सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ

    06-Dec-2019
Total Views |


sfs_1  H x W: 0


१९८०च्या दशकात संभाजीनगरच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या काही तरुणांनी एक स्वप्न पाहिले. स्वप्न होते सर्वसामान्यांना परवडणाऱ्या शुल्कात गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा देण्याचे! त्यातून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान'ची आणि त्याच्या पहिल्या उपक्रमाची- डॉ. हेडगेवार रुग्णालयाची सुरुवात झाली. आपल्या देशात वैद्यकीय प्रश्नांच्या मागे सामाजिक उपेक्षा, स्थलांतर, आर्थिक समस्या, दारिद्य्र, व्यसनाधीनता आणि जागृतीचा अभाव अशी अनेक कारणं असतात. त्यामुळे वैद्यकीय सुविधा देतानाच या अन्य कारणांवरही काम करण्याची तयारी प्रतिष्ठानने सुरू केली. यातूनच एका स्वतंत्र व आरोग्यापुरते सीमित न राहता, विविध क्षेत्रांमधील विकासाला प्राधान्य देणाऱ्या एका संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. ती संस्था म्हणजे, 'सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ.'


आज पाच जिल्ह्यांमधील १७० गावे आणि ४५ उपेक्षित वस्त्यांमधून 'सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळा'चे ४२ प्रकल्प चालतात. पाच लाख बांधवांच्या जीवनाला स्पर्श करणारे हे काम आरोग्य, शिक्षण, महिला विकास, कौशल्य विकास आणि नैसर्गिक संसाधने विकास याद्वारे चालते. खेड्यांमध्ये असलेल्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांमुळे नव्वदच्या दशकात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित बांधव संभाजीनगर शहरात आले. मात्र, यातील बहुतांश स्थलांतरितांना संभाजीनगरमधील झोपडपट्टी वस्त्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला. मूलभूत सुविधांचा अभाव, अज्ञान, दारिद्—य आणि असुरक्षित जीवन यांच्या दुष्टचक्रात या वस्त्यांमधील मंडळी कायम राहतात. आरोग्यासहित उपजीविकेचे आणि शिक्षणाचे अनेक प्रश्न पुन्हा-पुन्हा विक्राळ स्वरूपात उभे राहतात. यावर आपल्या परीने उत्तरे शोधण्यासाठी 'सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळा'च्या कार्यकर्त्यांनी नव्वदच्या दशकात कंबर कसली व शहरी वस्त्यांमधील आरोग्य केंद्रांच्या कामाला प्रथम सुरुवात झाली. आज 'गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र', 'संत रोहिदास आरोग्य केंद्र', 'संत गाडगेबाबा आरोग्य केंद्र' आणि 'श्री गुरुजी मोबाईल क्लिनीक' यांद्वारे ३५ शहरी उपेक्षित वस्त्यांमध्ये उत्तम दर्जाची प्राथमिक आरोग्य सुविधा, दरवर्षी सव्वा लाख रुग्णांसाठी केवळ नाममात्र शुल्क आकारून पुरविली जाते. काही विषयांमध्ये डॉ. हेडगेवार रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया, गर्भवतींसाठी मोफत तपासण्या व उपचार 'मधुमेह- हृदयविकार क्लिनीक' या उपक्रमांद्वारे वस्त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. आरोग्याच्या सर्व विषयांवर लोकभागीदारी आणि प्रतिबंधात्मक आरोग्याचे नियोजनबद्ध प्रकल्प हे मंडळाचे वैशिष्ट्य!

 

१९९३ पासून संस्थेच्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पाला सुरुवात झाली. सुरुवातीला तीन गावांपासून सुरू झालेल्या या प्रकल्पाला आज संजीवनी ग्रामीण आरोग्य चळवळीचे स्वरूप बनले आहे. ७० गावांमधून माता-बाल आरोग्याचे भरीव काम होत आहे. या सर्व दुर्गम गावांतून कुपोषणाचे प्रमाण ५२ टक्क्यांहून १७ टक्के इतके कमी झाले आहे. प्रशिक्षित आरोग्य मित्रांच्या रूपाने गावांच्या आरोग्यातील नवीन नेतृत्व उभे राहिले आहे. 'केअर मदर कीट', 'श्रुती' यासारख्या प्रगत टेलिमेडिसीन तंत्रांचा प्रभावी वापरही होतो आहे. ग्रामीण शालेय आरोग्याचा 'उज्ज्वल भारत' प्रकल्प हादेखील या मालिकेतील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प. शिक्षण हा व्यक्ती-विकासाचा पाया आहे. विशेषत: शिशुशिक्षण! १९९६ मध्ये सुरू झालेला मंडळाचा 'ओंकार बालवाडी आणि बालशिक्षण संशोधन प्रकल्प'या क्षेत्रातील 'मैलाचा दगड' म्हणून ओळखला जातो. आनंददायी, निसर्गनिगडित व संपूर्णत: अनौपचारिक बालशिक्षणाच्या या प्रकल्पासाठी तितकाच वैशिष्ट्यपूर्ण परिसर संस्थेने उभारला आहे. विशेष मुलांच्या शिक्षणाला समर्पित 'विहंग विशेष मुलांची शाळा'देखील अल्पावधीतच समाजमान्य ठरली आहे. १९९० मध्येच 'विद्यार्थी विकास प्रकल्प' सुरू झाला. उपेक्षित वस्त्यांतील मुलांमध्ये असणारी बुद्धिमत्ता विकसित करणे आणि त्यांच्या पंखांना संधींच्या आकाशात भरारी मारण्यासाठी बळ देणे हे या प्रकल्पाने साध्य केले आहे. स्वत: यात शिकलेले अनेक तरुण पुन्हा आपल्या बांधवांसाठी स्वयंसेवक म्हणून वेळ देतात, हे विशेष! गेल्या १०-१२ वर्षांपासून शहरी वस्त्या आणि ग्रामीण किशोरींसाठी सुरू असलेला 'किशोरी विकास प्रकल्प' मुलींसाठी स्व-विकासाची संधी ठरला आहे. १० हजार किशोरींचा सहभाग, वेळीच थांबवलेले अनेक बालविवाह हजारो किशोरींना आत्मविश्वासाची शिदोरी देणारे ठरत आहेत. शहरी वस्तीतील महिला हा सर्वात वंचित घटक. शिक्षण नाही, आर्थिक-सामाजिक अधिकार नाहीत; अशा अवस्थेत अनेक प्रश्नांसहित वस्तीतील महिला जगतात. १९९० मध्येच महिलांच्या संघटनांचे काम सुरू झाले. आज 'तेजस्विनी महिला प्रकल्पा'च्या माध्यमातून शहरातील अनेक वस्त्यांतील हजारो गरीब महिला संघटित झाल्या आहेत. आर्थिक उन्नयनाच्या शेकडो यशोकथा या महिलांनी निर्माण केल्या आहेत. त्याही पलीकडे जाऊन स्वत:च्या आरोग्याच्या, सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीचे माध्यम म्हणून हे संघटन प्रभावीपणे काम करते. महिलांच्या आर्थिक वंचना, सामाजिक अधिकाराची जाणीव व कौटुंबिक स्वास्थ्य यांत सकारात्मक बदल घडवून आणले गेले आहेत. सहा हजार ग्रामीण महिलांचे स्वतंत्र संघटन आरोग्य आणि उपजीविकेच्या प्रश्नांवर सातत्याने काम करीत आहे. महिला शेतकऱ्यांसाठीचा 'कृषि-कन्या' प्रकल्प याचे उत्तम उदाहरण!

 

सर्व प्रश्नांच्या मुळाशी असलेल्या दारिद्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न 'सावित्रीबाई फुले मंडळा'चे सर्व प्रकल्प करीत असतात. यात लक्षणीय भरारी मारली आहे, ती मंडळाच्या 'कौशल्य विकास' विभागाने! वस्त्यांमधील अल्प किंवा अत्यल्प शिक्षित महिला आणि तरुण मुलांसाठी घराजवळ, सहज पूर्ण करता येतील असे, अल्प कालावधीचे आणि मुख्य म्हणजे मोफत किंवा नाममात्र शुल्कातील कौशल्य प्रशिक्षणांची साखळी मंडळाने उभी केली आहे. ब्युटीशियन, इलेक्ट्रिशियन, टेलरिंग, केटरिंग, संगणक प्रशिक्षण, रुग्ण-साहाय्यक या कोर्सेसमधून दरवर्षी दीड हजार गरजूंना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळतो. या विद्यार्थ्यांसाठी मंडळातर्फे उद्योजकतेच्या खास प्रशिक्षणापासून ते थेट बीजभांडवल उपलब्ध करून देण्यापर्यंत सर्व मदत करण्यात येते. हे मंडळ शहरातील विविध व्यवसायातील १०० हून अधिक नामवंत या कोर्सेससोबत जोडले गेले आहे. ग्रामीण आरोग्यविषयक क्षेत्रात काम करताना शेतीची दुरवस्था आणि त्यासाठी होणारी कोंडी लक्षात येत होती. त्यामुळे कृषिविस्तार कार्यक्रम हाती घेतले गेले. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी यशस्वी प्रयोग झाले. हळूहळू या विषयांचे अनेक आयाम सुरू झाले. 'जन-जल-जंगल-जमीन-जानवर' या 'पाच 'ज'कारांच्या' यशस्वी व्यवस्थापनातून सगळ्या प्रश्नांच्या सोडवणुकीला मदत होते, हे लक्षात आले. आज चार जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांसोबत सावित्रीबाई फुले मंडळ काम करते. मराठवाडा तर दुष्काळाचा शाप घेऊन वावरणारा. सततचे जलसंकट डोक्यावर. त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न २०१२-१३ मध्ये सुरू झाले. उपलब्ध जलस्रोतांचा विकास ते 'माथा ते पायथा' शास्त्रोक्त जलसंधारण विषय हाताळल्याने आज पन्नासपेक्षा अधिक गावांच्या दुष्काळाच्या झळा कमी झाल्या आहेत. २०१२ मध्ये जवळ-जवळ उजाड झालेल्या संभाजीनगर जिल्ह्यातील दोन दुष्काळग्रस्त गावांचे उदाहरण अगदी बोलके आहे. स्वत:च्या मुलांप्रमाणे वाढवलेल्या फळबागा दुष्काळाने स्वत:च्या हातांनी शेतकऱ्यांनी तोडल्या. गेली सहा वर्षे मंडळ तेथील शेतकऱ्यांसोबत सातत्याने काम करीत आहे. परिणामी, दुष्काळ असूनसुद्धा ४०० एकरवर डाळींब बागा फुलल्या आहेत.

 

डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या कामाचा विस्तार म्हणून सुरुवात झालेले 'सावित्रीबाई फुले मंडळ' आज महाराष्ट्रातील अग्रगण्य सेवाभावी संस्था म्हणून सुपरिचित आहे. अखिल भारतीय पातळीवरचा 'श्रीगुरुजी सेवा पुरस्कार', महाराष्ट्र शासनाचा 'फुले-शाहू-आंबेडकर समाज प्रबोधन पुरस्कार' आदी पुरस्कारांनी मंडळाचा गौरव करण्यात आला. गुणवत्तेच्या आग्रहामुळेच संस्थेने नुकतेच 'आयएसओ' मानांकन मिळवले आहे. अनेक कंपन्यांनी त्यांचे 'सीएसआर' प्रकल्प राबविण्यासाठी मंडळाची निवड केली आहे. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि स्वयंसेवी कार्यकर्ते यांच्या बरोबरीने मंडळाच्या यशस्वी वाटचालीत योगदान आहे ते कार्यक्षेत्रातील बंधु-भगिनींचे! 'आमच्यासाठी काम करणारी संस्था'नव्हे, तर 'आमच्याबरोबर काम करणारी संस्था' अशी त्यामुळेच मंडळाची कार्यक्षेत्रात ओळख आहे. समाज माध्यमांचा प्रभावी वापर करत अनेकांना जोडणे हे 'सावित्रीबाई फुले मंडळा'चे वैशिष्ट्य! संस्थेच्या कामाची समग्र माहिती www.spmesmandal.org या संकेतस्थळावर आता उपलब्ध आहे. कार्यक्षेत्राचा विस्तार करणे, समाजासमोर नव्याने येत असलेल्या जागतिक तापमान वाढीसारख्या विषयांवर अन्य संस्था-संघटनांशी समन्वय साधत अधिक काम करणे हे भविष्याच्या वाटचालीतील टप्पे आहेत. त्याद्वारे समरस, सुदृढ, स्वयंपूर्ण समाज उभा करण्याच्या मंडळाच्या ध्येयपूर्तीसाठी आपले सहकार्य खूप मोलाचे आहे.


sf_1  H x W: 0