
‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ या उक्तीचा साक्षात्कार म्हणजे डॉ. नामदेव एस. गजभिये. आंबेडकरी विचार-आचार आणि संस्कार यांनी सच्चा माणूस जेव्हा जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ बनतो, तेव्हा ही घटना आम्हा भारतीयांना अभिमानास्पद वाटते. ज्या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला, ज्या गावाकुसाबाहेरच्या वस्तीत तो संस्कारीत झाला, त्या सर्वांना तर आकाशच ठेंगणे वाटते. असे थोर शास्त्रज्ञ नामदेव गजभिये यांच्याविषयी आपण जाणून घेऊया. चिखलातून उमललेल्या या कमळाच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करूया...
मातीत नामदेव यांची नाळ रूजली, त्या गावाचे नाव आहे, आकोट, जि भंडारा. या छोट्याशा गावाला अशोककालीन बुद्धसंस्कृतीचा वारसा लाभल्याचा पुरावा आहे. आडवळणावर असलेल्या या गावात फार मोठ्या दगडावर कोरलेले अशोकचक्र शतकांची साक्ष देते. या गावात हे रत्न जन्माला आहे. १९५२ साली जन्माला आलेल्या नामदेवांच्या काळात त्या गावाची वस्ती तशी दाटीवाटीची नव्हती. या गावात झोपडीवजा कौलारू घरात श्रीरामजी गजभिये धृपदाबाई या दाम्पत्याचे नामदेव हे अपत्य. मात्र, बालपणीच अचानक नामदेव यांचे पितृछत्र हरवले. त्यांच्या आईच्या वाट्याला तरुणपणीच वैधव्य प्राप्त झाले. वैधव्याचा कटू अनुभव घेताना ही माऊली या लहान बाळाचे संगोपन, संवर्धन करण्यासाठीच आयुष्यभर जगली. आजही आईच्या कर्तृत्वाचा अभिमान नामदेव यांना वाटतो. त्याबद्दल ते सांगताना आजही गहिवरतात. कारण, लहानपणाची एक घटना अजूनही त्यांचा पिच्छा पुरविते. पूर्वी अस्पृश्यांचा बहिष्कार, विटाळ आदी बाबी नित्याच्याच होत्या. परंतु, धृपदाबाईंकडून कोणता अपराध घडला कुणास ठाऊक? त्यांच्या नातेवाईकांनी धृपदाबाईंच्या घरावर बहिष्काराचे अस्त्र उगारले. आईला बहिष्कृत का केले, याचे उत्तर त्यांना त्या बालवयात कळले नाहीच. पण, आजही त्या घटनेची आठवण त्यांना अस्वस्थ करते. काळीज चिरून टाकणारी जखम त्यांच्या डोळ्यातून वाहते. आई दिवसरात्र बिड्या वळण्याचे काम करायची. पडेल ते शेतीभातीचे काम करून तिने मोठ्या कष्टाने नामदेवला शिकवले, मोठे केले.
१९५६च्या दरम्यान मोठी घटना घडली. १४ ऑक्टोबर या विजयादशमीच्या पर्वावर भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अस्पृश्य बांधवांनी धर्मांतर केले. त्याचे साद पडसाद प्रत्येक गावागावात उमटले. क्षणार्धात महारवाड्यांचे ‘बौद्धवाडे’ झाले. त्याचबरोबर गावात अस्पृश्यता निवारक सहभोजने होऊ लागली आणि या सगळ्या घटना नामदेव यांच्या बालमनावर अगदी अलगद कोरल्या गेल्या. तेव्हा शिक्षणाच्या दारापर्यंत नामदेव यांना घेऊन जाण्याचे पुण्यकर्म ग्रामसेविका शकुंतलाबाई राऊत यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सहवासात राहून समाजकार्य आणि समाजप्रबोधन करण्यात त्या निपुण होत्या. अत्यंत प्रेमाने त्यांनी शिक्षणाचे पाठ विद्यार्थ्यांना दिले. नामदेव संस्कारित होऊन गावातल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दाखल झाला.
पुढे प्रत्येक वर्गात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणारा नामदेव दहाव्या वर्गातील बोर्डाच्या परीक्षेत विज्ञान शाखेत भंडारा जिल्ह्यातून पहिला आला. गांधी विद्यालय कोंढा आणि आकोट गावचा सन्मान वाढवला. त्यावेळी आकोटच्या विद्यार्थ्यांवर शिक्षणाचे संस्कार करणारे दिनकरराव शब्दे गुरुजी यांनी नामदेव यांना घरी बोलवून कौतुकाची थाप दिली. ही थाप आणि ‘डॉ. बाबासाहेबांसारखे भरपूर शिक’ म्हणून आईचे स्वप्न आणि स्वत:ची चिकाटी, हुशारी, कष्ट, परिस्थिती बदलण्याची जिद्द, अभ्यासाची ओढ या सगळ्या बाबी त्यांना महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी कारणीभूत ठरल्या. अर्थात, हे सगळे करताना नामदेवही आईसोबत बिड्या वळायचे काम करत. पहाटे उठून अभ्यास करायचे. ते झाले की बिड्या वळायचे. त्यानंतर शाळेची तयारी करायची. चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत चालत जायचे-चालत यायचे. परत संध्याकाळी घरी परत येऊन बिड्यांसाठी लागणार्या पानांची कात्रीने कटाई करायची. त्यानंतर जेवायचे. असा दिनक्रम. या सगळ्या कष्टाच्या जीवनक्रमातही नामदेव यांचा शाळेतला पहिला क्रमांक कधी सुटला नाही. त्यामुळे धृपदाबाईंना विश्वास वाटे की, हा मुलगा आपले पांग फेडेल. नामदेव यांच्या शैक्षणिक यशाने मग आईच्या आयुष्यातही बदल होत गेला. ज्या नातेवाईकांनी आईला बहिष्कृत केले होते, ते आईशी आपुलकीने वागू लागले. आईच्या बहिष्कृतेचा घाव नामदेव यांच्या कर्तृत्वाने धुवून टाकला, पुसून टाकला.
नामदेव यांच्या उच्च शिक्षणाची वाट मोकळी झाली. मॉरिस कॉलेजला कला शाखेत गेलेल्या नामदेवांची गुणपत्रिका पाहून प्राध्यापकांनी त्यांना विज्ञान शाखेत जाण्यासाठी हिस्लॉप कॉलेजला पाठवले. प्रथम महाविद्यालयाच्या वसतिगृहावर व त्यानंतर रामकृष्ण मिशनच्या विवेकानंद विद्यार्थी भवन येथे राहून नामदेव यांनी बी.एस्सीचे शिक्षण पूर्ण केले आणि तेही केवळ ४०० रुपये स्कॉलरशिपवर. बाबासाहेबांप्रमाणे आपण शिकावं, राहावं, वागावं आणि शिक्षणातून समाजसेवाही करावी, असे नामदेवना वाटे. पुढे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’, नागपूर येथून पूर्ण केले. ते एम.एस्सी रसायनशास्त्र या विषयात विद्यापीठातून पहिले आले. पुढील उच्च शिक्षण, पीएच.डी कुठे आणि कशी करणार? घरात अठरा विश्व दारिद्र्य. केवळ शिष्यवृत्तीचाच काय तो आधार. नामदेव यांना काहीच कळेना. तेव्हा ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स,’ बंगळुरु इथे आवेदनपत्र पाठूवन स्वगावी नामदेवराव परतले. त्यांच्या आयुष्यातला एक ‘टर्निग पॉईंट’ आला. नागपूरच्या नातेवाईकांकडून कुठेतरी पत्र आल्याचा नामदेवरावांना निरोप आला. आकोट-कोंडा-भंडारा-नागपूर-वाडी असा प्रवास करून दुपारी १ वाजता नातेवाईकांकडे जाऊन पत्र उघडले.
बंगळुरूच्या इन्स्टिट्यूटच्या लेखीपरीक्षेचे ते पत्र होते. परीक्षा लेखी होती. वेळ दुपारी २ वाजताची. एलआयटी नागपूर सेंटर आणि वाडीपासून एलआयटीपर्यंत दुपारी बस नाही म्हणून पायीच काट्याकुट्याचा मार्ग तुडवत नामदेवराव प्रवेशपत्र घेऊन परीक्षा सेंटरवर पोहोचले. तेव्हा २.३० वाजले होते. लेखीपरीक्षेस उशीर झाला होता. म्हणून पर्यवेक्षकांनी त्यांना प्रवेश नाकारला. नामदेवरावांनी उशीर का झाला, त्याचे कारणही सांगितले. त्यांच्या घामाघूम चेहर्यावर अश्रू तरळले होते. पर्यवेक्षकांच्या मनात कालवाकालव झाली. अखेरीस अर्धा तास उलटल्यानंतर नामदेवरावांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळाला. नशिबाचे दार खुले होऊन ‘इंडियन इन्स्टिट्यूट, बंगळुरु’मध्ये एक दिवस अचानक प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावणे आले. पण, बंगळुरूला जाणार कसे? नामदेवराव यापूर्वी कधीही गाडीत बसले नव्हते. अनवाणी पायाने शिक्षण घेणारे आणि नागपूरशिवाय दुसरे कुठचेही मोठे शहर न पाहिलेले नामदेवराव. त्यांच्या पुढे अडचणींचा डोंगर उभा राहिला. अशा वेळी ‘देवदूत’ म्हणून ‘रामकृष्ण मिशन’चे स्वामीजी पीताबरानंद मदतीला धावून आले. त्यांनी नामदेवरावांचे मित्र खाडीलकर यांना बंगळुरूला तिकीट काढून आणण्यासाठी स्टेशनजवळ पाठवले. नामदेवरावांनी इकडे एक दोन कपड्यांचे बोचके भरून नागपूर स्थानक गाठले. स्वामीजींच्या आशीर्वाद आणि त्यांनी प्रवचनातून शिकवलेला कर्मयोगी मनात घेऊन जनोपयोगी बनवण्यासाठी नामदेवराव बंगळुरूला एकदाचे पोहोचले.
