ठ (वय वर्षे केवळ ९४!) वैय्याकरणी प्रा. यास्मिन शेख यांचा आणि ‘अंतर्नाद’च्या पहिल्या अंकाप्रमाणेच या पंचविसाव्या अंकातही ज्यांच्या साहित्याला गौरवपूर्वक स्थान मिळाले. ख्यातनाम विज्ञानकथाकार सुबोध जावडेकर यांचे सत्कार हे या प्रकाशन सोहळ्याचे एक विशेष आकर्षण होते. अशा मान्यवरांचे सत्कार करायला तितकीच ज्येष्ठ व्यक्ती हवी म्हणून समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवण्यासाठी भानू काळे यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांना सातार्‍याहून खास निमंत्रित केले होते. दोन्ही सत्कारमूर्तींविषयी गौरवोद्गार काढून अध्यक्षपदावरून डॉ. दाभोळकर म्हणाले, “मराठी साहित्यात दिवाळी अंकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. दिवाळी अंकांच्या माध्यमातून अनेक नवसाहित्यिक लिहिते झाले. अनेक उत्तमोत्तम कादंबर्‍यांची बीजे दिवाळी अंकांमधून फुलली आहेत. दिवाळी अंकांनी विज्ञानकथा, नवकथा व दलित साहित्यही दिले. आपल्या मराठीत दरवर्षी वेगवेगळ्या विषयांना वाहिलेले शेकडो दिवाळी अंक एकाच वेळी प्रकाशित होताना दिसतात. मराठी साहित्यविश्वाच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. तथापि, ‘अंतर्नाद’सारख्या वाङ्मयीन, भाषिक, सांस्कृतिक मूल्ये जपणार्‍या दिवाळी अंकांना आज संकटग्रस्त होऊन ओढताण करुन वाटचाल करावी लागत आहे, हे दुश्चिन्ह आहे. त्यामुळे संपूर्ण समाजाने सामाजिक ऋण फेडण्याच्या भावनेतून या दिवाळी अंकांच्या मागे सक्षमपणे उभे राहिले पाहिजे,” अशी अपेक्षाही डॉ. दाभोळकर यांनी व्यक्त केली.


सुबोध जावडेकर


वाङ्मयीन मासिक प्रसिद्ध करण्याव्यतिरिक्त साहित्यसंवर्धनासाठी कथालेखन
, शिबिरे, कथालेखन स्पर्धा इ. विविध उपक्रम आजपर्यंत राबवत आलेल्या मित्रवर्य भानू काळे यांनी जिव्हाळ्याने केलेल्या आपल्या सत्काराला उत्तर देताना सुबोध जावडेकर म्हणाले, “ ‘अंतर्नाद’ने अनेक नव्या लेखकांना आवर्जून स्थान देऊन पुढे आणले. ज्यांचे पहिले लेखन ‘अंतर्नाद’मधून प्रकाशित झाले, असे अनेक लेखक आहेत. व्यक्तिशः माझ्यापुरतं सांगायचं तर ‘अंतर्नाद’च्या पहिल्या अंकात प्रसिद्ध झालेली माझी कथा ही विज्ञानकथा नसलेली अशी माझी पहिलीच कथा होती. त्यापूर्वी मी केवळ ‘विज्ञानकथा लेखक’ म्हणून प्रसिद्ध होतो. त्यामुळे एका अर्थाने, कथाकार म्हणून प्रथम प्रसिद्धी मला ‘अंतर्नाद’नेच दिली.”

 


निवडक अंतर्नाद’चा संकल्प


विचारवंत
, साहित्यिक विनय हर्डीकर, चित्रकला-समीक्षक साधना व सुहास बहुलकर प्रभृती या समारंभात बोलण्याची संधी मिळालेल्या प्रत्येक वक्त्यानेभानू काळे यांनी काही केल्या ‘अंतर्नाद’ बंद करू नये. किमान वार्षिकाच्या रुपात तरी ते काढत राहावेच, हवे तर अंकाची वर्गणी वाढवावी, देणग्या घ्यावात’ अशी गळ घातली होती. त्याचा परामर्श घेताना भानू काळे यांनी त्या अपेक्षेची पूर्ती करण्याचे स्पष्ट आश्वासन देण्याचे आपल्या अडचणी सांगत टाळले. मात्र, ‘अंतर्नाद’च्या या २५ वर्षांतील निवडक साहित्याच्या संकलनाचे एक वार्षिक पुढील वर्षी प्रकाशित करण्याचा मनोदय केवळ व्यक्त केला. वर्षा काळे व स्नेहा अवसरीकर यांनी सुविहितपणे सूत्रसंचालन केलेल्या या प्रकाशन सोहळ्याची सुरेल सांगता (डॉ. अमित त्रिभुवन सूत्रसंचालित) चंद्रशेखर महामुनी व कल्याणी देशपांडे-जोशी यांच्या ‘त्या सुरांच्या गंधकोषी’ या अवीट गोडीची मराठी भावगीते-चित्रगीते यांच्या सांगीतिक कार्यक्रमातील स्वा. सावरकररचित ‘ने मजसी ने’ या स्फूर्तिगीताने झाली.

 

रुंजी घालत राहिले...


कार्यक्रम संपला
, पण उपस्थित मराठीप्रेमी रसिकांच्या काळजात घोळत राहिले ते ९४ वर्षांच्या यास्मिन शेख यांनी वाचून दाखवलेले त्यांचे भाषण! जेरुशा रुबन या नावाने ज्यूधर्मीय म्हणून जन्मलेल्या, मराठीवरील प्रभुत्वामुळे उदारमनस्क माटेमास्तरांची लाडकी-सर्वोत्तम विद्यार्थिनी म्हणून पुण्यात विख्यात असलेल्या स. प. महाविद्यालयातून बी.एची परीक्षा पहिल्या वर्गात पहिल्या आलेल्या नाटककार वसंत कानेटकरांचे स्नेही डॅडी शेख या उदारमनस्क देखण्या मुसलमान तरुणाशी प्रेमविवाह केलेल्या, शीवच्या एसआयईएस महाविद्यालयातील मेहनती, गोडबोली विद्यार्थीप्रिय मराठीच्या अध्यापिका ठरलेल्या, राज्य मराठी विकास संस्थेसाठी सर्वाधिक खपाचे प्रकाशन ठरलेल्या ‘सुगम मराठी व्याकरण कोशा’चे लेखन-संपादन करून ‘अभिजात वैय्याकरणी’ म्हणून राज्य सरकारकडूनदेखील ‘जीवन गौरव’ पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या शेखबार्ईंनी, सर्व उपस्थितांविषयी कृतज्ञपणे गौरवोद्गार काढून केलेले पुढील आवाहन सर्व मराठी रसिकांच्या मनात चिरंतन घोळत राहावे. शेखबाई म्हणाल्या -

 

आमच्या दोन्ही कन्या विवाहानंतर पुणेनिवासी झाल्यामुळे १९९६ साली चेंबूरचे आमचे निवासस्थान विकून मी व डॅडी औंधला राहायला आलो. तेव्हा भानू काळे तत्परतेने ‘अंतर्नाद’चे काही अंक घेऊन मला घरी येऊन भेटले. मराठी शुद्धलेखन नियमांनुसार हे मासिक अधिक निर्दोष व्हावे, यासाठी तरुण मुद्रितशोधकाला मी तयार करावे, ही त्यांची कळकळ भिडल्यामुळे त्यांच्या पुढील अंकातील मुद्रितसंशोधित लेखन मी पुन्हा एकदा निरपेक्षपणे तपासून दिले. पण, तो अंक प्रसिद्ध होऊन जेव्हा माझ्या हाती पडला तेव्हा अनुक्रमणिकेनंतर ‘व्याकरण सल्लागार ः यास्मिन शेख’ असं छापलेलं दिसलं. तेव्हा त्या अनपेक्षित गौरवाने काळे यांच्या ‘अंतर्नाद’ परिवारात मी आजतागायत सहजपणे सामावून गेले. त्या बिरुदामुळे पुण्यातील मराठी भाषिकांना ठाऊक झालेच, पण संपूर्ण बृहन्महाराष्ट्रातूनच नव्हे तर परदेशातील मराठी माणसांचेही दूरध्वनी मराठी लेखनाविषयीच्या त्यांच्या शंकांचे निरसन करून घेण्यासाठी, व्याख्यानांसाठी येऊ लागले. पुणे विद्यापीठानेही मला एम.एच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करायला सुरुवात केली. डॉ. व. दि. कुलकर्णी, डॉ. कल्याण काळे यांसारख्या विद्वानांनीही ‘अंतर्नाद’च्या निर्दोषत्वाबद्दलमाझे जाहीरपणे कौतुक केले. पण, या सार्‍याचे श्रेय भानू काळे यांचं आहे. ‘व्याकरण सल्लागार’ ही पदवीच त्यांनी मला बहाल केली.’

 

 
भाषेला धर्म-जात नसते

 

या सत्काराच्या निमित्ताने एक महत्त्वाची गोष्ट मला आज इथे सांगायची आहे. भाषेला धर्म नसतो, जात नसते! मराठी माझी मातृभाषा आहे. माझे माझ्या भाषेवर जीवापाड प्रेम आहे. मराठी भाषा फक्त हिंदूंची नाही, महाराष्ट्रात जन्मलेल्या, तिथेच वास्तव्य करणार्‍या किंवा परदेशात स्थायिक झालेल्या सर्वांची ती आहे. मराठीवर प्रेम करणारी, तिच्यात लेखन करणारे कितीतरी अन्य धर्मीय माणसं सुपरिचित आहेत. अमर शेख, हमीद दलवाई, यू. म. पठाण, राजन खान असे कित्येक जण! म्हणून आज इथे मला अगदी विनवून तुम्हाला एकच सांगायचंय, ‘तुम्ही मुसलमान, ज्यू, ख्रिश्चन असूनही, इतकं चांगलं मराठी कसं बोलता? असा प्रश्न कुणालाही कधीही विचारू नका!’ शेवटी आणखी एक विनंती तुम्हा सर्वांना करायची आहे- मराठी भाषा जगवा, समृद्ध करा. मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत आहेत, बंद होत आहेत. शतकी परंपरा असूनही मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळत नाही. इंग्लिश माध्यमांच्या शाळांत मराठी भाषेची सक्ती नाही. मराठी माध्यमांच्या शाळांतून शिकलेल्या मुलांना इंग्लिश बोलता येत नाही. म्हणून त्यांची टिंगल केली जाते. अशा विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. दुसरं म्हणजे, मराठी भाषेची दुर्दशा होते. त्या भाषेतील शब्द, वाक्यरचना, शब्दार्थ यांबद्दल सामान्य मराठी माणसाला काही देणंघेणं नसतं. या सार्‍याला आपण मराठी भाषिकच जबाबदार आहोत! मराठी भाषा जगवायची असेल, तिचं स्थान भक्कम करायचं असेल, तर आज आपण सर्वांनी निश्चय करूया. आपली भाषा आपण दर्जेदार, संपन्न, सुंदर करू शकतो. याची जाणीव आपल्यात निर्माण होऊ द्या. मगच ‘सत्यकथा’, ‘अंतर्नाद’ यांसारख्या दर्जेदार मासिकांचं संरक्षण होऊ शकेल. सुरेश भट म्हणतात, ‘लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी...’आपण सर्वजण भाग्यवान आहोत, हे कधीच विसरू नका. जय महाराष्ट्र! जय मराठी!!

- नी
ला उपाध्ये
@@AUTHORINFO_V1@@