वनसंवर्धनाचा वसा घेतलेला वनपाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2019   
Total Views |


tiger_1  H x W:


प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वन्यजीव अधिवास व्यवस्थापनासाठी झटणार्‍या वनपाल अशोक काळेंविषयी...

 

 
मुंबई (अक्षय मांडवकर) - काही माणसं संघर्षमय आयुष्यावर खंबीरपणे पाय रोवून उभे राहत यशाची नवी शिखरे गाठण्यासाठी प्रेरित करत असतात. अशा वेळी नियती त्यांच्या पाठीशी असतेच, असे नाही. पण, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर ही माणसे यशाच्या दिशेने मार्गक्रमण करत राहतात. नाशिकच्या ’नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्या’मधील एका वनपालाची गोष्टदेखील अशीच काहीशी. उच्चशिक्षित असलेले हे वनपाल आज आपल्या प्रामाणिक वनसेवेसाठी ओळखले जातात. त्यांच्या प्रामाणिकतेची दखल वेळोवेळी शासन दरबारीही घेण्यात आली आहे. प्रतिकूल परिस्थितीत काम करत ते वन्यजीव व्यवस्थापनासाठी झटत राहिले. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी आजवर काम केले, तिथे वनसंवर्धन, वनकायदा, वन्यजीव अधिवास सुधारणा, वन्यजीव व्यवस्थापन आणि समाजप्रबोधनाकरिता मोलाची कामगिरी बजावली. असे वनसंवर्धनाचा वसा घेतलेले वनपाल म्हणजे अशोक काळे.
 
 

tiger_1  H x W: 
 
 

नाशिकच्या निफाडमधील कसबे सुकेने गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात दि. १ मार्च, १९८३ साली काळेंचा जन्म झाला. घरची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या हलाखीची होती. त्यामुळे आवड आणि छंद जोपासण्याची सोयच नव्हती. शालेय शिक्षणानंतर त्यांनी स्वखर्चाने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यासाठी मोलमजुरी, छोट्या-मोठ्या नोकर्‍या केल्या. ज्ञान संपादनाच्या तीव्र इच्छेने कठीण परिस्थितीतही त्यांनी शिक्षण सोडले नाही. याउलट इंग्रजी विषयातून एमएचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी यशवंतराव मुक्त विद्यापीठामधून बी.एस्सी कृषी विषयाचे शिक्षण घेतले. त्या दरम्यानच्या कालावधीत त्याचे संगणकविद्याशास्त्राचे शिक्षण पूर्ण झाले होते. केवळ पोटाकरिता नोकरी करायची, या तत्त्वाने काळे आयुष्याचा गाडा ढकलत होते. २००५ साली त्यांनी मित्रांच्या समवेत संगणकाचे प्राथमिक शिक्षण देणारे वर्ग व क्लासेस सुरू केले. या वर्गात शिकणारे विद्यार्थी वन विभागाच्या वनरक्षकपदासाठी अर्ज दाखल करत होते. त्यांचा अर्ज भरताना काळेंनी केवळ सरकारी नोकरी मिळेल या उद्देशाने आपलाही अर्ज भरला आणि योगायोगाने त्यांची या पदासाठी निवड झाली.

 
 
 

tiger_1  H x W: 
 
 

मार्च 2006 मध्ये काळे ‘वनरक्षक’ म्हणून चांदवड वनपरिक्षेत्रात रुजू झाले. पुढील सात-आठ वर्षे त्यांनी देवळाली, कळवण, कणाशी या वनपरिक्षेत्रात काम केले. मात्र, या कामामुळे त्यांची वन्यजीवांप्रतिची ओढ वाढली. मिळालेले काम हा त्यांच्या आवडीचा विषय झाला. २०१४ मध्ये वन विभागाने वनरक्षकांच्या बढतीसाठी परीक्षा घेतल्या. काळेंनी ही परीक्षा देण्याच्या निश्चय केला. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यास काळेंची वनपालपदावर बढती होणार होती. त्यामुळे त्यांनी जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. याची परिणती म्हणजे काळे या परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम आले. वनपालपदाचे काम स्वीकारल्यानंतर २०१५ साली त्यांची नियुक्ती नव्यानेच स्थापन झालेल्या ’ममदापूर वन्यजीव संरक्षण’ क्षेत्रात येवला येथे झाली. काळविटांसाठी प्रसिद्ध असलेल्या या संपूर्ण भूभागाला प्रशासकीय अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या प्रयत्नामुळे संरक्षित दर्जा मिळाला होता. नव्यानेच स्थापन झालेल्या या क्षेत्रात काम करणे कठीणच होते. कारण, लोकप्रबोधन, अधिवास व्यवस्थापन, वन्यजीव संरक्षण अशा अनेक बाबींमध्ये सुसूत्रता आणण्याचे महत्त्वाचे काम होते. वरिष्ठांच्या अचूक मार्गदर्शनाखाली काळेंनी या कामाला सुरुवात केली. संरक्षित क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी आखलेल्या आराखड्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली. सहकार्यांसमावेत गावातील लोकांमध्ये वन्यजीवांविषयी प्रबोधन केले. त्या भागात पाऊस कमी पडत असल्याने अधिवास व्यवस्थापनाचा विषय गंभीर होता. त्याकरिता विविध उपाययोजना राबवून अधिवास सुधारण्याकरिता प्रयत्न केले. येवला तालुक्यातील काळवीट आणि निफाड तालुक्यातील बिबट्यामुळे उद्भवणारा मानव-वन्यजीव संघर्ष सोडविण्यासाठी सहकारी व वरिष्ठांसोबत मेहनत घेतली.

 
 

tiger_1  H x W: 
 
 

काळेंच्या याच प्रयत्नांचे फळ म्हणून २०१६ साली त्यांना शासनाचे वन्यजीव व्यवस्थापनासंबंधीचे सुवर्णपदक मिळाले. या कामाच्या निमित्ताने त्यांना छायाचित्रणाची आवड निर्माण झाली आणि 2018 साली झालेल्या बदलीच्या निमित्ताने ती जोपासलीही गेली. काळे सध्या ’नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्या’त कार्यरत आहेत. गोदावरीच्या काठावर वसलेले हे अभयारण्य स्थानिक पक्ष्यांसह स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर आहे. या ठिकाणी रुजू झाल्यावर त्यांनी कटाक्षाने पक्ष्यांची नावे, त्यांचा अधिवास, स्थलांतराचा मार्ग याची माहिती स्थानिक मार्गदर्शकांकडून अवगत करून घेतली. शिवाय नांदूर हे पाणथळ क्षेत्र असल्याने तेथील अधिवास व्यवस्थापनामधील महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती जाणून घेतली. वरकरणी हे काम आपल्याला सोपे वाटत असेल. मात्र, दोन विरुद्ध अधिवास क्षेत्रात काम करणे म्हणजे कठीण काम. तेथील अधिवासामधील त्रुटींचा आढावा घेऊनच वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने काही निर्णय घेणे आवश्यक असते. त्यामध्ये चुका झाल्यास त्याचा दूरगामी परिणाम सहन करावा लागतो. काळे हे संपूर्ण काम नेटाने करत आहे. त्यासाठी त्यांना वरिष्ठांसोबतच वन विभागातच वनरक्षक असणार्या त्यांच्या पत्नीची मोलाची साथ मिळत आहे. दै.’मुंबई तरुण भारत’ कडून काळेंना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा!

@@AUTHORINFO_V1@@