नांदूरमध्यमेश्वरमध्ये अवतरले 'वारकरी'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2019   
Total Views |


saf_1  H x W: 0


सध्या नांदूरमध्यमेश्वर येथे २६५ जातीचे पक्षी येत असून येथे आठ सस्तन प्राणी आणि २४ प्रकारचे मासे आहेत. ४२ प्रकारची फुलपाखरे, ५३६ भूपृष्ठीय आणि जलीय वनस्पती आहेत. २६५ पैकी १४८ पक्षी हे स्थलांतरित आहेत. या १४८ पैकी ८८ पक्षी हे जागतिक महत्त्वाच्या 'रामसर' पाणथळांमध्ये आढळणारे आहेत. इतर पक्षी हे महत्त्वाचे 'लॅण्ड बर्ड्स' आहेत.


आपल्या महराष्ट्रात वारीचे महत्त्व हे काही वेगळेच आहे. प्रतिवर्षी वारकरी भागवत धर्माची पताका घेत पंढरीत दाखल होत असतात. असेच दरवर्षी जगाच्या विविध कोपऱ्यातून नाशिक जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्षी दाखल होतात. त्यांचा हा अविरत प्रवास एखाद्या वारीपेक्षा कमी नाही. वारकरी जसा भक्तिभावाचा संदेश देत नवचैतन्य फुलवितो, तसेच येथे दाखल होणारे पक्षी हे शिस्त, शिरस्ता आणि आपले मनमोहक रूप याने पक्षीनिरीक्षक, पर्यावरणप्रेमी यांच्या जीवनात आनंद फुलवितातनांदूरमध्यमेश्वर अभयारण्य २५ फेब्रुवारी, १९८६ मध्ये घोषित झाले. येथे असणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर धरणामुळे येथे खऱ्या अर्थाने जैवविविधता विकसित झाली आहे. या धरणाचा मुख्य उद्देश हा नाशिक जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्याला पाणीपुरवठा करणे हा आहे. मात्र, येथे दरवर्षी येणारे पाणी यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गाळाचे संचयन झाले आहे. त्यामुळे पक्ष्यांसाठी उपयुक्त असा अधिवास येथे निसर्गत:च निर्माण झाला आहे. नांदूरमध्यमेश्वर परिसरात मुबलक पाणी, गाळयुक्त जमीन, मुबलक सूर्यप्रकाश यामुळे येथे विविध प्रकारच्या वनस्पतींचीदेखील वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे वनस्पती आणि पाणी यांवर आधारित असणारी जीवसृष्टी येथे सहज पाहावयास मिळते. या कारणांमुळे पक्ष्यांना आवश्यक असणारे अन्न, पाणी, हवामान यांचा संगम असणारी परिसंस्था येथे निर्माण झालेली असल्याने असल्याने नांदूरमध्यमेश्वरमध्ये पक्षी दरवर्षी दाखल होतात. सप्टेंबर महिन्यापासून येथे पक्षी दाखल होण्यास सुरुवात होते. मात्र, सध्या हिवाळ्याच्या मोसमात पक्षी दाखल होण्याची संख्येत वाढ झाली आहे. हिवाळ्याच्या मोसमात दरवर्षी नांदूरमध्यमेश्वर येथे जवळपास २० हजारांपेक्षा जास्त विविध प्रकारचे पक्षी दाखल होतात. हे सर्व पक्षी पूर्व युरोप, सायबेरिया, मंगोलिया, उत्तर भारत येथून नांदूरमध्यमेश्वरमध्ये दाखल होतात.

 

सध्या नांदूरमध्यमेश्वर येथे २६५ जातीचे पक्षी येत असून येथे आठ सस्तन प्राणी आणि २४ प्रकारचे मासे आहेत. ४२ प्रकारची फुलपाखरे, ५३६ भूपृष्ठीय आणि जलीय वनस्पती आहेत. २६५ पैकी १४८ पक्षी हे स्थलांतरित आहेत. या १४८ पैकी ८८ पक्षी हे जागतिक महत्त्वाच्या 'रामसर' पाणथळांमध्ये आढळणारे आहेत. इतर पक्षी हे महत्त्वाचे 'लॅण्ड बर्ड्स' आहेत. ज्यात 'राफटर', 'लाग्स', 'बंटीग्स' आदी जातिसमूहातील पक्ष्यांचा समावेश होतो. तसेच, नांदूरमध्यमेश्वरचा परिसर हा कृषिमूलक असल्याने आणि गवताळ प्रदेश असल्याने यावर उपजीविका करणारे पक्षीदेखील येथे मोठ्या प्रमाणात आढळतात. २६५ पैकी चार जाती या स्थानिक आहेत. माशांच्या चार जातीदेखील या स्थानिक आहेत. तसेच, गंभीर धोकाग्रस्त श्रेणीत सस्तन प्राण्यांपैकी एक 'लेपर्ड', पक्ष्यांपैकी आठ 'शाही गरूड', 'लांब चोचीचा गिधाड', 'पांढऱ्या पुठ्याचा गिधाड', 'बहिरी ससाणा', 'लगगड ससाणा' आदींचा समावेश आहे. मासे प्रकारात 'देवळाली मिनो' आदींचा समावेश होतो. येथील जैवविविधता पर्यटकांना नेहमीच खुणावत असते. येथे येणाऱ्या पक्ष्यांचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी नाशिक वन्यजीव विभागामार्फत अनेकविध सुविधा साकारण्यात आल्या आहेत. नांदूरमध्यमेश्वर येथे पक्षी निरीक्षणासाठी सहा मनोरे, दोन गॅलरी, चार बर्डव्हाईट, निसर्ग पायवाट, पॅगोडे, इको हर्ट्स, कॅन्टीन आदींच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच, निसर्गत:च मिळालेले हे वरदान शास्त्रोक्त ज्ञानाच्या आधारे विशद केले जावे. तसेच, पर्यटकांना अचूक माहिती उपलब्ध व्हावी यासाठी शुल्क अदा करून येथे गाईडची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी येथे स्थानिक तरुणांना प्रशिक्षित करून त्यांनाच गाईड म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच, नांदूरमध्यमेश्वरची चापडगाव पर्यटन संकुल आणि निसर्ग निर्वाचन केंद्र, खानगाव (थडी) अशा कॅम्पसमध्ये विभागणी करण्यात आली आहे. निसर्ग निर्वचन केंद्रात नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याची दृक्श्राव्य माध्यमातून माहिती मिळते. तसेच येथे अत्याधुनिक प्रदर्शन सभागृहदेखील साकारण्यात आले आहे.

 

safs_1  H x W:  
 

नांदूरमध्यमेश्वर येथे दाखल होणारे पक्षी हे पहिल्यांदा हिमालयातील पाणथळ जागा, जसे डूनव्हॅली, आसान बीरेंज आदी ठिकाणी आपले वास्तव्य करतात. नंतर पोंग डॅम, भरतपूर, सांबर लेक, जळगाव येथील हातनूर धरण असा प्रवास करत नाशिक येथे नांदूरमध्यमेश्वरमध्ये दाखल होत असतात. नांदूरमध्यमेश्वर येथे मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा असल्याने त्यांना योग्य अधिवास मिळतो. त्यामुळे हे पक्षी दिवसभर स्वच्छंद विहार करून रात्री विश्रांतीसाठी येथील विविध झाडांवर विसावतात. त्यामुळे या अभयारण्यात एका झाडावर असंख्य पक्षी बघावयास मिळतात. येथून पुढे ते समुद्र किनारी, भिगवण, कर्नाटकातील रंगन ठिट्टू येथे मार्गस्थ होत असतात. हा पक्ष्यांचा निर्धारित हवाईमार्ग आहे. नांदूरमध्यमेश्वर हे ठिकाण मध्य आशियाई हवाहीमार्गावर येत असल्यानेदेखील येथे पक्ष्यांचे दर्शन होत असते. हे क्षेत्र भारत सरकारच्या स्थलांतरित पक्षी व त्यांचा अधिवास संवर्धन करण्यासाठीचा कृतिबंध यातदेखील समाविष्ट करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या या जैवविविधतेच्या रक्षणासाठी गस्ती पथकाबरोबरच मासेमारीसाठी येथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यंदाच्या मोसमात सध्या १८ हजारच्या जवळपास पक्षी येथे दाखल झाले आहेत. यात मुखत्वे 'फ्लेमिंगो', 'डक', 'स्पून बिल', 'क्रेक', 'रिव्हर टर्न', 'ग्रीप', 'पाणकावळे', 'तिरंदाज', 'करकोचे', 'शराटी', 'बाज', 'घार', 'गरुड', 'ससाणे' आदी पक्षी दिसून येतात. येथे दाखल होणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून सन २०१८-१९ मध्ये १५ लाखांचा महसूल प्राप्त झाला होता. आजवर नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यास सलीम अली, बीएनएचएसचे सदस्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे छायाचित्रकार, मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या आहेत. अविरतपणे एकाच मार्गाने एकाच ठिकाणी येत हे पक्षी आपल्यातील शिस्तीचे दर्शन घडवत आहेत. वारकरी ज्याप्रमाणे विठोबाच्या ओढीने प्रतिवर्षी अविरतपणे एकाच ठिकाणी एकाच मार्गाने शिस्तीचे दर्शन घडवत वारीच्या माध्यमातून आपला भक्तिभाव व्यक्त करतो तसेच या पक्ष्यांचे येणे आहे. त्यामुळे प्रत्येक हिवाळ्यात गोदाकाठ नांदूरमध्यमेश्वरच्या या वारकऱ्यांमुळे जगातील पर्यावरणप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत.

@@AUTHORINFO_V1@@