
मुंबई (प्रतिनिधी) - भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २२ वर्ष निवास केलेल्या परळ येथील चाळीला राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा ६३ वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांच्या परळ येथील निवासाला भेट दिली.
परळ येथील बी.आय.टी चाळीमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पत्नी रमाई आणि त्यांच्याा कुटुंबीयांसोबत १९१२ ते १९३४ या कालवधीत वास्तव्यास होते. या चाळीच्या दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रं. ५० व ५१ मध्ये बाबासाहेबांच्या कुटुंबाने २२ वर्ष निवास केला. यामधील खोली क्रं. ५० मध्ये बाबासाहेब चिंतन, मनन आणि वाचन करायचे. देशातील अनेक घडामोडींवर विचार करुन त्यावर अभ्यास करण्याचे काम बाबासाहेब या खोलीमध्ये करत. देशभरातील मान्यवर आणि छत्रपती राजर्षी शाहूंनी याच खोलीत येऊन बाबासाहेबांची भेट घेतली होती. बाबासाहेबांनी समता सैनिक दल स्थापन केलं होते. त्याचे एक पदाधिकारी कालिदास सखाराम ताडीलकर यांना १९३४ मध्ये बाबासाहेबांनी ही खोली दिली. आता ताडीलकरांच्या कुटुबीयांकडे ही खोली असून ती पाहण्यासाठी अनेक अनुयायी आणि अभ्यासक येत असतात.
खोली क्रं. ५१ मध्ये माता रमाई बाबासाहेबांच्या भेटीसाठी येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार करत. सध्या या खोलीत महाडचे भागुराम खैरे आपल्या कुटुंबीयांसमवेत राहत आहेत. भागुराम खैरे हे बाबासाहेबांचे नातेवाईक आहेत. १९३४ साली जेव्हा बाबासाहेब दादर येथील राजगृहात राहण्यास गेल्यावर त्यांनी खैरे यांच्या काकांना ही खोली राहण्यासाठी दिली होती. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्यावर चाळीतील रहिवाशांनी या दोन्ही खोल्यांच्या मध्यभागी बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा लावल्या. दरवर्षी देशभरातून बाबासाहेबांचे अनुयायी या दोन खोल्यांचं ते छोटेखानी स्मारक पाहण्यासाठी चाळीत येतात. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चाळीला भेट देऊन याठिकाणी राष्ट्रीय स्मारक विकसित करण्याची घोषणा केली.