देवेंद्र फडणवीस यांचा ‘पराभव’ कसा?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2019
Total Views |


fadnavis_1  H x


जे काही व्हायचे ते होऊन गेले. त्यात योग्य किती, अयोग्य किती, नैतिक किती अनैतिक किती हे फक्त चर्चेचे प्रश्न ठरत आहेत. पण, कोणत्याही निकषाच्या आधारावर देवेंद्र फडणवीस यांचा पराभव झाला, असे म्हणता यायचे नाही.



राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काही कथित वैगुण्यांवर बोट ठेवताना त्यांच्यावर
‘मी‘पणाचा आरोप करीत, त्यामुळेच त्यांचा पराभव झाल्याचा अभिप्राय व्यक्त केला. शरद पवार हे शब्दांचा विचारपूर्वक आणि अचूक वापर करणारे नेते म्हणून ओळखले जातात. हेच वक्तव्य अन्य कुणा नेत्याने केले असते तर त्याची दखल घेण्याची गरजही पडली नसती. पण, शरद पवारांनीच तसे वक्तव्य केल्याने त्याची उपेक्षा निश्चितच केली जाणार नाही. एक तर पवार आणि फडणवीस यांच्या वयात किमान दीड पिढीचे अंतर आहे. कदाचित साहेबांचे वय देवेंद्रांच्या वयाच्या कमी-अधिक दुपटीचे असेल. राजकारणात त्यांच्याजवळ प्रदीर्घ अनुभवही आहे आणि त्याच्या जोडीला त्यांना ‘जाणता राजा’ ही उपाधीही मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा ज्येष्ठत्वाचा हक्क आहेच व त्या नात्याने त्यांनी देवेंद्रांची काही कथित वैगुण्ये सांगितली असतील, तर देवेंद्र त्यांचा निश्चितच विचार करतील. पण, त्यांचा खरोखरच पराभव झाला आहे काय, हा प्रश्न मात्र तपासावाच लागणार आहे.



पवार यांच्या वक्तव्याची फोड करण्यापूर्वी त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी व देवेंद्र फडणवीसांचे त्यांच्याशी असलेले संबंध तपासणे उचित ठरेल
. त्यासंदर्भात दोन वर्षांपूर्वीचा नागपुरातीलच एक प्रसंग आठवतो. माझे सहकारी सुधीर पाठक यांनी संपादित केलेल्या बॅ. शेषराव वानखेडे यांच्यावरील पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होता. त्याचे अध्यक्ष होते शरदराव, तर प्रमुख पाहुणे होते देवेंद्र फडणवीस. मध्यभागी असलेल्या प्रमुख खुर्चीवर बसण्याच्या वेळी देवेंद्रांनी शरदरावांना अध्यक्ष म्हणून तेथे बसण्याचा आग्रह केला, तर शरदरावांनी त्यांना आग्रह केला. शेवटी ते आपापल्या आसनावर बसले. मग प्रश्न आला भाषणाचा. अध्यक्ष या नात्याने शरदरावांनी समारोपाचे भाषण करणे अपेक्षित होते. पण, राज्याचे प्रमुख ज्या कार्यक्रमात असतात तेथे त्यांचे शेवटचे भाषण असते, हा प्रोटोकाल शरदरावांच्या लक्षात होता. त्यामुळे त्यांनी आपले अध्यक्षीय भाषण आधी केले व मुख्यमंत्र्यांनी शेवटी भाषण केले. यावरून त्या दोघांमध्ये परस्परांबद्दल किती आदराची भावना आहे हे स्पष्ट होते. पण, एखादा समारंभ वेगळा व राजकारण वेगळे. त्यामुळे पवारांना देवेंद्रांमधील कथित ‘मीपणा’ जाणवला असेल तर ते स्वाभाविकच आहे व देवेंद्रदेखील त्यांचा वडीलकीचा अधिकार मान्य करून आपल्या भूमिकेचा विचार करतीलच. पण, मुख्य प्रश्न आहे त्यांच्या कथित पराभवाचा. त्याचा विचार मात्र व्हायलाच हवा.



खरेतर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूक दक्षिण
-पश्चिम नागपूर मतदारसंघातून लढविली व त्यात ते आपल्या प्रतिस्पर्ध्याचा चांगल्या फरकाने पराभव करून दुसर्यांदा निवडून आले ही वस्तुस्थिती नाकारण्याचे कारण नाही. त्यामुळे त्यांचा त्या अर्थाने ‘पराभव झाला’ असे म्हणता येणार नाही. दुसरा मुद्दा त्यांच्या पक्षाला निवडणुकीत मिळालेल्या जागांचा. फडणवीस यांच्या भाजपला निवडणुकीत बहुमत मिळाले नसेलही, पण त्यांनी शिवसेनेच्या सोबत महायुती म्हणून निवडणूक लढविली होती व तिला २८८ पैकी १६१ जागांचे बहुमत मिळाले होते. त्यामुळे हाही ‘पराभव’ म्हणता येणार नाही. निकालांनंतर सत्तेसाठी शिवसेनेने भूमिका बदलली हा त्यांच्या रणनीतीचा भाग. पण, त्यामुळे फडणवीस पराभूत ठरत नाहीत.



एकटी भाजप म्हणून विचार केला तरी त्या निवडणुकीत तो पक्ष सर्वाधिक जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे
. त्याला गेल्या वेळच्या १२२ पेक्षा कमी म्हणजे १०५ जागा मिळाल्या असतीलही, पण गेल्या वेळी त्याने लढविलेल्या जागा व यावेळी लढविलेल्या जागा यांचा विचार करता फडणवीसांचा पराभव झाला असे म्हणता येत नाही. मतांचा विचार केला तर राज्यात सर्वाधिक व एक कोटींच्या वर मते मिळविणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. शिवाय त्या पक्षाच्या विजयाचे प्रमाणही (स्ट्राईक रेट) गेल्या वेळेपेक्षा अधिकच आहे. त्यामुळेही त्यांचा पराभव झाला असे म्हणता येणार नाही. म्हणजेच विजय आणि पराभव यांचे कोणतेही निकष लावले तरी फडणवीस पराभूत झाले असे म्हणता येणार नाही.



अर्थात
, पूर्वी ते मुख्यमंत्री होते आणि आता विरोधी पक्षनेते बनले आहेत, याकडे लक्ष वेधून त्यांचा पराभव झाला, असे कदाचित म्हणताही येईल. पण, त्या अर्थाने तोही पराभव नाहीच. ते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते, पण ते पद त्यांना मिळू शकले नाही किंवा मिळविता आले नाही. या अर्थाने ‘पराभव’ शब्द वापरता येईलही, पण या स्थितीचे योग्य शब्दांत वर्णन करायचे झाल्यास मुख्यमंत्री बनण्यात त्यांना अपयश आले, असे म्हणता येईल. पण तो ‘पराभव’ मात्र नाही. कारण, विधानसभेतील नेतेपदाची निवडणूक त्यांनी लढविली नाही. उद्धव ठाकरे यांच्या विश्वासमताच्या वेळीही त्यांनी मतविभागणीची मागणी केली नाही. त्यामुळेही त्यांचा पराभव झाला, असे म्हणता येणार नाही. तरीही ‘पराभवा’च्या संदर्भात विचारच करायचा झाल्यास शिवसेनेला महायुतीबरोबर ठेवण्याच्या प्रयत्नात मात्र ते पराभूत झाले आहेत. अपयशी ठरले आहेत. कदाचित शरदरावांना त्यांचा या अर्थाने पराभव अधोरेखित करायचा असू शकतो. पण त्यातही तर्काच्या आधारे विचार केला तर तोही पराभव ठरत नाही. कारण, भाजप-शिवसेना महायुतीत त्यांच्या पक्षाला शिवसेनेपेक्षा जवळपास दुप्पट (१०५ व ५६) जागा मिळाल्या. त्यामुळे महायुतीतील परिपाठीनुसार त्यांचाच म्हणजे त्यांच्या पक्षाचाच मुख्यमंत्रिपदावर हक्क होता. कारण, स्व. बाळासाहेब ठाकरे यांनीच ती प्रथा रूढ केली होती व आतापर्यंत तिचे पालनही होत होते. या प्रथेमध्येही फक्त मिळालेल्या जागाच मोजल्या जात होत्या, अन्यथा ‘स्ट्राईक रेट’चा विचार केला तर शिवसेनेचा ‘स्ट्राईक रेट’ बहुतेक वेळा भाजपपेक्षा कमीच होता. यावेळी फक्त एकच नवीन मुद्दा होता व तोही एकतर्फी होता.



तो म्हणजे उद्धव ठाकरे यांना अमित शाह यांनी दिलेल्या कथित आश्वासनाचा
. पण, त्या आश्वासनाचा आग्रह धरण्यात सेनेने उशीरच केला. कारण, पंतप्रधान मोदी व भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी निवडणूक प्रचाराच्या काळात अनेकदा देवेंद्रच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत, असा उल्लेख जाहीरपणे केला होता. स्वत: देवेंद्रांनीही ‘मी पुन्हा येणार’ असे विधानसभेत व प्रचाराच्या वेळीही जाहीर केले होते. त्यावेळी शिवसेनेने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे जाहीर वा खासगीरीतीने त्याला एकदाही आक्षेप घेतला नाही. तसा त्यांचाही दावा नाही. त्याच वेळी त्यांनी आक्षेप घेतला असता तर त्यांना भाजपवर खोटारडेपणाचा आरोप करून जास्त जागा जिंकताही आल्या असत्या. पण, तसेही घडले नाही. त्यामुळे आपल्या जागा कमी होऊ नयेत म्हणून वा मोदींच्या लोकप्रियतेचा लाभ मिळणार नाही, या भीतीपोटी तिने त्यावेळी तो मुद्दा उपस्थित केला नाही, असे म्हणता येऊ शकते. पण, आता तसे म्हणण्यालाही अर्थ नाही. जे काही व्हायचे ते होऊन गेले. त्यात योग्य किती, अयोग्य किती, नैतिक किती अनैतिक किती हे फक्त चर्चेचे प्रश्न ठरत आहेत. पण, कोणत्याही निकषाच्या आधारावर देवेंद्र फडणवीस यांचा पराभव झाला, असे म्हणता यायचे नाही.



राहता राहिला प्रश्न
‘मीपणा’चा. शब्दार्थाच्या अंगाने विचार केला तर ‘मी पुन्हा येणार’ किंवा ‘निवडणुकीत समोर कुणी पहिलवानच दिसत नाही’ या फडणवीसांच्या उद्गारातून ‘मीपणा’चा संकेत मिळतो. पण तो संकेतच. फार तर त्याचे वर्णन ‘अतिआत्मविश्वास’(ओव्हर कॉन्फीडन्स) असे करता येईल. पण, पवारसाहेबही मान्य करतील की, निवडणूक प्रचार ही एक धुंदीच असते व ती सर्वांनाच चढत असते. ‘मी निवडून येणारच’ असे प्रत्येक उमेदवार म्हणत असतोच. कारण, प्रारंभीच त्याने पराभव मान्य केला तर कुणीच त्याला मत देणार नाही. काँग्रेस वा राष्ट्रवादीनेही प्रचारकाळात बहुमताचा दावा केला होताच. पण मिळाले काय त्यांना बहुमत? उलट ५० वर्षे राजकारणात घोर तपश्चर्या करूनही राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेरही पडू शकली नाही आणि ५७च्या वर जागाही मिळवू शकली नाही. उलट तिला प्रत्येक वेळी काँग्रेस पक्षाला शरणच जावे लागले. सोनिया गांधींच्या विदेशातील जन्माचा मुद्दा तर ती सोयीस्करपणे विसरूनच गेली. सत्तेसाठी ते कसकशा व कोणकोणत्या तडजोडी करतात हेही लपून राहिलेले नाही. पण, राजकीय मुत्सद्देगिरी हा लोकप्रियता मोजण्याचा मापदंड ठरू शकत नाही. राजकारणात आपल्या सोयीचे अर्थ काढून सत्ता भलेही मिळविता येईल, पण तिला लोकप्रियतेचे अधिष्ठान तेव्हाच मिळते जेव्हा ती खेळाचे नियम पाळून, राजकीय नैतिकतेचे संकेत पाळून मिळविली जाते. त्यालाच जर पवारसाहेब ‘विजय’ म्हणत असतील व फडणवीसांचा पराभव झाला असे मानत असतील, तर त्यांचा तो ‘पराभव’ फडणवीस आनंदाने मान्य करतील. कारण, त्यातच त्यांच्या भावी विजयाची बीजे दिसू शकतात.



- ल.त्र्य. जोशी 
@@AUTHORINFO_V1@@